top of page

उपमुख्यमंत्री शिंदेच्या ‘जय गुजरात’ नार्‍यावर घमासान

अमित शहांना खूष करण्यासाठी लोटांगण, किशोरी पेडणेकर यांची टिका


उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ‘जय गुजरात’ च्या नार्‍यामुळे शिवसेनेला आयतेच कोलित मिळाले आहे. शिंदे यांचा हा नारा म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांना खूष करण्यासाठी घातलेले लोटांगण असल्याची टीका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. एकनाथ शिंदे स्वत:ला खरी शिवसेना मानतात आणि लोकांना तसे भासवतात. मात्र आज देशाच्या गृहमंत्र्यांसमोर ते लाचार झाले. ‘जय महाराष्ट्र’ बरोबरच ‘जय गुजरात’ म्हणणे म्हणजे हिंदीबरोबर आता गुजरातील शिकणे बंधनकारक होईल याचीच ही सुरुवात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर ‘जय महाराष्ट्र जोडीने ‘जय गुजरात’ असा नारा दिला. त्यामुळे राजकीय वातावरणात त्याचे पडसाद उमटले. किशोरी पेडणेकर यांनी समाजमाध्यमांवर शिंदे यांच्यावर टीका केली आहे.


दरम्यान, पेडणेकर म्हणाल्या की, बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो असे एकनाथ शिंदे कायम भासवत आहेत, पण बाळासाहेबांनी कधीही ‘जय गुजरात ’ म्हटले नाही. बाळासाहेबच काय पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ‘ जय गुजरात ’ चा नारा मान्य करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, कारकीर्द महाराष्ट्रात झाली ते ‘ जय गुजरात ’ कधीच म्हणणार नाहीत. मात्र शहांना खूष करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सपशेल लोटांगण घातले आहे. मी तुमचा पाईक आहे हे त्यांना दाखवण्यासाठी आणि अडीच वर्षानी मला मुख्यमंत्रीपद द्या याची आठवण करून देण्यासाठी शिंदे असे करीत आहेत असंही पेडणेकर म्हणाल्या.


भाजप महाराष्ट्रात आग लावण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करीत आहे. आधी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून झाला, जातीयवाद झाला, आता भाषेच्या मुद्यावरून भांडणे सुरू झाली. त्यापाठोपाठ प्रांतवादही सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाल्याचा आरोपही त्यांनी केला.


एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ च्या नार्‍याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दखल घेतली आहे. गुजरातच्या तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचललेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलेच , अशी पोस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार यांनी सोशल मिडियावर केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या याच नार्‍याचा वापर करीत कनसैनिकांनी शनिवारी होणार्‍या मेळाव्याचीही जाहिरात केली आहे. कळलं? उद्या मराठी माणसाने एकत्र येण्याची गरज का आहे? असा सवाल करत मनसैनिकांनी मराठी माणसांना यानिमित्ताने साद घातली आहे.

Comments


bottom of page