झरीतील बुलेट ट्रेनच्या गोदामाला आदिवासी शेतकर्यांचा विरोध
- Navnath Yewale
- Jul 30
- 1 min read
आदिवासी हक्कांचे काय? शेतकर्यांचा सवाल; सामायिक जमिनीवर गोदामाचा आरोप

तलासरी ; मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तलासरी तालुक्यातील झरी गावात सुरू असलेले गोदामाचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. स्थानिक आदिवासी आणि वहिवाटदार शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, ही जमीन अकृषिक परवानगीशिवाय व्यावसायिक वापरासाठी देण्यात आली असून, त्यामुळे त्यांचे हक्क डावलले गेले आहेत.
झरी येथील सर्वे नंबर २३७ हा "गोळा प्लॉट" स्वरूपाचा सामायिक भूभाग आहे. या जमिनीत आदिवासी आणि बिगर-आदिवासी खातेदारांचा सहभाग असून, स्थानिकांच्या मते बिगर-आदिवासी खातेदाराने आपला हिस्सा साई सौभाग्य डेव्हलपर्स या कंपनीमार्फत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी काम करणाऱ्या लार्सन अॅण्ड टुब्रो (L&T) कंपनीला गोदामासाठी भाड्याने दिला आहे. विशेष बाब म्हणजे, ही जमीन अजून अधिकृत पणे त्यांना दिली नसतानाही त्या ठिकाणी व्यावसायिक यांनी बांधकाम साठी लागलेल साहीत साठवण्यास सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या जमिनीवर शेती केली जात होती व काहींची नावे सातबाऱ्यावर वहिवाटदार म्हणून नोंदवलेली आहेत.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात न घेता व कोणतीही पूर्वसूचना न देता गोदामाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन तसेच आदिवासी हक्कांवर घाला घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी बाधित झालेल्या आदिवासी व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली असून, जमिनीची पुनर्मोजणी करून अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
कंपनीचे गोदाम आमच्या सामायिक जनिवर
"बुलेट ट्रेनचे काम करणाऱ्या कंपनीचे गोदाम आमच्या सामायिक जमिनीवर उभे आहे. आम्हाला कोणतीही नोटीस न देता व्यवहार करण्यात आला आहे. आमच्या हक्काची जमीन या गोदामात समाविष्ट झाली आहे. आम्हाला मोबदला देखील मिळालेला नाही."
( माह्या शिंगडा, आदिवासी खातेदार )
आमची जमिन आम्हाला परत मिळावी
"झारी गावातील या जमिनीत आमचे हिस्से आहेत. परंतु आम्हाला अंधारात ठेवून जमिनीचा व्यवहार करण्यात आला. आमच्या हक्कावर गदा आली असून, पुनर्मोजणी करून आमची जमीन आम्हाला परत मिळावी, ही आमची मागणी आहे."
( रघ्या खेवरा, वहिवाटदार शेतकरी )
"झरी येथील शेतकऱ्यांची तक्रार अर्जाद्वारे प्राप्त झाली आहे. चौकशी करण्यात आली असून संबंधित जमीन सामायिक असून, त्यांनी ती वैयक्तिक मोजणी करून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत."
अमोल पाठक, तहसीलदार, तलासरी :



Comments