
इस्राईल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या युद्धात आता लेबनॉन आणि इराणनेही उडी घेतली आहे. इस्राईलने लेबनॉनवर तर इराणने इस्राईलवर हल्ला केला आहे. इराणने इस्राईलवर २०० हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला याला प्रतिउत्तर म्हणून इस्राईलने पुन्हा लेबनॉनवर हल्ला करतानाच इराणला देखील बदला घेण्याचा इशारा दिला. इराण आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष वर्षभरानंतरही चालूच आहे. गेले वर्षभर या दोन देशात युद्ध सुरू आहे. पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईल मध्ये घुसून हल्ला केल्यावर इस्राईलने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर हल्ला करून ती अक्षरशः जमीनदोस्त केली.
या युद्धात हजारो नागरिक मारले गेले असून लाखो जखमी आहेत तरीही हा संघर्ष सुरूच आहे. इस्राईल पॅलेस्टाईन आणि लेबनॉनवर हल्ले करतच आहे. इस्राईल पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या केवळ लष्करी किंवा दहशतवादी तळांवर हल्ले करीत नसून नागरी वस्तीवर देखील हल्ला करीत आहे. पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने देखील इस्राईलवर जो हल्ला केला होता त्यात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. पॅलेस्टाईनने अपहरण केलेल्या शेकडो इस्राईली नागरिकांना अद्यापही सोडले नाही. हा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे नव्हे तो तीव्र होत चालला आहे. अर्थात हा संघर्ष आताचा नाही तर काही दशकांचा आहे. इस्राईल- पॅलेस्टाइन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने जग दोन भागात विभागले गेले आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रांससह अनेक मोठ्या राष्ट्रांनी इस्राईलची बाजू घेतली आहे तर मुस्लिम राष्ट्रे पॅलेस्टाइनच्या बाजूने उभी आहेत. भारतातही सोशल मीडियावर आय स्टँड विथ इस्राईल, आय स्टँड विथ पॅलेस्टाइन असे युद्ध रंगले आहे. इस्राईल - पॅलेस्टाइन हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्यामागे धार्मिक वाद कारणीभूत आहे. जेरुसलेम हे अत्यंत प्राचीन शहर आहे. या शहरात यहुदी, ख्रिश्चन आणि मुस्लिम या तिन्ही धर्माच्या पवित्र धार्मिक स्थळांचा मिलाफ आहे. साहजिकच या ठिकाणी कोणताही धार्मिक वाद निर्माण झाला तर जगातील निम्म्याहून अधिक देशांवर याचा प्रभाव पडतो. जेरुसलेम या शहराची स्थापना ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माच्या उदयापूर्वी झाली आहे. ई स पूर्व ९३७ मध्ये यहुदी राजा सुलेमानने येथे भव्य सिनेगॉग ( यहूदिंचे पवित्र धार्मिक स्थळ ) बांधले. कालांतराने या भागावर परकीय आक्रमणे झाली. अनेक धार्मिक क्रांत्या झाल्या आणि त्यांनी सिनेगॉग च्या ठिकाणी आपल्या धर्माची प्रार्थना स्थळे उभारली. मूलनिवासी यहूदिंना तेथून हुसकावून लावले. यहुदी लोक आपली संपत्ती घरदार सोडून जगभरात मिळेल त्या ठिकाणी राहू लागले. या काळात पवित्र सिनेगॉगही नष्ट करण्यात आला.
सध्या त्याची केवळ एक भिंत शिल्लक आहे तिला वेलींग वेल असे म्हणतात. यहुदी लोक तिला अत्यंत पवित्र मानतात. या भिंतीच्या पूर्व दिशेला अल अकसा मशीद आहे. मक्का आणि मदिना प्रमाणेच मुस्लिम लोक या मशिदीला पवित्र मानतात. तर याच शहरात चर्च ऑफ होली स्कप्लचर हे ख्रिश्चन लोकांचे पवित्र स्थान आहे. याच शहरात रोमन सम्राटाने प्रभू येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले होते. त्यामुळे हे शहर या तिन्ही प्रमुख धर्मासाठी अत्यंत पवित्र असे शहर आहे. त्यामुळे जेरुसलेमवर अधिपत्य स्थापन करणे हा तिन्ही धर्मीयांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. जेरुसलेम हे शहर इस्राईल मध्ये आहे. इस्राईल हा यहुदिंचा म्हणजेच ज्यूंचा देश आहे. इस्राईल हा मध्यपूर्वेतील महत्वाचा देश असून त्याच्या आजूबाजूला सर्व मुस्लिम राष्ट्रे आहेत.
जेरुसलेम शहर आमचेच असून इस्राईलने त्यावर कब्जा केला आहे असा दावा हमास या संघटनेने केला आहे. जेरुसलेमला इस्रायलपासून मुक्त करून तिथे पॅलेस्टाइन राष्ट्र निर्माण करणे हे या संघटनेचे ध्येय आहे. तर हमास ही दहशतवादी संघटना असून तिला आमच्या देशात जागा नाही जर हमासने आमची खोड काढली तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असे इस्रायलचे धोरण आहे त्यामुळेच कित्येक दशके हा संघर्ष सुरु आहे. यावेळी मात्र या संघर्षाने उग्र स्वरूप धारण केले आहे हा संघर्ष जर लवकर मिटला नाही तर त्याची मोठी किंमत जगाला मोजावी लागेल. या संघर्षाला धार्मिक किनार असल्याने हा संघर्ष धार्मिक युद्धाचे रूप घेऊ शकतो म्हणूनच हा संघर्ष वेळीच मिटला पाहिजे त्यासाठी जगातील मोठ्या राष्ट्रांनी मध्यस्थता करायला हवी.
- श्याम ठाणेदार, पुणे
Comments