उद्धव ठाकरे विधान परिषदेवर तर शरद पवार राज्यसभेवर जाणार? परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला? महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला?
- Navnath Yewale
- Feb 25
- 1 min read

मुंबई: 6 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यसभेसाठी महायुतीकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, शरद पवार राज्यसभेवर जाणार तर परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
शरद पवार राज्यसभेवर? : शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार हेच मविआचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. घटक पक्षांची शरद पवारांसोबत चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. राज्यसभेसंदर्भात 2 दिवसात चर्चा करून निर्णय होणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सांगितले. तर, या आठवड्यात मविआच्या बैठकीत राज्यसभेवर कोण जाणार यावर शिक्कामोर्तब होईल असा दावा सतेज पाटलांनी केले.
शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे, शरद पवार पुन्हा राज्यसभेवर गेल्यास देशाला त्यांचा फायदा होणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. त्यामुळे काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणे, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही शरद पवारांसाठी आग्रही आहेत, शरद पवारांचं नाव निश्चित झाल्याची माहिती असाली, तरी प्रत्यक्षात सर्वच पक्ष राज्यसभेवर आपला दावा सांगत होते. मविआत रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात असताना वाटाघाटी झाल्या आहेत.
पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आणि काँग्रेसचे 16 आमदार आहेत. मविआकडे एकूण 46 आमदारांचं संख्याबळ होतं. छोटे पक्ष पकडल्यास सपाचे 2 आणि माकपचा 1 असे 3 आमदार म्हणजेच मविआकडे 49 आमदरांचं संख्याबळ आहे. राज्यसभेत निवडून जाण्यासाठी 37 मतांची गरज आहे. त्यामुळे मविआकडे केवळ 49 आमदार असल्यामुळे त्यांचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडणूक जाणार.



Comments