top of page

डॉलर 100 रुपयांवर गेला तर पदाला साजेसा मोदींचा सत्कार करू!

नवीदिल्ली: देशातील वाढती महागाई, घसरता रुपया आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या उरोधिक पत्राची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. “ ज्या दिवशी एका डॉलरची किंमत 100 रुपये होईल, त्या दिवशी आम्ही दिल्लीत येऊन आपला स्वखर्चाने भव्य सत्कार करू, “ अशी खोचक मागणी सावजी यांनी पत्रातून केली आहे. यासाठी वेळ आणि तारीख द्यावी, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.


सुबोध सावजी यांनी पत्रात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना म्हटले आहे की, “ भारताच्या अर्थव्यवस्थेत डॉलर 100 रुपयांवर पोहोचणे हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असेल. आपल्या ‘ विश्वगुरू’ च्या नेतृत्वाखाली हा बहुमान देशाला मिळणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.” याचबरोबर त्यांनी भाजपच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली आहे. “ देशात जातीयवाद, धर्मवाद आणि जुमलेबाजीच्या आधारावर सरकारे आणली जात आहेत. याचाही देशवासियांना अभिमान आहे.” असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला.


दरम्यान, पत्रात पुढे सावजी यांनी नमूद केले आहे की, “ जे काम 70 वर्षात काँग्रेसला करता आले नाही, ते तुमच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. डॉलर 100 रुपयांवर पोहोचल्यावर आम्ही आपल्या पदाला साजेसा जाहीर सत्कार दिल्लीत येऊन करू.” या पत्रामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका होत असताना भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page