top of page

जागतिक आदिवासी दिनाची जोरदार तयारी

Updated: Jul 27

पारंपरिक थाटात रॅलीचे आयोजन; मनमोहक सोहळ्याची उत्सुकता

 

ree

"जय जोहार!" या पारंपरिक अभिवादनासह आदिवासी एकतेचा निर्धार करत, डोंगरपाडा व परिसरातील ग्रामस्थ आणि युवकांनी येत्या ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात, पारंपरिक वेशभूषा आणि आदिवासी वाद्यांच्या गजरात साजरा करण्यात येणार आहे.  


रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी झालेल्या नियोजन बैठकीत एकमताने या दिनासाठी कार्यक्रमाचे विस्तृत आयोजन निश्चित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही रॅलीच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या अस्तित्व, संस्कृती आणि हक्कांचा जागर करण्यात येणार आहे.


कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९:३० वाजता काटीलपाडा येथील वाघोबाच्या पूजेनंतर होणार असून, सर्व सहभागी शनवारपाडा येथील वाघोबाच्या ठिकाणी एकत्र जमा होतील. या ठिकाणी पूजा, चहा आणि नाश्ता झाल्यानंतर सकाळी १०:३० वाजता रॅलीला सुरुवात होईल.


रॅली कोकाटपाडा मार्गे डोंगरिपाडा येथे पोहचेल, जिथे पुन्हा वाघोबाची पूजा होईल. त्यानंतर रॅली इभाडपाडा मार्गे तलासरी उड्डाणपुलाखाली पोहचेल. या ठिकाणी समाजप्रबोधनपर थोडकं मार्गदर्शन आणि स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.


पुढे रॅली तलासरी नाका, गोडाऊनमार्गे पुन्हा सूत्रकार ठिकाण डोंगरपाडा येथे पोहचेल. येथे सर्वांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून समाजाचा एकोपा, संस्कृतीची ओळख आणि हक्कांचा जागर व्यक्त केला जाणार आहे.

या नियोजन बैठकीला नवजीवन युवा मित्र मंडळ, प्रगती ग्रुप, अष्टविनायक मित्र मंडळ तसेच गोवरसेतपाडा, लाखनपाडा, वेडगपाडा, कोकाटपाडा, सायवन, रायपूर, वेवजी, सवरोली, काजळी, कोचाई, उपलाट, तलासरी आणि परिसरातील विविध गावांतील मित्र मंडळांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीचे सूत्रसंचालन जयेश वेडगा आणि सचिन बेंदर यांनी केले, तर सुनील इभाड,  सुरेश परहेड, अनिल मोहनकर यांसह अनेकांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या पुढील तयारीसाठी २ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता नियोजन बैठक आयोजित करण्यात आली असून, सर्व मंडळांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

यावर्षीही आदिवासी समाज आपल्या समृद्ध परंपरा, सांस्कृतिक ओळख आणि हक्कांसाठी एकत्र येत "९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन" मोठ्या अभिमानाने साजरा करणार आहे.

Comments


bottom of page