top of page

आयएसआयएस साठी काम करणार्‍या दोघांना एनआयए कडून विमातळवरुन अटक

पुण्यात बॉम्ब बनवलेला प्रकरण; दोन वर्षापासून होते फरार




राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधीत दोन फरार आरोपींना अटक केली आहे. 2023 मध्ये पुण्यात आयईडी ( स्फोटक यंत्र) तयार करणे आणि चाचणी करणे या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या महितीनुसार, विमानतळावरुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख अब्दुल्ला फयाज शेख, उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी झाली आहे. दोघेही जकार्ता (इंडोनेशिया) येथे लपले होते. शुक्रवारी रात्री ते भारतात परतत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 वर इमिग्रेशन ब्युरोने त्यांना थांबवले आणि ताब्यात घेतले. यानंतर एनआयए च्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेवून अटक केली, असे तपास यंत्रणेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


दोन वर्षापासून होते फरार :

दोन्ही आरोपी दोन वर्षाहून अधिक काळ फरार होते आणि मुंबईतील एनआयए च्या विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होते. एनआयए ने दोन्ही आरोपींवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहिर केले होते. निवेदनात असेही म्हटले आहे की, हे प्रकरण या आरोपींनी रचलेल्या गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे. तसेच आयएसआयएस शी संबंधीत पुणे, ‘स्लीपर सेल’ च्या आठ इतर सदस्यांना आधीच अटक करण्यात आली आहे. ते आधीपासूनच तुरुंगात आहेत.


देशविरोधी कारवायांचा आरोप

एनआयए ने म्हटले आहे की, या आरोपींनी भारतातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता. आरोपींनी आयएसआयएस च्या अजेंड्यानुसार हिंसाचार आणि दहशतवादाच्या माध्यमातून देशात इस्लामिक राजवट प्रस्तापित करण्यासाठी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचला होता.


पुण्यात भाड्याच्या घरात बनवला ‘बॉम्ब’

पुण्यातील कोंढवा येथे अब्दल्ला फयाज शेख याने भाड्याने घेतलेल्या घरात आयईडी बनवण्यात हे दोघे जण सहभागी होते. 2022-23 या कालावधीत आरोपींनी या ठिाकणी बॉम्ब बनवणे आणि प्रशिक्षण देण्याशी संबंधित कार्यशाळेचे आयोजन केले आणि त्यात भाग घेतला. याव्यतिरिक्त, त्यांनी तयार केलेल्या आयईडी ची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोट देखील केला.


यांनाही अटक :

तपास एजन्सीने सांगितले की, अब्दल्ला फयाज शेख आणि तल्हा खान यांच्याशिवाय या प्रकरणात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, आकिफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी अटक़ करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Commentaires


bottom of page