top of page

अण्वस्त्र धमक्यांना जुमानत नाही, पंतप्रधानांनी ठणकावले दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर हेच धोरण




यापुढे कोणाताही दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला आमच्या पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिले जाईल. कुणीही अण्वस्त्रांची धमकी दिली, तरी त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल. अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी ‘ ऑपरेशन सिंदूर’ नंतर प्रथमच सोमवारी जाहिर भाष्य केले. दहशतवादी आणि त्यांना थारा देणारे सरकार यांना आम्ही वेगळे मानत नाही, असेही पंतप्रधानांनी ठणकावले.


पहलगाम हल्ल्यानंतर 6 ते 7 मे च्या दरम्यान भारतीय लष्कराने ‘ ऑपरेशन सिंदूर ’ सुरू केले. त्यानंतर 10 मे रोजी पाकिस्तानच्या विनंतीनंतर शस्त्रसंधी मान्य केला असला तरी त्याची सर्वप्रथम घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानने अण्वस्त्र वापरण्याची कथीतरित्या धमकी दिल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे . या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी दिलेला इशारा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.


दहशतवादविरोधी कारवाईत पाकिस्तान सरकार आणि लष्कराने दहशतवाद्यांनाच साथ दिल्याचा घणाघात मोदी यांनी केला.दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करी अधिकारी उपस्थित होते. ‘सरकारपुरस्कृत दहशवादा’ चा हा सर्वात मोठा पुरावा असल्याचेही ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक नंतर ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादविरोधी रणनीती आहे. आता भारताने दहशवादासाठी एक नवी सीमारेषा आखली असून ही ‘नवी सामान्य स्थिती’ आहे. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तान जगभरात तणाव कमी करण्यासाठी भीक मागत होता. वाईट पद्धतीने मार खाल्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानी सेनेने आमच्या डीजीएमओशी संपर्क केला.


तोपर्यंत आम्ही दहशतवादाचे कारखाने नष्ट केले होते. शेकडो दहशतवादी मारले होते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे आणि सैन्यतळांवरील कारवाई केवळ स्थगित केली आहे. येत्या काही दिवसांत पाकिस्तानची पावले कोणत्या दिशेने पडतात हे बघून पुढील निर्णय घेतले जातील, असे मोदी यांनी सांगितले. युद्धात आपण पाकिस्तानला कायमच धूळ चारली. ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे वाळवंट, पर्वतांमधील युद्धानंतर नव्या पिढीच्या युद्धनितीमध्येही आपण स्वत:ला सिद्ध केल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘दहशतवाद आणि चर्चा’, ‘दहशतवाद आणि व्यापार’ आणि ‘रक्त आणि पाणी’ एकत्र वाहू शकत नाहीत, असे सांगताना यापुढे पाकिस्तानशी चर्चा ही केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर परत करणे या दोनच मुद्यांवर होईल, असे मोदी यांनी जागतिक समुदायाला ठणकावले.


सुट्टीचा आनंद लुटणार्‍या सामान्य पर्यटकांना धमृ विचारून, त्यांच्य कुटुंबीयांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. दहशतवादाचा आजवरचा सर्वांत बीभत्स चेहरा यावेळी जगाने पाहिला. देशाच्या सद्भावनेला तोडण्याचा हा लाजीरवाणा प्रयत्न असल्याचे सांगत आपल्याला व्यक्तिगतरित्या खूप मोठे दु:ख झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्या हल्ल्यानंतर सगळा देश, येथील प्रत्येक नागरिक,सर्व समाज, प्रत्येक राजकीय पक्ष कठोर कारवाईच्या बाजूने उभा राहिल्याचे त्यांनी नमूद केले.


जेव्हा देश एकजूट असतो आणि राष्ट्र हेच सर्वोच्च मानले जाते, तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात. बहावलपूर आणि मुरिदकेसारखे तळ ही जागतिक दहशतवादाची विद्यापीठे होती. 9/11 चा अमेरिकेतील हल्ला, लंडन ट्यूब बॉम्बस्फोट याहस भारतात गेल्या दशकभरात झालेल्या हल्यांचे धागेदारे या ठिकाणांशी जोडले गेले असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हे युद्धाचे युग नसले,तरी ते दहशवादाचेही नाही. पाकिस्तानी फौज, सरकार ज्या दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तोच एक दिवस पाकिस्तानला गिळंकृत करेल, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला.


भगवान बुद्धांनी जगाला शांततेचा मार्ग दाखविला. मात्र हा मार्गही शक्तीवरूनच जातो. प्रत्येक भारतीय शांततेने, विकसित जीवनशैली जगेल, यासाठी शक्ती असणे आवश्यक आहे आणि गरज पडल्यावर या शक्तीचा आम्ही उपयोग करू, असे सांगत अणि सैनिकांना आणि देशवासीयांच्या एकजुटीला सलाम करत पंतप्रधानांनी आपले भाषण संविले.



भाषणाची ठळक वैशिष्ट्ये

• सैनिकांचे शौर्य, साहस, पराक्रम देशातील माता- भगिनी-मुलींना समर्पित

• भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो, हे दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटले नसले.

• दहशतवादी तळांवर हल्ला केला तेव्हा त्यांच्या इमारतीच नव्हे, तर धीरही खचला.

• ग़ेल्या दोन-अडीच दशकांपासून पाकिस्तानात मोकाट फिरणार्‍य दहशवाद्यांच्या म्होरक्यांना एका क्षणात संपविले.

• नैराश्यात गेलेल्या आणि बिथरलेल्या पाकिस्तानने आमच्या शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदिरे, समाान्यांची घरे लक्ष्य केली.

• पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारताने आकाशातच नष्ट केल्याचे जगाला दिसले.

• पाकिस्तानचे केवळ आपल्या सीमेवर वार, भारताचा पाकिस्तानच्या छातीवर प्रहार.


आमच्या माताभगिनींच्या कपाळावरील ‘सिंदूर’ पुसण्याचा परिणाम काय होतो, हे आता प्रत्येक दहशवाद्याला आणि त्यांच्या संघटनांना समजले असेल. हे केवळ ‘ ऑपरेशन’ चे नाव नाही. कोटी कोटी जनतेच्या भावनांचे ते प्रतिबिंब आहे. ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.7 मे रोजी सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेचे परिणामात रुपातंतर होताना बघितले.

Comments


bottom of page