जामखेडमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश; राहुरी तालुक्यातील दोघे ताब्यात
- Navnath Yewale
- Feb 15
- 1 min read

अहिल्यानगर/ राहुरी : तालुक्यातील फक्राबाद परिसरात शनिवारी (दि.14) अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दुध भेसळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राहुरी (जि. आहिल्यानगर) तालुक्यातील दोघांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी पोलिस निरिक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गेणश शिवानाथ लबडे यांनी स्वतंत्र पंचांसह फक्राबाद येथे तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहन क्रमांक एम.एच.17 के 7946 उभे आढळले. वाहनात एकूण दहा प्लास्टिक ड्रम आढळले, त्यापैकी सहा ड्रममध्ये पांढर्या रंगाचे दुधासारखे द्रावण असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत समीर कमरुद्दीन शेख (वय 30, रा. उंंबरे, ता. राहुरी) आणि आफताब कलीम शेख (वय 28, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) यांनी हे द्रावण दुधाची फॅट कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी पराफिन तेल व इतर अज्ञात रसायन वापरुन तयार केले असल्याचे सांगितले. त्यांनी हे द्रावण रामदास नवनाथ उबाळे (मु. पो. फक्राबाद , ता. जामखेड, व्यवसाय -दुध संकलन व पुरवठा) यांना पुरवठ्यासाठी आणले असल्याचे मान्य केले.
तपासणीदरम्यान द्रावणाचे दोन लिटर नमुने घेण्यात आले. तसेच घराच्या परिसरात पांढरट पिवळसर पावडर आणि दुध साठा आढळला. श्री. उबाळे म्हणाले की, ही पावडर दुधातील घटक (एसएनएफ) वाढविण्यासाठी वापरली जात होती. बडे यांच्या तपासणीनंतर अन्न सुरक्षा व मानके अधिकनियम 2006 आणि अन्न सुरक्षा नियम 2011 चे उल्लंघन केले असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी तीन व्यक्तीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



Comments