top of page

दादरच्या दीपोत्सवामुळे महाराष्ट्रात लक्ख प्रकाश!

ree

मराठी भाषेच्या मुद्यांवर एकत्रित आलेले  ठाकरे  बंधू  काल दीपोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमात एकत्रित आलेले दिसले.  मनसे आयोजित दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बहुचर्चित दीपोत्सवाचे उदघाटन करण्यासाठी चक्क उद्धव ठाकरे यांना आमंत्रीत करण्यात आले होते. यामुळे साहजिकच ऐन दिवाळीत ठाकरे बंधुची चर्चा रंगली.  राज ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चा दीपोत्सवाचा हा कार्यक्रम तसा दरवर्षी होतोच आणि यनिमित्ताने वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना आमंत्रित केले जातेच. कधी  देवेंद्र फडणवीस यांना,  तर कधी एकनाथ शिंदे यांना, असे अनेक नेते या दीपोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. असे असूनही या दीपोत्सवाचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रात कधीच पसरला नव्हता. केवळ दादर करानाच नाही तर संपूर्ण मुंबईकरांना हा दीपोत्सव अपुराच वाटतं होता.  या दीपोत्सव कार्यक्रमात कुठेतरी काहीतरी कमी आहे असेच सातत्याने मराठी माणसांना जाणवत होते. 

 

 अखेर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करून दीपोत्सव कार्यक्रमातील कमतरता राज ठाकरे यांनी काल पूर्ण केली.  उद्धव आणि राज ठाकरे यांचे कुटुंब पुन्हा एकदा जाहीर कार्यक्रमात एकत्रित आल्याने   मुंबईतील तमाम मराठी माणसांनी आनंद व्यक्त केला. गद्दारांना क्षमा नाही असे ठासून सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनीही या दीपोत्सव कार्यक्रमला आशीर्वाद दिला. छत्रपती शिवाजी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चेहऱ्यावरही आंनद झळकलेला दिसून आला. त्यामुळेच या दीपोत्सवाचा राजकीय प्रकाश उभ्या महाराष्ट्रात  आपसूकच पसरला गेला. पण  त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे राजकीय विरोधकांच्या भुवया मात्र उंचावल्या, विशेषतः शिंदे शिवसेनेच्या तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

 

 ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर  मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बोलावून राजकीय गुगली टाकल्याने सारेच राजकीय नेते अडचणीत आलेत.  तसे पाहिले तर शिवसेनेकडे राज ठाकरे वेळोवेळी टाळी मागतच होते. भाजपाचे सुडाचे राजकारण राज ठाकरे यांनी आधीपासूनच ओळखले होते. 'महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु आहे. सामान्यांना त्याचा तिटकारा आला आहे.' असे प्रत्येक सभेत सांगून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.  २०१४ साली 'लाव रे तो व्हिडीओ'  असे सांगून राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. देशाच्या राजकीय पटलावरून मोदी आणि शहा यांना संपवून टाका! असेही जाहीर आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे टाळी मागितली होती. पण त्याकाळात उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना भाजपाच्या घोड्यावर बसली होती. हिंदुत्वाचा अंगार त्यांच्या रोमारोमात संचारला होता.

 

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज यांना टाळी देण्याचे टाळले. त्यादिवसापासून राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षाने 'वेट अँड वॉच' ची भूमिका स्वीकारली. अखेर राज यांचा दूरदृष्टीपणा सत्यात उतरला. भाजपाच्या राजकारणाला कंटाळून उद्धव ठाकरे यांना भाजपाच्या घोड्यावरून उतरावे लागले किंबहुना  भाजपाने उद्धव ठाकरे यांना घोड्यावरून खाली फेकले आणि उद्धव यांच्या चाळीस मावळ्यांना फरफटत नेवून आपल्या तंबूत बांधले. त्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड घायाळ झाले होते. एकही सुभेदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लढला नाही लढण्यास तयारही झाले नाहीत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत एकतर्फी लढले आणि आजही लढत आहेत. अर्थात ते पत्रकार असल्याने. बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा मुलगा उद्धव यांच्या विरोधात भाजपा ज्या पद्धतीने उभी राहिली हे मराठी माणसांच्या मनाला तितकेसे पटले नव्हते. पण त्याचबरोबर राज ठाकरे यांना टाळी न देणे, उद्धव ठाकरे यांच्या या हट्टी स्वभावालाही मराठी माणसे विशेषतः शिवसैनिक फारच कंटाळले होते.

 

अखेर या महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरेच नाव पुसण्याचा विरोधकांच्या जेव्हा प्रयत्न सुरु झाला त्यावेळी उद्धव यांना राज ठाकरे यांना टाळी देण्याशिवाय पर्यायच नव्हता.  कारण राज जरी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा लहान असले तरी राज यांची महाराष्ट्रातील ताकत फार मोठी आहे. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यामुळे लहान मोठा असा भेदभाव न करता दोन्ही भावांनी एकत्रित यावे अशी तमाम मराठी माणसांची मनापासून इच्छा होती. मराठी माणसांची ही इच्छा जवळपास वीस वर्षांनी मराठी भाषेने पूर्ण केली. मराठी भाषेच्या मुद्यावरून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे मनोमिलन झाले. त्यानंतर राज यांच्या घरातील श्री गणेशाचे दर्शन, वाढदिवस, असे दोघां भावांनी एकेक पावले पुढे चालवीत संबंध वाढवीत कालच्या दीपोत्सव कार्यक्रमापर्यंत पोहचले. राज्यातील विशेषतः  मुंबईतील मराठी माणसांना काय हवे होते !  ठाकरे बंधूनी एकत्रित यावे हेच हवे होते. राज ठाकरे यांनी घेतलेल्या पुढाकाराने हे सारे सहज शक्य झाले. यामुळे राजकारणातील गणिते आपसूकच बदलली गेली. राज यांची 'मनसे' ची आणि उद्धव यांची 'शिवसेना' एकत्रित येणारच नाही असे सर्वच राजीकीय नेत्यांना वाटतं होते.  यामुळे दोघांच्या भांडणात मतांची विभागणी करून आपली कशी पोळी भाजता येईल याचेही आराखडे विरोधकांकडून रचण्यात आले होते. पण राज आणि उद्धव एकत्रित आल्याने सारे आराखडे निकामी ठरले.

 

त्यातच मतदार यादीतील घोळाबाबत सर्व विरोधी पक्षांसोबत राज यांनी पुढाकार घेतल्याने सत्ताधारी भाजपाला थोडेसे अडचणीचे ठरले आहे. प्रशासकीय यंत्रणेबाबत राज ठाकरे यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यामुळे मतदार यादीतील घोळ सुधारा! नवीन मतदार यादी तयार करा! मगच निवडणुका घ्या! अन्यथा घेऊ नका! असे राज यांनी स्पष्टच सांगितल्याने निवडणूक आयोगाचे टेन्शन वाढलेले आहे. राजकारणातील बदलते समीकरण पाहता एकनाथ शिंदे हे पुरते अडचणीत सापडले आहेत. 'इथे आड तिथे विहीर' अशीच त्यांची काहीशी अवस्था झालेली दिसत आहे. हिच परिस्थिती फार काळ राहिली तर शिंदे यांच्या सोबत आलेले त्यांचे सवंगडी त्यांच्या सोबत फार काळ राहतील अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. राज ठाकरे आपणास पाठिंबा देतील अशीही एकनाथ शिंदे यांना भाबडी आशा होती. पण कालच्या दीपोत्सवामुळे ही आशाही संपुष्ठात आली.

 

याबाबत  एकनाथ शिंदे यांचा ठाकरे कुटुंबाबाबताचा अभ्यास कमी पडला असेच म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे यांचे विरोधक राज ठाकरे आपणास पाठिंबा देतील यासाठीच सुरुवातीपासून शिंदे हे राज ठाकरे यांची सातत्याने भेट घेत होते. पण राज ठाकरे कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत  याचा शिंदे यांना विसर पडला.  इथेच शिंदे फसले. ज्यावेळी राज शिवसेनेतून बाहेर पडले होते, त्यावेळी मी त्यांना भेटलो असता ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्याबाबत वाईट सांगून कोणी शिवसेनेचे नेते माझ्याकडे येतं असतील तर त्यांना 'मनसे'  पक्षात घेणे दूरच त्यांच्याशी चर्चाच केली जाणार नाही. ते आज सत्यात उतरले.  इतके राज ठाकरे कुटुंबाबाबत प्रामाणिक आणि भावनिक आहेत.  मनात राग कोंडून न ठेवता सर्वाना सोबत घेऊन जाणे राज यांच्या या स्वभावामुळेच ठाकरे बंधू एकत्रित आले. याच ठाकरे बंधुचा आदर्श समोर ठेऊन केवळ शुल्लक्षा वादामुळे दुरावलेले मराठी  बंधू एकत्रित आले तर राज्यात खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा होईल आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही.

 

 

सुरेंद्र मुळीक,

संपादक, 'वृत्तमानस' मुंबई.

रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५

दूरध्वनी : ८९२८०५५९२

Comments


bottom of page