top of page

आनोखा धार्मिक वारसा! मुस्लिम देशात बांधले 156 फूट उंच शिवमंदिर

इंडोनेशियातील जावा बेट, आपल्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच, प्राचीन हिंदू संस्कृती आणि वास्तुकलेचे एक महत्वाचे केंद्र राहिले आहे. योग्याकार्ता शहराच्या जवळ असलेलं प्रबंनन मंदिर हे याचे उत्तम उदाहरण आहे. एप्रिलमधील कोरड्या हंगामात, मोठ्या संख्येने पर्यटक या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात. इतिहास आणि संस्कृतीत रस असणार्‍यांसाठी या स्थळाला मोठे महत्व आहे. स्थानिक पातळीवर‘ चंडी प्रबंनन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या विशाल मंदिर संकुलाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश आहे.


9 व्या शतकात बांधलेले हे मंदिर, वास्तुकलेच्या दृष्टीने प्रसिद्ध बौद्ध मंदिर ‘ बोरुबुदूर’च्या समकालीन मानले जाते. एके काळी, या संपर्णू संकुलात 200 हून अधिक लहान-मोठी मंदिरे होती, जी या प्रदेशात हिंदू धर्माच्या प्रसाराची कहानी सांगतात. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जूलै रोजी इंडोनेशियाच्या पंतप्रधानांसोबत या मंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे या मंदिराचे वैशिष्ट्य आणि इतिहास नक्कीच जाणून घेतले पाहिजे.


इतिहासानुसार हे मंदिर संजय घराण्याचे राजे रकाई पिकातन यांनी इ.स.856 च्या सुमारास बांधले होते. हिंदू मंदिर त्या काळात माताराम साम्राज्यात बौद्ध धर्माचा वाढता प्रभाव असताना बांधले गेले. हे केवळ एक धार्मिक स्थळ म्हणूनच नव्हे, तर तत्कालीन राज्याच्या सांस्कृतिक आणि सामरिक स्थानाचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. सुमारे 4,200 चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या मंदिर संकुलात एक भव्य रचना आहे. त्याच्या सभोवतालचे मार्ग आणि त्यातील 240 लाहन पॅगोडा त्याची अद्वितीय कलाकुसर दर्शवतात. जावाच्या ज्वालामुखीच्या मैदानांमध्ये उभी असलेली ही वास्तू अनेक ऐतिहासिक बदल आणि राजवंशी कालखंडाची साक्षीदार आहे.


प्रबंनन संकुलाचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य शिव मंदिर, जे सुमारे 156 फूट उंच असून संपूर्ण संकुलातील सर्वात उंच वास्तू आहे. भगवान शिवाला समर्पित असलेले हे मंदिर त्या काळातील अभियांत्रिकी आणि स्थापत्यकलेचे कौशल्य दर्शवते. त्याच्याा गर्भगृहाकडे जाण्यासाठी अरुंद पायर्‍या आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवरील कोरीव कामांमध्ये भारतीय महाकाव्य रामायणातील दृश्यांचे चित्रण आहे. अ‍ॅडेसाइट दगडांवर कोरलेल्या अप्सरा, देवता आणि इतर आकृत्यांमध्ये जावानी कला आणि भारतीय संस्कृतीचा संगम स्पष्टपणे दिसून येतो. या दगडी कोरीव कामांवर पडणारा सुर्यप्रकाश आणि शांत परिसर पर्यटकांना मोहित करतो.


इंडोनेशियाला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांसाठी योग्यकार्ता एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. येथे पर्यटकांना स्वत:च्या संस्कृतीचा आणि रामायणाचा एका नव्या दृष्टिकोनातून अनुभव घेण्याची संधी मिळते. मंदिराच्या खुल्या रंगमंचावर सादर होणारे सायंकाळचे ‘ रामायण बॅले’ हे नृत्यनाट्य पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. जे भारत आणि जावा यांच्यातील ऐतिहासिक संबंधावरप प्रकाश टाकले.


प्रबंनन मंदिर हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर आग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीच्या ऐतिहासिक प्रभावाचा एक जिवंत पुरावा आहे. इतिहास, वास्तुकला आणि प्राचीन परंपरा यांचा हा संगम प्रत्येक पर्यटकावर एक चिरस्थानी ठसा उमटतो. भारत इंडोनेशियाला जोडणारा ऐतिहासिक पूल समजून घेण्यासाठी योग्याकार्ताला भेट देणे हा एक मार्ग आहे.

Comments


bottom of page