अजित दादाच्या राष्ट्रवादीत गटबाजी उफळली!
- Navnath Yewale
- Oct 18
- 2 min read
इतिहास आठवावा, आम्हाला निष्ठा शिकवू नये; आमदार मुंडेच्या वक्तव्यावर प्रकाश सोळंकेचा पलटवार

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यात विधानसभा निवडणूकांपासून काही अलबेल नसल्याचे वारंवार समोर आले आहे. पक्षांतर्गत नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. त्यातच मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलन उनं दूनं काढण्यासाठी संधीच मानली जात आहे. ओबीसी एल्गार सभेमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी काहींना विधानसभेत मदत केली, त्यामुळे ते आमदार झाले असा हल्लाबोल आमदार प्रकाश सोळंके, विजयराजे पंडीत यांचे नाव न घेता केला होता.
बीडच्या जिल्ह्यातील एकून सहा विधानसभा क्षेत्रा पैकी तीन विधानसभाक्षेत्रावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तर दोन भाजप आणि एका जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व आहे. दरम्यान जिल्ह्यातील राजकारणात मोठा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सरस आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये स्वपक्षातील उमेदवारांना शह देण्यासाठी सोईच्या राजकारणाला रसद पुरविण्यात आल्याचा आरोप आहे.
त्यानुसार माजलगावमध्ये दोन, गेवराईमध्ये ही ओबीसी उमेदवार, तर आष्टी पाटोदा, शिरुर मध्ये भाजपच्या उमेदवारा समोर मैत्री पूर्ण लढतीचे आव्हान उभे करण्यात आल्याचा ठपका आमदार मुंडे यांच्यावर विद्यमान आमदारांकडून ठेवण्यात येत आहे. त्यातच आता मराठा, ओबीसी आंदोलनाची भर पडल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गटबाजी उफाळली आहे. ओबीसी एल्गार सभेत आमदार धनंजय मुंडे यांनी आमदार प्रकाश सोळंके, विजयराजे पंडीत यांचे नांव न घेता विधानसभेत मदत केली म्हणून आमदार झाले असे वक्तव्य केले होते. आमदार धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी जोरदार पलटवार करत धनंजय मुंडे यांनी मागिल इतिहास विसरू नये, पहिल्यांदा स्व. पंडीत आण्णा मुंडे जिल्हापरिषद निवडणुकीत विजयी झाले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष झाले.
त्यावेळे पासून तुम्हाला आम्ही मदत करत आलो आहोत. पक्षनिष्ठा आम्हाला शिकवायची गरज नाही, तुम्ही आमच्या विरोधात दोन ओबीसी उमेदवार दिले, गेवराईमध्येही तीच अवस्था मायुतीची एकत्र लढत असताना आष्टी पाटोदा, शिरुर कासारमध्ये मैत्री पूर्ण लढतीचे आव्हान उभे केले हीच तुमची पक्षनिष्ठा असे म्हणत आमदार सोळंके यांनी आमदार मुंडे यांच्या राजकारणाचा कच्चा चिठ्ठाच माध्यमांसमोर मांडला. मनोज जरांगे यांच्या रुपाने मराठा समाजाला एक संघर्षशिल, निस्वार्थी नेतृत्व मिळाल्याचंही आमदार सोळंके म्हणाले.
दरम्यान, मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच एल्गार सभेतून आमदार मुंडे यांनी स्वपक्षातील नेत्यांसह मनोज जरांगे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आमदार मुंडे यांच्या चौफेर फटकेबाजीला आज स्वपक्षातीलच आमदार प्रकाश सोळंके यांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले. एल्गार सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी तातडीच्या पत्रकार परिषदेतून रात्री मंत्री छगन भुजबळ, आमदार मुंडे यांच्यावर सडकून पलटवार केला.
मराठा, ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गटबाजी आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी डोकेदुखी ठरणार असली तरी.पक्षांतर्गत नेत्यांचे आरोप - प्रत्यारोप, वार- पलटवाराने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आगामी काळात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान आहे.



Comments