top of page

आम्ही मराठी आहोत, त्याचबरोबर हिंदूही आहोत; बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील - मुख्यमंत्री फडणवीस



हिंदी भाषेच्या सक्तीचा शासन आदेश रद्द करायला लावल्यानंतर आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे माहाराष्ट्रातील दोन बडे नेते आणि चुलत भाऊ तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आले. वरळीच्या विजयी मेळाव्यात मराठी मुद्यावरून राज आणि उद्धव यांनी एकत्रित आपले विचार मांडले. भाषणाच्या सुरुवातील राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास ठाकरी शैलीमध्ये टोला लगावला. ‘ जे बाळासाहेबाना जमलं नाही, इतरांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं ”, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.


“ मी राज ठाकरे यांचे आभार मानतो की दोन बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. सध्या बाळासाहेबांचे अशीर्वाद मलाच मिळत असतील. मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालचे भाषण झाले. मराठी बद्दल एकही शब्द न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये घ्या, आम्हाला निवडूण द्या, अशी ओरड दिसली. हा मराठी विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचे दर्शन कार्यक्रमात झाले ” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


“त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. मोदींच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरामोहरा बदलवला. आम्ही बीडीडी चाळ, पत्राचाळ, अभ्युदय नगर येथील मराठी माणसाला हक्काची मोठी घरं त्याच ठिकाणी दिले. मी नेहमी सांगतो की‘ पब्लिक है सब जानती है’. मुंबईतला मराठी असो की अमराठी, सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे. पण त्याचवेळी आम्ही हिंदूही आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारे हिंदुत्व ” असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

Comments


bottom of page