top of page

अजित पवारांच्या जाण्याने पोकळी निर्माण होण्याची नेमकी व्याख्या लक्षात येते- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळाच्या शोक प्रस्तावात सभागृह भावूक


मुंबई : महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम’ या नाटकात एक सुभाषित आहे. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा ह्रदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो, असे त्यामध्ये म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनाने हीच वेळ आज माझ्यावर आली आहे. अजितदादांसारखा सच्चा मित्र आणि सहप्रवाशाचा मृत्यू होणे, ही केवळ राजकीय हानी नाही. ही आपल्या सर्वांच्या अंत:करणाला वेदणा देणारी गोष्ट आहे. काही गोष्टींवर काळ औषध असतो, असे म्हणतात. पण अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या वेदना कधीही कमी होणार्‍या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ययांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्य विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांविषयी आपल्या भावना मांडल्या.


आज बोलणं कुठून सुरू करावं असा प्रश्न मला पडला आहे. एक प्रचंड वादळ मनात आहे. कारण आज सभागृहात शोक प्रस्तावासाठी आपण एकत्र आहोत. कधीच कल्पना केली नव्हती अशाप्रकारच्या शोकप्रस्तावावर व्यक्त व्हावं लागेल. अधिवेशनात कधीही सहज बाजूला नजर गेली की, बाजूला खुर्चीत दादा असायचे. सकाळपासून रात्री कितीही उशीरापर्यंत सभागृह चाललं तरी अजितदादा आपल्या जागेवर बसलेले दिसायचे.


आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत ही खंत आहे. खरंतर यावर्षी दादांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता पुढच्या वर्षी 13 वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेडे विक्रमाची बरोबरी केली असती. कदाचित पुढच्या काळात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून त्यांचं कार्य राहिलं असतं. पण अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले. त्यामुळे अर्थ संकल्प मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आली, असे दवेंद्र फडणवीस म्हणाले.


कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागेपुढे न पाहणारे अजितदादा होते. पण त्यावेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार अर्थसंकल्पावर फार मोठ्याप्रमाणात पडेल याचा पुनर्विचार करा, असं सुचवल्यावर ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे अजितदादा होते. लाडकी बहीण योना सुरु झाल्यावर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरु केलं. आम्हालाही घालायला लावलं होतं. या सगळ्या गोष्टी आता आठवणींमध्ये आहेत. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण सभागृह दु:खी आहे. खरंतर अशाप्रकारचा शोकप्रस्ताव मांडणं घटनात्मक जबाबदारी आहे. माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग आहे, असंही फडणवीस म्हणाले.


पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपण अनेकदा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली असे म्हणतो, पण प्रत्यक्षात ज्येष्ठ नेते जातात तेव्हा कमतरता जाणवते. पण अजितदादांसारखा माणूस जो राजकारणात स्थिरावलाय, ज्याने अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत, आपलं स्वत:चं अस्तित्व, नेतृत्व निर्माण केले आहे. अशी व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा पोकळी निर्माण होण्याची नेमकी व्याख्या लक्षात येते, असंही देवेंद्र फडणवीस शोकप्रस्ताव प्रसंगी म्हणाले.

Comments


bottom of page