
इंदापूरचे श्री. हर्षवर्धन पाटील यांनी ‘शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील भाजपा आणि महायुती यांना हा मोठा राजकीय दणका आहे. या निर्णयाचे पश्चिम महाराष्ट्रात तरी मोठे परिणाम होणार आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील गेल्या २५ वर्षांत जे प्रभावी मंत्री मी पाहिले, त्यांच्याजवळ निर्णय क्षमता आहे... व्यक्तिमत्त्व आहे.... संघटन आहे... आणि निर्णय अंमलात आणण्याची क्षमता आहे, अशा नेत्यांची यादी पािहली तर जी नावे समोर येतात त्यात विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील अशी कर्तबगार नेते मंडळींची नावे समोर येतात... त्या आगोदरच्या पिढीत अगदी १९६२ पासून पाहिले तर यशवंतराव चव्हाण, मा. स. कन्नमवार, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, अशी तगडी टीम होती. १९६३ पासून नाईकसाहेब मुख्यमंत्री, बाळासाहेब देसाई, शंकरराव चव्हाण, पी. के. सावंत, विनायकराव पाटील, बॅ. शेषराव वानखेडे, मधुकरराव चौधरी, स. गो. बर्वे, राजारामबापू, यशवंतराव मोहिते, प्रतिभाताई पाटील, १९६७ नंतर शरद पवार, बॅ. अंतुले, शंकरराव बाजीराव पाटील, दादासाहेब रूपवते, अशी जबरदस्त टीम पुन्हा महाराष्ट्रात कधी होणार नाही. १९६० ते १९८० या २० वर्षातच महाराष्ट्राची खरी बांधणी झाली. त्यानंतरच्या ४४ वर्षांत म्हणजे १९८० ते २०२४ महाराष्ट्राला फारशी राजकीय स्थिरता लाभलेली नाही आणि पहिल्या २० वर्षांत झालेल्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्राची बांधणी तर अजिबात झाली नाही. १९८० नंतरच्या पिढीमध्ये निर्णय घेण्याचा वकूब असलेली, विषय समजणारी, निर्णय अंमलात आणण्याची कुवत असणारी आणि एक दरारा-दबका असणारी.... कसलेही आरोप न झालेली अशी जी मंडळी होती त्यात सुशीलकुमार शिंदे असतील... बाळासाहेब थोरात असतील... त्यात हर्षवर्धन पाटील हेही आहेत. ते हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे घराणे गेली ६०-७० वर्षे काँग्रेसशी जोडलेले... १९५२ च्या निवडणुकीत शंकरराव बाजीराव पाटील निवडून आले... ते हर्षवर्धन पाटील यांचे काका. हर्षवर्धन हे त्यांचेच राजकीय वारसदार... १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वादळात पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त ७ उमेदवार निवडून आले होते. त्यात खुद्द यशवंतरावसाहेब (कराड), वसंतदादा पाटील (तासगाव), बॅ. जी. डी. पाटील(मिरज), बाळासाहेब देसाई (पाटण), बाळासाहेब भारदे (अहमदनगर), निर्मलाराजे भोसले (अक्कलकोट) आणि इंदापूरहून शंकरराव बाजीराव पाटील... अशा या घराण्यातील हर्षवर्धन पाटील... २०१९ च्या निवडणुकीनंतर ते भाजपामध्ये गेले.. राजकारणात अशा काही गोष्टी घडतात... त्याला कारणेही असतील.. पण, ‘त्यांनी भाजपामध्ये जाऊ नये,’ असे महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी नेत्यांना वाटत होते. पण ते गेले.... ‘त्यांच्या हाती काही लागणार नाही... भाजपा त्यांना वापरून घेईल,’ असे मी त्या वेळी लिहिले होते.... पण योग्य वेळी ते परत आले..... त्यांचे ‘परत येणे’ हा त्यांचा एकट्याचा निर्णय नाही.... तर इंदापूर मतदारसंघातील जागरूक कार्यकर्ते आणि मतदारांनी हजारोंच्या संख्येने एकत्र जमून हर्षवर्धन पाटील यांना स्पष्टपणे बजावले की, ‘झाले तेवढे पुरे झाले.. इंदापूर तालुका १० वर्षे मागे पडलेला आहे.. तुम्ही आता ‘तुतारी’ हाती घ्या.... निवडणुकीला उभे रहा... आम्ही जिवाजी बाजी लावून तुम्हाला निवडून आणू....’ हे सांगणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या हजारोंत होती... आणि मग तिथे गजर झाला... ‘राम कृष्ण हरी.... हाती घ्या तुतारी...’
थेट प्रक्षेपण झालेला तो मेळावा मी पूर्णपणे पाहात होतो... हर्षवर्धन पाटील यांनी अतिशय संयमित अाणि राजकीय परिपक्वतेची भूमिका मांडली... त्यांनी जे स्पष्ट केले त्यात कुठेही राजकीय ताठा नव्हता. गेले २ वर्षे जे काही चालले आहे, त्याची त्यांनी पूर्ण कल्पना फडणवीस यांना भेटून दिली होती. तसे त्यांनी त्या मेळाव्यात स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला.... ‘आपण काय करायचे, तो िनर्णय द्या... मी निर्णय तुमच्यावर सोपवलेला आहे.’ दहा कार्यकर्त्यांची भाषणे झाली.... त्या सर्वांनी सांगितले, ‘आता तुतारी हातात घ्यायची वेळ आली आहे...’ त्यानंतरही हर्षवर्धन यांनी सांगितले की, ‘तुमचा हा निर्णय मी मान्य करतो.... तसे पत्रकार परिषदेत जाहीर करतो... पण त्याचा अर्थ ‘मी उद्याचा उमेदवार असेन’ असे जाहीर करण्याचा मला अधिकार नाही. आपण दुसऱ्या पक्षात गेल्यावर या मतदारसंघात तिकीट देण्याचा अिधकार त्या पक्षाच्या अध्यक्षाचा आणि संसदीय मंडळाचा आहे.’ त्यांचे कालचे निवेदन अतिशय संयमित होते. कार्यकर्ते कमालीचा आग्रह करून आपल्या नेत्याला योग्य रस्ता घ्यायला भाग पाडतात... हा असा परिपक्व राजकीय शहाणपणा महाराष्ट्रात क्वचित दिसतो... नाही तर सामान्यपणे नेता आधी निर्णय करत असतो. आणि तो निर्णय कार्यकर्त्यांना सांगतो... हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवला.... ते सर्व पाहात असताना मला १९९५ च्या इंदापूरच्याच मतदारसंघाची आठवण झाली. त्या निवडणुकीतही काँग्रेसने हर्षवर्धन यांना तिकीट दिले नव्हते. ते मुंबईहून परत गेले.. तेव्हा त्यांच्या घरी १० हजार कार्यकर्ते जमले होते. त्यांनी आग्रह धरला की, ‘अपक्ष उभे रहा...’ ते अपक्ष उभे राहिले... आणि निवडून आले. १९८५ साली संगमनेर मतदारसंघात असेच घडले होते. बाळासाहेब थोरात यांनाच काँग्रेसने तिकीट नाकारले होते. आणि श्रीमती शकुंतला थोरात यांना तिकीट दिले होते.... बाळासाहेब संगमनेरला घरी परत आले तर बाहेर हजारो कार्यकर्ते जमले होते.... त्यांनी बाळासाहेबांना घरात जाऊच दिले नाही... ‘आधी अपक्ष उभे राहण्याचे जाहीर करा, मग घरात जा....’ मग बाळासाहेब थोरात अपक्ष उभे राहिले... निवडून आले... मग काँग्रेसमध्ये आले.... नंतर सलग ८ वेळा काँग्रेस पक्षातर्फे आमदार झाले आणि आता पुन्हा ते मैदानात उतरतील.... यापूर्वी शंकरराव कोल्हे (१९७२- काेपरगाव), अनंतराव थोपटे (१९७२-भोर) यांनाही काँग्रेसने तिकीट नाकारले होते. ते नंतर अपक्ष उभे राहिले... निवडून आले... मग काँग्रसमध्ये आले.. महाराष्ट्रात यापूर्वी काँग्रेस पक्षाने अशा गंमती केलेल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील यांनी १९९५ च्या युती सरकारतही राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. विलासराव देशमुख यांच्या मंित्रमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून ते प्रभावी होते. पृथ्वीराजबाबा यांच्या मंित्रमंडळात ते सहकारमंत्री होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षासह कार्यकारी मंडळ बरखास्त करून, तेथे प्रशासक नेमण्याचा निर्णय पृथ्वीराज बाबा यांनी घेतला. मात्र बाळासाहेब अनासकर यांची नेमणूक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी २८ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर केली. कार्यक्षम सहकारी नेत्याला प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव हर्षवर्धन पाटील हे सहकार मंत्री असतानाच त्यांनी सादर केला होता. दरम्यान, पृथ्वीराज बाबांचे सरकार गेले. श्री. बाळासाहेब अनासकर यांनी खूप मोठ्या तोट्यातील बँक आज कोट्यवधी रुपये नफ्यात आणली. तो वेगळा विषय आहे... मुद्दा हर्षवर्धन यांचा आहे.... मी गेली ६५ वर्षे विधानमंडळ पाहतो आहे... जवळजवळ सगळे मुख्यमंत्री, मंत्री त्यांची कामाची पद्धत, आवाका, निर्णय अंमलबजावणीची क्षमता आणि सुसंस्कृतपणा... हे सगळे खूप जवळून अनुभवलेले आहे. १९६० च्या नंतरची ४० वर्षे वेगळा महाराष्ट्र होता.... नंतरचा महाराष्ट्र काहीसा धटींगण झाला... आणि आज त्याची फळे आपण भोगतो आहोत.... कुठे होतो.... कुठे जायचे ठरवले होते.... आणि कुठे चाललो आहोत.... कशाचा कशाला मेळ नाही... त्याबद्दल अनेकदा लिहिले आहे... पण आता लोकशाही आघाडीने प्रचारात जी आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन होईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पवारसाहेब सातारा येथील सभेत पावसात भिजले तेव्हा त्यांचे वर्णन ‘सह्याद्री पावसात भिजला’, असे झाले... त्यानंतर ५ वर्षे पुढे सरकली आहेत. पवारसाहेब गेल्या १० वर्षांत केंद्रामध्ये सत्तेत नाहीत. वयाच्या ७४ वर्षांवरून ते ८४ वर्षांपर्यंत पोहोचले आहेत... पण, १० वर्षांपूर्वीपेक्षा अधिक त्यांची राजकीय ताकद, दणकट इच्छाशक्ती हे महाराष्ट्राला पुन्हा पहायला मिळालेले आहे. पक्षाचे चिन्ह गेले तरी या बहाद्दर गड्याने ते १० वाजून १० मिनिटे झालेले, बंद पडलेले, घड्याळ मतदारांना विसरायला लावले... महाराष्ट्रभर ते भिंगरीसारखे फिरत आहेत. १९८० साली असेच घडले होते. बॅ. अंतुले यांनी पवारसाहेबांचे ५० आमदार उचलले... त्यात गोविंदराव आदिक, प्रतापराव भोसले असे दिग्गज होते. त्यावेळचे पवारसाहेब ४० वर्षांचे हाेते. त्यांनी नवीन ४० तरुण हुडकून काढले... मग कमलकिशोर कदम, भारत बांेद्रे, दिलीप ढमढेरे, संभाजी कुंजीर, ज्ञाानेश्वर खैरे असे तरुण शोधून काढून ५० च्या ऐवजी ५४ निवडून आणले. पवारसाहेब हे काय आहेत, हे महाराष्ट्र ५० वर्षे सतत बघत असताना, अजूनही ते कोणाला कळलेले नाहीत. सत्तेत नसताना त्यांची ताकद काय, हे त्यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले. त्याचा दुसरा अंक आता सुरू होणार आहे.
इंदापूरची विधानसभेची निवडणूक मतदारांनी हातात घेतल्याचे तो मेळावा पाहताना जाणवले. काही पत्रकारांनी हर्षवर्धन पाटील यांना प्रश्न विचारला की, ‘तुम्ही एकेकाळी पवारसाहेबांच्या कट्टर विरोधात होतात...’ हर्षवर्धन यांनी त्याचे उत्तर दिले नाही, हे फार चांगले झाले... चुकलेले राजकारण चुका सुधारण्यासाठी असेल.... तर हर्षवर्धन यांचा निर्णय योग्य आहे... राजकारणात कोणाची भांडणे होत नाहीत? राजकारणाचे सोडा... घरात तरी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडते का? भांडणे होतात की नाही? होतातच... पण ती किती ताणायची... अहो, बाकीच्यांचे जाऊद्या... खुद्द यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा यांचे भांडण झालेच होते ना.... ते इतके ताणले गेले की, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत चव्हाणसाहेबांच्या विरुद्ध शालिनीताई पाटील विरोधात उभ्या राहिल्या... दादांनाच जाणवले की, ‘साहेबांना विरोध करणे योग्य नाही... शालिनीबाई निवडणुकीत पराभूत झाल्या तरी चालतील...’ पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे... चव्हाणसाहेब ५० हजार मतांनी निवडून आले.... पण चव्हाणसाहेबांना जाणवत होते की, दादांशी भांडण कायम ठेवणे योग्य नाही... धुळप्पा आण्णा नवले, बाजीराव पाटील यांनी पुढाकार घेतला आणि आज हे खरे वाटेल का..... एवढ्या दोन नेत्यांचे भांडण मिटवण्याचा विषय जाहीर करून श्री. क्षेत्र औदुंबर येथे १९८१ साली जाहीर सभा झाली.... सभेचा विषय काय....? ‘मोठेसाहेब आणि दादांचे भांडण मिटवणे...’ दोघेही मनाने मोठे.... दोघेही सभेला आले... दादा म्हणाले, ‘साहेबांशी भांडण झाल्यामुळे महाराष्ट्राचे फार नुकसान झाले...’ यशवंतराव उत्तरात म्हणाले, ‘दादा, महाराष्ट्राचे नुकसान झाले की नाही, मला माहिती नाही... पण तुमचे आणि माझे मात्र खूप नुकसान झाले... आपण भांडायला नको होते... राजकारण दोन घडीचे असते... असे प्रसंग विसरायला शिकायला हवे...’ यशवंतरावांचे ते भाषण आजही महाराष्ट्रातील वाद-विवाद करून भांडणे करणाऱ्यांसाठी एक वस्तुपाठ आहे..... अर्थात त्यावेळी ‘भांडणे’ मुद्द्याची होती... सत्तेसाठी नव्हती... पळवा पळवीची नव्हती...किंवा धाक-धपटशाहीची नव्हती. ते मर्यादित अर्थाने मतभेद होते. त्या भांडणात शत्रूत्त्व नव्हते... ‘संपवून टाकण्याची’ भाषा नव्हती... ‘ठोकून काढा’, ही भाषा नव्हती... भांडणारे नेते मोठे हाेते... पण ते सर्व नेते आकाशातील तारे होते.. अापण छोट्या माणसांनी त्या भांडणांची फार चर्चा करणे योग्य नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना त्या पत्रकाराने प्रश्न विचारला त्याला त्यांनी नेमके उत्तर दिले..
‘नो कॉमेंटस...’
तर असे हे हर्षवर्धन आता पुन्हा पुरोगामी महाराष्ट्राच्या मैदानात उतरलेले आहेत. ते काँग्रसमध्ये होते.... आता राष्ट्रवादीत आहेत.... हाही फार वादाचा मुद्दा नाही... ते आता आघाडीत आहेत, मी असे मानतो की, सध्याच्या सरकारचा पराभव करण्याकरिता काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असा कोणताही भेद न करता जे-जे सरकार विरोधात उभे राहतील त्यांचा पक्ष एकच.... त्याला नाव काहीही द्या.... सध्याच्या सरकारचा पराभव करा.... हाच एक पक्ष.... एवढे लक्षात ठेवा... मग भांडणेच होणार नाहीत.
आणि काँग्रेस असो... राष्ट्रवादी असो... गांधी-नेहरू यांचा विचार घेवूनच पवारसाहेब भाषणे करीत आहेत. आणि त्यामुळे ‘राम कृष्ण हरि.... हाती घ्या तुतारी...’ हा गजर आता पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा दणाणणार... त्यामुळे ‘हर्षवर्धन यांचे येणे’ अगदी नेमक्यावेळी झाले... छान वाटले... पुरोगामी महाराष्ट्रातील प्रत्येकाला या निर्णयाचे समाधान आहे. आता कसलाही वाद-विवाद न होता महाराष्ट्राला पुन्हा ते वैभवाचे दिवस आणू या... हर्षवर्धन यांनी मोकळ्या मनाने आणि संयमित शब्दाने, कोणावरही टीका न करता, त्यांची भूमिका अतिशय नेटकेपणानी मांडली... त्यांच्यातील आक्रमक वक्ताही मी पाहिलेला आहे... काल संयमित नेत्याचेही दर्शन घडले. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! इंदापूरच्या निर्णयानंतर पश्चिम महाराष्ट्रात ठामपणे हे सरकार अाणि महायुती यांच्या विरुद्ध महापूर येणार... हे निश्चित...
सोमवार, दि. ७ अॅाक्टोबर रोजी इंदापूर येथे श्री. शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे, असे समजले. जमले तर जाईन म्हणतो... अशा कार्यक्रमात खूप काही शिकायला मिळते... जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी होतात. छान वाटते... अकलुजला सुशीलकुमार यांच्या सत्कारानिमित्त गेलो...विजयसिंह मोहिते-पाटील यांना घरी भेटलो.... काही वेळ ते गदगद झाले... राजन पाटील तर कडकडून भेटले... धनाजी साठे भेटले. बाहेर फिरण्याचा हा फायदा आहे... मन ताजे-तवाने होते. इंदापूरचा कार्यक्रम तर पश्चिम महाराष्ट्रात धमाका करणारा कार्यक्रम आहे... जायलाच हवे..
सध्या एवढेच
मधुकर भावे
Comments