top of page

एएआयबीच्या अहवालावर रोहित पवार संतप्त, परवा मुंबईत विस्तृत बोलेल - रोहित पवार

उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात दुर्घटनेबाबत त्यांचे पुतणे रोहित पवार हे सुरुवातीपासूनच संशय व्यक्त करत आहेत. दरम्यान आज या अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल समोर आला आहे. एएआयबीकडून 22 पानांचा प्रथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. हे विमान जमिनीला धडकण्यापूर्वी झाडावर कोसळलं आणि मग जमिनिला धडकलं असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा दृश्यमान देखील कमी होते, असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.


अपघातापूर्वी शेवटच्या मिनिटांमध्ये नेमंक काय घडलं? शेवटचं संभाषण काय होतं, याची माहिती देखील या अहवालामध्ये देण्यात आली आहे. 8 वाजून 29 मिनिटं, 25 सेकंद इथपासून ते 8 वाजून 46 मिनिट आणि 13 सेकंदांपर्यंत म्हणजे अपघातापर्यंत विमान आणि बारामती एटीसी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला? याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे. शेवटच्या काही सेकंदामध्ये पायलट ओशेट, ओशेट असं म्हटला परंतु त्याला बारामती एटीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या अहवालानुसार आता रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्राथमिक अहवालामध्ये बारामती एअरफिल्ड हे बारामती जिल्ह्यात आहे, असा उल्लेख या प्राथमिक अहवालामध्ये करण्यात आला आहे, आता नेमक्या याच चुकीवर बोट ठेवत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.


रोहित पवारांचे ट्विट : ‘ प्राथमिक अहवालात एएआयबी ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? सीआयडी या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील “बारामती एअरफिल्ड हे बारामती जिल्ह्यात आहे ” हे वाक्य एएआयबी ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आह. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

Comments


bottom of page