किरीट सोमय्यांच्या आरोपांतून हसन मुश्रीफ यांना क्लिन चीट
- Navnath Yewale
- Jun 26
- 2 min read
ईडी चे छापे, पुराव्याचा गाठोडे तरीही....; किरीट सोमय्यांना धक्का

ढिगभर कागदपत्रांचा आधार घेत आरोपांचा धुराळा उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना आणखी एक धक्का बसला आहे. किरीट सोमय्या यांनी आर्थिक घोटाळ्याबाबत आरोप केलेल्या प्रकरणात राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोर्टाने दिला दिला आहे. मुश्रीफ यांना पोलिसांनी आणि कोर्टाने क्लिन चीट दिली आहे. वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अखेर क्लिन चीट मिळाली आहे. मुरगूड पोलिसांनी कागल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट(सी-समरी) दाखल केल्यानंतर,त्यावर आधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. आता मुश्रीफ यांच्या विरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केल्याने, त्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याच्या आधारेच अंमबजावणी संचलनालय (ईडी) कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ही क्लिन चीट मुश्रीफ यांच्यासाठी महत्वाची मानली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले होते आरोप:
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षापूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटी रुपयांच्या अफरातफरीचे आरोप करत मोठा राजकीय वाद निर्माण केला होता. त्यानंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. ईडीने मुश्रीफ यांच्या घरावर छापा मारला होता. ही कारवाई अनेक तास सुरू होती. ईडीच्या छाप्यांपासून ते अटकपूर्व जामिनाच्या अर्जांपर्यऐत, संपूर्ण घटनाक्रमात मुश्रीफ सतत केंद्रस्थानी होते. या प्रकरणात 10 मार्च 2023 रोजी उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम संरक्षण दिले होते. दरम्यान, त्यांनी महायुतीत प्रवेश करत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदही मिळवले.
अतिरिक्त सरकारी वकील आशिष सातपुते यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, मुरगूड पोलिसांनी कागल न्यायालयात ‘सी-समरी’ क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती,जी आता निकाली काढण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांना दुसरा धक्का :
किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात आरोप केले होते. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांना काही वर्ष तुरुंगात काढावी लागली होती. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ, त्यांचे पीए श्याम राधाकृष्ण मालपाणी यांना कोर्टाने दोषमुक्त केले होते. भुजबळांसह त्यांचा मुलगा व पुतण्यालाही आधीच मुळ गुन्ह्यातून दोषमुक्त केले आहे. आता मंत्री हसन मुश्रीफ यांनाही क्लिन चीट मिळाल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दुसरा धक्का मानला जात आहे.
Comments