top of page

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार,अनेकजण जखमी; तातडीने कर्फ्यू लागू


आसाममधील कार्बी आंगलोंगमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात तातडीने कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करवा लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने 6 दुचाकींना आग लावली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता हा हिंसाचार इतर जिल्ह्यांमध्येही पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.


हे पहा (व्हिडीओ) :https://youtu.be/CZT-d0k7nfU


आंगलोंग जिल्ह्यातील चराई जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करणार्‍यांना हटवण्यासाठी आंदोलन सुरू होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बीएनएसचे कलम 163 लागू केले आहे. पुढील आदेशापर्यंत हे कलम लागू असणार आहे. हा निर्णय असामाजिक घटकांना जातीय किंवा सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यापासून रोखण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे.


जिल्हा दंडाधिकारी निरोला फांगचोपी यांनी संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. संध्याकाळी 5 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांवर आणि खासगी वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात रॅली, धरणे आंदोलन, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने, फटाके फोडणे, प्रक्षोभक भाषणे, पोस्टर्स आणि परवानगीशिवाय लाऊडस्पीकरचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पोलिस, निमलष्करी दल आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकार्‍यांना यातून सूट देण्यात आली आहे. वैद्यकीय आपत्कालीन सेवांना यातून सूट देण्यात आली आहे.


हे पहा (व्हिडीओ) :https://youtube.com/shorts/anWnG5y-7x4?feature=share


शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे (परिक्षांसाठी), सरकारी आणि खासगी कार्यालये नेहमीप्रमाणे खुली असणार आहेत.

दरम्यान, आंदोलकांनी व्हिलेज ग्राझिंग रिझर्व्ह (व्हिजीआर) आणि प्रोफेशनल ग्राझिंग रिझर्व्ह (पीजीआर) जमिनींवर बेकायदेशीर कब्जा करणारांना बाहेर काढण्याची मागणी केली आहे. यातील बहुतेक लोक बिहारमधील आहेत. या आंदोलनात 22 तारखेला आंदोलनकांनी कार्बी आंग्लोंग ऑटोनॉमस कौन्सिल (केएएस) चे मुख्य कार्यकारी सदस्य (सीईएम) तुलीराम रोंगांग यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली होती, त्यामुळे हे आंदोलन चिघळले आहे.

 
 
 

Comments


bottom of page