अपघाताला जबाबदार कोण!
- Navnath Yewale
- Jun 15
- 3 min read

अहमदाबाद येथे झालेला भीषण विमान अपघात आणि दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान मुंबई उपनगरिय रेल्वेमार्गांवर घडलेली दुर्दैवी घटना. सुन्न करणाऱ्या या दोन घटना मागील आठवड्यात घडल्या. दोन्ही अपघातात निष्पाप प्रवाशांचा बळी गेला. या दोन्ही अपघाताला जबाबदार कोण आहे हे अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी प्रशासनाचा ढिसाळपणा या दोन्ही घटनाना जबाबदार आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. दोन्ही अपघातात कोणतीही चुक नसताना निष्पाप प्रवाशांचाच मृत्यू झाला. तरीही मदतीच्या बाबतीत दुजाभाव झाला. विमान अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना एक कोटी रुपयांची मदत मिळाली तर रेल्वे दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना फक्त पाच लाख रुपये मिळाले.
त्यामुळेच रेल्वेने प्रवास करणारी माणसे नव्हती का! अशा प्रश्न सामान्यांसमोर निर्माण झाला. विमान अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबाना एक कोटी रुपयांची मदत मिळाली याचे दुःख अजिबात नाही त्यांचा तो अधिकार आहे. दुःख आहे ते या गोष्टीचे की रेल्वेच्या अपघातात मृत झालेल्या कुटुंबियांना मिळालेली केवळ पाच लाख रुपयांची मदत. या पाच लाख रुपयात निराधार झालेल्या महिलेचा तीच्या मुलांचा संसार उभा राहू शकेल का हा प्रश्न आहे.
मंगळवार 9 जून रोजी मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानका दरम्यान दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात चालत्या रेल्वेमधून 13 प्रवाशी खाली पडले आणि चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघी मुंबई सुन्न झालेली असतानाच दोनच दिवसात गुरुवार 11 जून रोजी दुपारी दिढ वाजता अहमदाबाद येथे झालेला भीषण विमान अपघाताने सारा देश सुन्न झाला. अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंग्लंडला निघालेल्या टाटा समुहाच्या एअर इंडिया विमानाने आकाशात झेप घेतली आणि अवघ्या 50 सेकंदात अवकाशात भरारी घेतलेले हे विमान खाली कोसळले. केवळ सहाशे फुट उंच पोहचलेल्या या विमानाचे अचानक इंजिन बंद पडले. अशाही संकट प्रसंगी वैमानिकाने आपले कौशल्य दाखवित विमानावर नियंत्रण ठेवत विमान खाली आणण्याचा प्रयत्न केला पण वैमानिकाचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान जवळच असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या गच्चीवर येउन आढळले.
विमान इमारतीवर आढळल्यावर जे व्हायचे ते झाले. पेट्रोल टाकीचा स्फोट झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. एक लाख किलोहून जास्त भरलेल्या पेट्रोल टाकीचा स्फोट होताच संपूर्ण विमान आणि आसपासचा परिसर आगीच्या भक्षस्थानी सापडला. यामुळे विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. परंतु या भीषण अपघातातून एका प्रवाशाचा जीव वाचला गेला. असे जरी असले तरी या अपघातात आणखी एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या गच्चीवर हे विमान आपटले गेले त्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या काही डॉक्टरांचाही मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी अवस्थेत आहेत. या अपघातात एक स्पष्ट दिसत आहे की जर फनेल झोन मध्ये इमारती नसल्या असत्या आणि केवळ मोकळी जागा असली असती तर वैमानिकाला विमान जमिनीवर उतरविणे सहज यश आले असते आणि अनेकांचे प्राण वाचविता आले असते. पण भारतातील अनेक विमानतळाच्या बाहेरील फनेल झोन अस्तित्वातच नसल्यानेच अशा कठीण प्रसंगी वैमानिकासमोर पर्यायच शिल्लक राहत नाही त्यामुळे वैमानिकाला स्वतःबरोबर इतरांनाही मृत्युंच्या दारी घेऊन जावे लागते. कालचा अहमदाबादचा अपघात हे त्याचेच उदाहरण आहे.
चर्चा मुंबईच्या फनेल झोनची
मुळात आकाशात भरारी घेताना विमानाला आग लागणे हे काही नवीन नाही. जगभरात अशा घटना घडतच असतात. म्हणूनच टेक ऑफ च्या दिशेने समुद्र असणे तितकेच गरजेचे असते.. सोईचे असते. किंबहुना टेक ऑफ समुद्राच्या दिशेने होईल अशी दिशा ठरवूनच विमानतळाची उभारणी केली जाते. देशातील सर्वात बिझी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही उभारणी याच पद्धतीने केलेली आहे. दिवसाला हजारो विमाने या विमानतळवरून आकाशात भरारी घेतात परंतु नागरी वस्तीवर विमान कोसळण्याची घटना कधीच घडली नाही. 1960 पासून म्हणजेच जवळपास 65 वर्षे या विमानतळच्या फनेल झोन मध्ये माझे वास्तव आहे. दर दोन मिनिटांनी या विमानतळवरून विमानाचे टेक ऑफ होत असते पण एखादे विमान कोसळेल असे कधीही मनाला वाटले नाही किंबहुना मनात शंका आली नाही. इतका विश्वास फनेल झोन मध्ये राहणाऱ्या नागरिकांचा वैमानिकांवर आहे.
तरीही माझ्या या 65 वर्षाच्या या कालावधीत दोन घटना घडल्या. त्यापैकी एक घटना मी प्रत्यक्ष पाहिली. जानेवारी 1978 साली मुंबईहून टेक ऑफ घेतलेल्या एअर इंडियाचे सर्वात मोठे ' सम्राट अशोका' नावाचे जम्बोजेट विमान अरबी समुद्रात कोसळले. पण फनेल झोन मधील नागरिकांना ते समजलेच नाही. 23 क्रू मेम्बरसह 213 प्रवासी घेऊन हे विमान दुबईला चालले होते परंतु समुद्रात पोहचताच हे विमान डाव्या बाजूला झुकले त्यानंतर ते सरळ झालेच नाही. अखेर ते कोसळले आणि क्रू मेम्बर सह 213 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सांताक्रूझ परिसरातील नागरिकांनी सहा महिने मासे खाणे बंद केले होते. तर दुसरी घटना ऑक्टोबर 1976 ची आहे.परीक्षा असल्याने अभ्यास करीत असताना भल्या पहाटे बाहेर गोंधळ ऐकू आला. बाहेर जाऊन पाहतो तर सांताक्रूझ विमानतळावरून आकाशात झेपावलेल्या विमानाच्या शेपटीकडील भागाने पेट घेतलेला होता. प्रथम वाटले की लढाऊ विमानात मागून आग येत असते तसे असावे.
पण आगीचे लोळ वाढत गेले भल्या पहाटेच्या अंधारात हे आगीचे लोळ स्पष्ट आणि भयाण वाटत होते. तो पर्यंत विमानाने पश्चिम रेल्वेचा मार्ग ओलांडून जुहू च्या दिशेने निघालेले दिसले आम्हाला वाटले हे विमान समुद्रात उतरविले जाईल परंतु तसे झाले नाही काही सेकंदातच हे विमान विमानतळाच्या दिशेने वळविण्यात आले. या विमानाने वळण घेताना आणखी पेट घेतला. प्रचंड ज्वाळा घेऊन येताना विमान दिसताच फनेल झोन मधील नागरिकांची तारांबळ उडाली. विमानाला पूर्णतः आगीने लपटलेले असूनही वैमानिकाने आपले कौशल्य दाखवित विमानतळाचा परिसर गाठला. माझे घर मुख्य धावपट्टीच्या मुख्य फनेल झोन मध्ये असल्याने पळण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण आगीचे लोळ घेऊन येणाऱ्या विमानाचा वेग पाहता झोपलेल्या माणसांना उठून पळणे शक्यच नव्हते. अखेर जे होईल ते स्वीकारायचे असे समजून वैमानिकावर विश्वास दाखवून फनेल झोन मधील नागरिक देवाचा धावा करीत तिथेच उभे राहिले.
अगीचा लोळ घेत विमान 500, 400, 300 फूट करीत खाली आले आणि विमानतळाच्या हद्दीत येताच वैमानिकाने विमान धावपट्टीवर न नेता धावपट्टीच्या बाहेर असलेल्या चिखलात विमानाचे नाक आपटविले त्यामुळे शेपटीचा भाग नागरी वस्तीवर न कोसळता विमानतळ परिसरातच कोसळला. या विमानाचे वैमानिक कॅप्टन गुप्ते होते. आमच्या नागरी वस्तीपासून केवळ 300 मीटरवरच असलेल्या इमारतीत ते राहत होते. त्यामुळेच त्यांनी नागरी वस्तीला वाचविले असावे. दिल्लीला जाणारे इंडियन इअरलाईन्स ते विमान होते. हे विमान सकाळी दिल्लीला जाणार होते परंतु विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला उशीर झाला होता. प्रवाशांच्या सततच्या मागणीमुळे अखेर पहाटे या विमानाने टेक ऑफ केले.
यासाठी घरी झोपलेले कॅप्टन गुप्ते यांना बोलाविण्यात आले असल्याचीही त्यावेळी चर्चा होती. आणि जे व्हायचे होते ते झालेच तांत्रिक बिघाडामुळे 16 तास उशिरा निघालेल्या विमानाला आग लागली आणि आतील वैमानिकासह 95 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. पण 1976 नंतर अशी आग लागण्याची घटना कधीच घडली नाही. आजही मी मुख्य धावपट्टीच्या मुख्य फनेल झोन मध्ये नसलो तरी साईड फनेल झोन मधील इमारतीत सातव्या मजल्यावर राहत असून दर दोन मिनिटांनी टेक ऑफ करणाऱ्या विमानांचा आनंद घेत असतो. विमान कोसळेल अशी मनात कधीच शंका आली नाही. अहमदाबादच्या घटनेनंतरही शंका निर्माण झाली नाही. हे सारे लिहिण्याचे कारण इतकेच आहे की विमानाचा अपघात अहमदाबाद येथे झाला. हा अपघात कसा झाला हे चौकशीअंती सर्वांसमोर येईलच. तरीही प्रसारमाध्यमातून नको नको ते अंदाज वर्तविणे सुरूच आहे.
विमानाच्या अपघाताबाबत काहीच सापडत नाही असे समजताच. प्रसारमाध्यमानी मुंबईचा फनेल झोनकडे आपला कॅमेरा वळवीला. वास्तविक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा टेक ऑफ चा मुख्य फनेल झोन इतका स्पष्ट आहे की अहमदाबाद सारखी घटना मुंबईत घडली असती तर कोणत्याही अडचणी शिवाय वैमानिकाला विमान लँडिंग करणे सहजच शक्य झाले असते. कारण मुख्य धावपट्टीच्या समोरच जुहू विमानतळाची धावपट्टी आहे. किंबहुना टेक ऑफ च्या दिशेनेच कधी विमान लँडिंग करणे सोपे व्हावे यासाठी पश्चिम दृतगती महामार्गांवरील दिव्यांच्या पोलची उंचीही कमी ठेवण्यात आलेली आहे. असे असले तरी विमानतळाच्या बाहेरच विमानतळ प्राधिकरणाने उभा करण्यात आलेला ATC ( हवाई वाहतूक नियंत्रक ) टॉवर वैमानिकांना अडचणीचा ठरत आहे. असे मधल्या काळात चर्चा होती. किंबहुना विदेशी वैमानिकांनी याबाबत तक्रारी केल्याचेही वृत्त होते. पण याबाबत प्रसार माध्यमातून फारसी चर्चा होत नाही. जे विकले जाते त्याचीच प्रसार माध्यमे चर्चा करताना दिसतात.
त्यामुळेच मंगळवारी मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा दरम्यान 13 प्रवाशी पडून झालेल्या अपघाताची दखल प्रसारमाध्यमानी तितकीसी घेतली नाही कारण या अपघाताचा माल विक्रीला जाण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांची ताजमधील भेटीबाबाताचा माल प्रसारमाध्यमानी गुरुवारी सकाळपासूनच विक्रीला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंब्रा येथील रेल्वे अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांचा प्रश्न आपसूकच मागे पडलाच होता. किंबहुना हा प्रश्न आणि राज उद्धव एकत्रित येण्याचा मुद्दा मागे पडावा यासाठीच ही भेट होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. परंतु दुर्दैव असे की राज आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बाजारात चर्चा रंगण्यापूर्वीच दुपारी दिढ वाजता एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला. यामुळे फडणवीस - राज ठाकरे यांच्या भेटीचा कार्यक्रम तिथेच संपला. आता जो पर्यंत बाजारात दुसरा माल विक्रीसाठी येत नाही तोपर्यंत अहमदाबाद अपघातावर प्रसारमाध्यमांची चर्चा सुरूच राहणार.
रेल्वे अपघाताची चर्चा व्हायला हवी.
वास्तविक मुंब्रा स्थानकादरम्यान मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताची चर्चा व्हायलाच हवी होती. कारण रेल्वे ही सामान्यांच्या जीवनाशी निगडित आहे. दर दिवशी 60 लाखाहून अधिक प्रवाशी उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. याच प्रवाशांच्या खिशातून हजारो कोटी रुपये रेल्वे प्रशासन जमा करीत असते पण सुधारणा मात्र मुंबईतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या किती पटीत केली जाते हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. या विषयावर प्रसारमाध्यमानी चर्चा करायला हवी होती. मुंबईतून मिळणारे रेल्वेचे उत्पन्न सामान्यांना चटकन लक्षात येऊ नये यासाठीच स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तिकिटाच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देणाऱ्या मुंबईकरांच्या नशिबी काय आहे हे एकदा डहाणू, वसई, विरार,कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा, बदलापूर, या गाडीतून प्रवास करून पाहावा. नरक परवडला असेच म्हणावे लागेल.
गाडीत चढल्यावर दरदिवशी वेगवेगळ्या प्रवाशांना मिठ्या माराव्या लागतात इतकी गर्दी असते. तरीही उपनगरीय रेल्वेचा हा प्रवाशी ' नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे ' या केशवसूतांच्या कवितेतील ओळीप्रमाणे दुसऱ्या दिवशी हा प्रवासी नव्या दमाने गाडीत चढतो नव्हे घुसतो आणि आपल्या सर्व अवयवांना बिन पैशाने मॉलिश करूनच नियोजित स्थानकावर उतरतो. स्थानकावर उतरताच भेटरलेल्या अवस्थेत तो आपल्या सर्वच वस्तूंची चाचपणी करतो. इतकी दयनीय अवस्था उपनगरीय रेल्वे प्रवाशांची आहे. यामुळेच दरवर्षी अडीच ते तीन हजार प्रवाशांचा अपघातात जीव जातो. या मृत्यूला कधी प्रवाशी जबाबदार असतात तर कधी प्रशासन जबाबदार असते. तसे पाहिले तर केवळ उपनगरीय रेल्वेत दरवर्षी अपघातात बळी पडणाऱ्या तीन हजार प्रवाशांबाबत जबाबदार रेल्वे प्रशासनच आहे असेच म्हणावे लागेल. कारण हे बळी रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधाचेच आहेत असे ठासून म्हणावे लागेल. आज मुंबईत मेट्रो धावत आहे पण प्रवाशांच्या बळीची संख्या नाही. कारण सर्व सुविधाने परिपूर्ण अशी मेट्रो आहे. यबाबत MMRDA मेट्रो चे अध्यक्ष संजय मुखर्जी यांचे कौतुक करायलाच हवे.
जर मेट्रो प्रशासन प्रवाशांना योग्य त्या सुविधा देऊ शकतात तर MRVC (मुंबई रेल विकास महामंडळ ) प्रवाशांना योग्य त्या सुविधा का देऊ शकत नाहीत हा प्रश्न आहे. दिवा - मुंब्रा स्थानका दरम्यान गाडीबाहेर फेकले गेलेले 13 प्रवासी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच पडले असेच म्हणायला हवे. कारण मुंब्रा स्थानक येण्यापूर्वी जे वळण आहे ते अत्यंत घातकी आहे. या वळणावर प्रवाशांच्या हातावर ताण येऊंन नियंत्रण सुटू शकते कारण गाडीचा वेग अधिक असतो. पूर्वी या मार्गांवर धिम्या गाड्या धावत होत्या. परंतु दोन नवीन मार्ग झाल्याने धिम्या गाड्या नवीन मार्गांवरून धावत आहेत तर धिम्या गाड्या ज्या मार्गांवरून धावत होत्या त्या मार्गांवर आता जलद गाड्या धावत आहेत. त्यामुळेच शार्प टर्न म्हणजेच निमूळत्या वळणाचा जलद गाडीतील प्रवाशांना अधिक त्रास होऊ लागला आहे. यामुळेच हे 13 प्रवाशी पडले असावेत असे म्हणावे लागेल. पण रेल्वे प्रशासनाला त्याचे सोयर सुतक काहीच नाही. त्यांनी फुटपट्टी आणली...मापं घेतली...आणि दोन मार्गमधील अंतर योग्य आहे असे सांगून मोकळे झालेत. याबाबत महाराष्ट्र शासनाने काहीच जाब विचारला नाही.
मुख्यमंत्री पासून विरोधी पक्षातील राज्यकर्त्यांनी माना डोळावल्या. पण एकही राज्यकर्ते घटना स्थळी पोहचले नाहीत आणि 13 प्रवाशी कसे पडले याची पाहणी केली नाही. ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले ना उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले ठाणे म्हणजे शिंदे आणि शिंदे म्हणजे ठाणे तेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले नाहीत. मुंबई आमचीच असे सांगणारे ठाकरे बंधू पोहचले नाहीत आणि स्वतःला महाराष्ट्राचे नेते समजणारे आदित्य ठाकरेही घटनास्थळी पोहचले नाहीत. ना विरोधी पक्षाचे नेते पोहचलेत. याचे कारण एकच रेल्वेमधून माणसे नाहीत तर जनावरे प्रवास करतात हाच या साऱ्या नेत्यांचा झालेला समज. आणि जनावरे अधून मधून मरतच असतात त्यामुळेच दरवर्षी उपनगरीय रेल्वेत अडीच ते तीन हजार प्रवाशी मरत आहेत नव्हे रेल्वे प्रशासन मारत आहे असे म्हणणे योग्य ठरेल. तरीही महाराष्ट्राचे राजकीय नेते शांतच असतात ते आपले राजकारण खेळत असतात.
त्यामुळेच रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांना पाच लाख रुपयांची भिख दिली जाते. होय ही भिखच आहे असेच म्हणावे लागेल. या पाच लाख रुपयाने निराधार झालेल्या त्या मृत व्यक्तीच्या पत्नीचा आणि मुलांचा संसार कसा चालेल याचा विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा. राज्यकर्ते असा विचार करत नसतील तर जनतेला एकदिवस नक्कीच विचार करावा लागेल. कारण मृत्यू हा कोणालाच प्रिय नाही पण रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे जर प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्युंची भरपाई किती द्यावी याचे स्पष्ट नियम करायला हवेत. जर अहमदाबाद च्या विमान अपघातात प्रवाशांना एक कोटी रुपये मिळत असतील तर रेल्वे अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांना एक कोटी रुपये का मिळू नये असा प्रश्न सामान्यांसमोर निर्माण होत आहे. रेल्वेने प्रवास करणारी माणसे नव्हती का! की ती जाणवरे होती! असाही प्रश्न निर्माण होतो.
याचा अर्थ असा नव्हे की विमानाने प्रवास करणाऱ्या मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना एक कोटी मिळू नये. ते मिळायलाच हवे किंबहुना दोन कोटी रुपये मिळाले तरी दुःख नाही. दुःख आहे हे की...रेल्वेने प्रवास करताना मरण आले तर केवळ पाच लाख रुपये इतकी तुटपुंजी रक्कम दिली जाते. आणि अपघात स्थळावर पाहणी करायला कोणीच राजकीय नेते पोहचत नाही. ही अशी तफावत का! सारेच तर भारताचे नागरिक आहेत. एक देश एक इलेक्शन ची आपण घोषणा देतो. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या चुकीमुळे कोणाचाही मृत्यू झाला तर सर्वांनाच समान मदत मिळायला हवी त्यात तफावत असता कामा नये. विमानातून फिरणाराही माणूस आहे त्याचे कुटुंब आहे आणि रेल्वेतून फिरणाराही माणूस आहे आणि त्याचेही कुटुंब आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा.
सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक,
संपादक वृत्तमानस, मुंबई.
रविवार दि. 15 जून 2025
दूरध्वनी! 8928055927*
Comments