top of page

दापोली ते कांदिवली व्हाया नवी मुंबई ;सुडाच्या राजकारणाचा प्रवास

ree

पावसाळी अधिवेशन संपून दहा दिवस झालेत, पण  जगबुडी नदीतील रेती उपसापासून कांदिवली च्या  'सावली' लेडीज बार पर्यंतची चर्चा अजूनही सुरूच आहे.  किंबहुना सामाजिक कार्यकर्त्यां  अंजली दमानियामुळे या चर्चेने अधिक जोर धरला आणि रंगत आली. यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पुरते कोंडीत सापडले. दापोलीच्या साई रिसॉर्ट पासून सुरु झालेला हा सुडाचा प्रवास नवी मुंबई, कांदिवली करत  विधानभवनात पोहचला आणि योगेश कदम यांच्या राजीनामाच्या मागणीचा जोर वाढू लागला. आधीच अर्जुन खोतकर, संजय शिरसाट, संजय गायकवाड यांच्यामुळे अडचणीत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा योगेश कदम यांच्या प्रकरणाने  अडचणीत सापडले.  परिणामी फडणवीस सरकारबाबतही जनतेत नाराजी पसरू लागली. यातूनच मार्ग काढण्यासाठी किंबहुना  फडणवीस सरकारची पत वाचविण्यासाठी  वादग्रस्त मंत्र्यांकडून  राजीनामा घेण्यापेक्षा मंत्रिमंडळात फेरबदल करून या वादग्रस्त आणि वाचाळ मंत्र्यांना डच्चू देण्याची  शक्यता अधिक आहे. एकंदरीत शिंदे यांची राजकारणातील सध्याची स्थिती पाहता गुलजार यांची गझल आठवते..


इज्जत किसी इन्सान की

नही होती,

जरुरत की होती है!

जरुरत खत्म !

इज्जत खत्म !!

यही दुनिया का सच है!

 

 

'जे पेराल तेच उगवेल'  हे पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसून आले. यंदाच्या अधिवेशनात फडणवीस सरकारला घेरण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कसे घेरता येईल हेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ठरविले आणि त्यात उद्धव ठाकरे यशस्वीही झाले. याला कारण भाजपाने योग्य त्या प्रमाणात दिलेली साथ असेच म्हणावे लागेल. यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचे एकापाठोपाठ एक कारनामे बाहेर येऊ लागले. आणि आपसूकच उपमुख्यमंत्री शिंदे अडचणीत सापडू लागले. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच खासदार संजय राऊत यांनी हादरा दिला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा बेडरूम मधील एक व्हिडीओ  संजय राऊत यांनी प्रसिद्ध केला.

 

या व्हिडीओमध्ये  पैशाने भरलेली भली मोठी बॅग दिसत असून या बॅगेच्या बाजूलाच असलेल्या बेड वर बसून मंत्री शिरसाट सिगारेट फुकतांना दिसत आहेत. 'मै जिंदगी का साथ निभाता चला'..  'हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया'  असेच जणू काही ते एकनाथ शिंदे यांना सांगत असावे.  या व्हिडीओमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तरीही  माझ्या जवळ असलेल्या बॅगेत पैसेच नाहीत ते कपडे आहेत  असे सांगून मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या बेफिकीरी स्वभावानुसार सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिलीत. पण सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी या विषयाची जेव्हा दखल घेतली. तात्काळ शिरसाट यांनी मौन धारण केले. कदाचित एकनाथ शिंदे यांनी त्यांना सल्ला दिला असावा.

 

आधीच आमदार अर्जुन खोतकर यांच्या जवळच्या व्यक्तीजवळ धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यावधी रुपयांमुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले होतेच. त्यात संजय  शिरसाट यांच्या शेजारीच पैशानी भरलेल्या बॅगेच्या व्हिडीओ प्रसिद्ध झाल्याने एकनाथ शिंदे यांची चर्चा होणे स्वाभाविकच होते. आणि अशी आयती चालून आलेली संधी विरोधक कसे सोडणार! मंत्री संजय शिरसाट यांच्याजवळ असलेली बॅग म्हणजे  'पन्नास खोके,एकदम ओके' या योजनेतीलच आहे असा आरोप विरोधकांनी केला. संजय शिरसाट यांचे पैशाच्या बॅगेचे हे प्रकरण सुरु असतानाच शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास उपहार गृहातील एका  गरीब कामगाराला बॉक्सिंग स्टाईलने ठोका लगावत मारहाण केली.

 

रात्रीचा शिळा भात दिल्याने आमदार संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या कामगाराला मारहाण केली असल्याचे स्पष्ट झाले. पण त्याच वेळी पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने संजय गायकवाड यांनी कामगाराला केलेल्या मारहाणीचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षांनीच यात लक्ष घालावे असे सांगितले. यां साऱ्या प्रकरणातून एकनाथ शिंदे कुठे उसंत घेत असतानाच विधानपरिषदेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार ऍड. अनिल परब यांनी खेड मधील जगबुडी आणि आसपासच्या नद्यातील रेती उपसावर सभागृहाचे लक्ष वेधले. रेती उपसाची परवानगी एकाच व्यक्तीला का देण्यात आली यात एका राज्यमंत्र्याचा सहभाग आहे असाही आरोप अनिल परब यांनी केला. त्यांचवेळी स्पष्ट झाले की योगेश कदम हे अडचणीत येणार.  पण रेती उपसा हा पर्यावरणाच्या दृष्टीने तसा गंभीर विषय असला तरी चांदा पासून बांदा पर्यंत असलेल्या नद्यातील बेकायदेशीर रेती उपसा बिनबोभाटपणे सुरूच असतो.

 

यात वरपासून खालपर्यंत साऱ्यांचाच सहभाग असतो. रॉयल्टी च्या माध्यमातून जी काही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होते त्याच्या पन्नास पटीने रेतीचा उपसा केला जात असतो हे काही नवीन नाही. त्यामुळे रेती उपसा च्या प्रकरणातून गृहाराज्यमंत्री योगेश कदम यांना अडचणीत आणणे तितकेसे शक्य झाले नसते. म्हणूनच  अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच 'सावली' बार वर पोलीसानी घातलेल्या धाडीचे प्रकरण सभागृहात आणले गेले आणि अनिल परब यांनी अत्यंत प्रकर्षाने हे प्रकरण मांडले. अनुभवी असलेले अनिल परब यांनी हे  प्रकरण इतक्या ताकतीने मांडले की संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. कारण ज्या बार मध्ये पोलिसांनी धाड घालून 22 बार बालाना अटक केली तो 'सावली' बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री च्या नावावर आहे. यामुळे योगेश कदम आपसूकच अडचणीत आले.

अनिल परब यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना योगेश कदम यांचा अनुभव कमी पडला. त्यामुळे योग्य असे उत्तर देणे त्यांना जमलेच नाही. माझ्या आईची बदनामी केली. मी अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार इतकेच ते बोलू शकले. तसे पाहिले तर हे काही अचानक घडले नाही तर यामागे मागील दहा वर्षातील सुडाचा राजकारणाचा आणि भावकीचा वादाचा प्रवास आहे. आणि सत्ताधारी पक्षाची साथ आहे असे म्हटल्यास चूकीचे ठरणार नाही.

 

48 तासात सारे घडले

 

वडिलांचा फायदा राजकारणात, व्यवसायात ज्याप्रमाणे मुलाला मिळत असतो त्यांचप्रमाणे वडिलांचा असलेला वाद मुलाला भोगावेही लागतात. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्याबाबतीत नेमके हेच झाले आहे आणि होत आहे. रामदास कदम यांचा राजकारणात अनेकांशी वाद आहेच पण सख्खा भाऊ  सदानंद कदम यांच्याशीही टोकाचा वाद आहे. सख्खे भाऊ असूनही दोघांमध्ये विस्तवही जात नाही हे खेड दापोलीत सर्वांनाच माहित आहे. त्यात सदानंद कदम हे शिवसेना नेते ऍड.अनिल परब यांचे निकटवर्तीय. याच ताकतीवर सदानंद कदम यांनी खेड,  दापोली परिसरात व्यवसायाच्या माध्यमातून हळूहळू दबदबा निर्माण केला.


खेड आणि दापोलीत सदानंद कदम आणि अनिल परब यांचा वाढत चाललेला दबदबा पाहता आपल्या साम्राज्याला धक्का लागतो की काय अशी भीती म्हणा किंवा शंका म्हणा रामदास कदम यांच्या मनात निर्माण झाली आणि ती होणे स्वाभाविक आहे. तिथूनच सुरु झाला राजकीय सुडाचा प्रवास. यां प्रवासातील पहिला धक्का बसला तो सदानंद कदम व अनिल परब यांना.  दापोली मुरुड येथील 'साई रिसॉर्ट' अनधिकृत ठरवून त्याचा वरील भाग पाडण्यात आला आणि साई रिसॉर्ट बंद करण्यात आले.  हे रिसॉर्ट उद्धव ठाकरे यांच्या जवळचे अनिल परब  असल्याने हे रिसॉर्ट अनिल परब यांचेच आहे  असा धिंडोरा पेटवून  उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचाही त्यावेळी प्रयत्न केला.


 यासाठी किरीट सोमय्या यांचाही वापर करण्यात आला. हळूहळू हे सारे प्रकरण शांत झाले. परंतु आतमध्ये ते धुमसतच होते. त्यानंतर शिवसेनेत फूट पडताच योगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. तत्पूर्वी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्री बाबत व्यक्तिगत स्तरावर जाऊन टीका केली. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये रामदास कदम यांना मंत्रिपद न मिळणे हे होते. यामुळे काहीसे अस्वस्थ झालेल्या रामदास कदम यांनी शिवसेना फुटताच आपला मुलगा आमदार योगेश यांना शिंदे सोबत पाठविले.  शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात रामदास कदम यांनी सडकून टीका करण्यास सुरुवात केली. याबद्दल रामदास कदम यांना बक्षीसी म्हणून योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री पद तर दुसरा मुलगा सिद्धेश कदम यांना महाराष्ट्र प्रदृषण महामंडळाचे अध्यक्ष पद एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले.  यामुळे रामदास कदम यांचा पुन्हा एकदा खेड आणि दापोलीत वर्चस्व निर्माण होऊ लागले.


 याच वर्चस्वामुळे योगेश कदम यांच्या विरोधात उभे राहिलेले संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यां साऱ्या घडामोडी पाहता योगेश कदम कधी अडचणीत येतात याची उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाट पाहताच होती. आणि शिवसेनेला ही संधी चालून आली. विशेष म्हणजे ही संधी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या जवळच्याच सहकाऱ्यांनी दिली असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. असे म्हटले जाते की 28 मे रोजी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहकारी मंडळींनी नवी मुंबईतील एका बारवर धाड घातली. सर्वसाधारणपणे  कोणतीही धाड ही पोलीस घालतात. परंतु ही जेव्हा धाड घातली गेली त्याबाबत तेथील पोलीस ठाण्याला काहीच कळविले नाही किंवा त्यांना त्याची कल्पनाही दिली नाही. यामुळे हे सारे प्रकरण गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले.


त्यांनी यां धाडी संदर्भात सविस्तर माहिती मागून घेतली. नवी मुंबई तुर्भे मार्गांवर असलेल्या यां बार मध्ये गृहराज्य मंत्र्यांच्या जवळच्यानी धाड का घातली यामागील उद्देश जाणून घेतला असावा. त्यानंतर अवघ्या 48 तासात 30 मे रोजी कांदिवली येथील 'सावली' बार वर पोलिसांनी धाड घातली. ही धाड रात्री 10 ते 11 च्या दरम्यान घातली गेली. विशेष म्हणजे ही धाड क्राईम ब्रँच विभागाने टाकली. तीही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने. व्हिडीओ तयार करून धाड घातली. बार पासून केवळ 75 मिटरवर असलेल्या समता नगर पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले नसावे. यां धाडीत एकूण 32 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात 22 बारबाला आहेत. गृहाराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे म्हणजेच रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे हा बार आहे.

 

हा बार शेट्टी नावाच्या इसमाला चालवायला दिला होता असे रामदास कदम यांचे म्हणणं असून आता हा बार बंद केला असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी अटक झालेल्या सर्वाना जामीन झाला आणि सारे प्रकरण शांत झाले. बारवर पोलिसांच्या धाडी पडणे हे मुंबई आणि महाराष्ट्रात काही नवीन नाही त्या पडतच असतात. मग कांदिवली च्या 'सावली' बार मागील धाडीत असे काय लपले होते. की तब्बल दोन महिन्यांनी यां धाडीचे प्रकरण थेट विधिमंडळात पोहचले आणि योगेश कदम यांच्या राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली. याचे कारण काय असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होणे साहजिकच आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे नवी मुंबईतील बारवर गृहराज्य मंत्री यांच्या जवळच्यानी घातलेली धाड असेच म्हणावे लागेल. या धाडीचा उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळला असावाच असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

 

असे म्हटले जाते की जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये. पण गृहाराज्यमंत्री योगेश कदम यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी ही चूक केली. परिणामी योगेश कदम नाहक अडचणीत आले.त्यामुळे दापोली मुरुड येथील रिसॉर्ट तोडल्या नंतर सुरु झालेला झालेला राजकीय सुडाचा प्रवास अनिल परब यांनी विधानपरिषदेत पूर्ण केला अशीच खेड दापोलीतच नाही तर महाराष्ट्रात चर्चा आहे. मुळात आपण गृहराज्यमंत्री आहोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत असे असताना कोणत्याही बार वर धाड घालण्यापूर्वी योगेश कदम यांनी फडणवीस यांची परवानगी न घेणे ही चूकच मानायला हवी. कदाचित आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याचा विसर योगेश कदम यांना झाला असावा. योगेश कदम यांच्या याच चूकीमुळे केवळ त्यांच्या आईच्या नावावर असलेला सावली बार बंद करण्याची नामुष्की ओढवली नाही.

 

 तर त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी सावली बार ची पाहणी करून समता नगर पोलिसांची भेट घेतली आणि सर्वच माहिती घेतली. इथेच दमानिया थांबल्या नाहीत तर त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला नाही तर मी न्यायालयात जाईन. यामुळे योगेश कदम यांच्या अडचणीत नक्कीच वाढ झालेली दिसत आहे. यातून कदम यांना एकनाथ शिंदे कसे बाहेर काढतील हे  पाहणे गरजेचे आहे.

 

शिंदेही अडचणीत आहेत.

 

फडणवीस यांचे सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ना त्या कारणाने सातत्याने अडचणीत सापडत आहेत. मुख्यमंत्री न मिळाल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी अनेक फेऱ्या मारल्या पण दिल्लीश्वरांनी शिंदे यांची फारसी दखल न घेतल्याने शिंदे सातत्याने नाराज दिसत आहेत. त्यांची ही नाराजी जनतेपासून लपून राहिलेली नाही. त्यातच फडणवीस यांनी शिंदे यांच्या एकापाठोपाठ एक मंत्र्यांना  चाप लावत गेल्याने शिंदे यांच्या शिवसेनेतील सारेच मंत्री नाराज आहेत. इतकेच नाही तर फडणवीस यांनी शिंदे यांच्या नगरविकास विभागालाही चाप लावण्याचे ठरविले असल्याने शिंदे यांच्या शिवसेनेतील राजकारण ढवळून निघाले आहेत. शिंदे यांचे राजकारणतील वजन कमी करणे हाच त्यामागील उद्देश आहे.

 चाप लावण्याच्या या प्रकारामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेनेला मर्यादा येण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे 'इथे आड, तिथे विहीर' अशाच विचित्र अवस्थेत शिंदे यांची शिवसेना सापडलेली आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि कोणीही कायमचा मित्र नसतो हे तंत्र  एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सोयीस्कररित्या विसरले त्यामुळेच हे सारे घडले आणि घडत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी उद्धव ठाकरे वर नाहक आगपाखड केली. तिथेच शिंदे आणि त्यांचे सहकारी चूकले असे म्हणावे लागेल. भाजपा पुन्हा मुख्यमंत्रीपद देतील असा शिंदे यांचा समज होता नव्हे विश्वास होता तो फोल ठरला.

 

 सध्या दिल्लीचे राजकारण पाहता उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपाने जुळवून घेतले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अंबादास दानवे यांच्या निवृत्तीच्या दिवशी झालेल्या फोटोसेशन वेळी घडलेल्या गोष्टी सारे काही सांगून जात आहे.  शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे असा निर्णय देणारं विधानसभा चे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चक्क उद्धव ठाकरे यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि तेही देवेंद्र फडणवीस यांच्या समोर. हे सारे पाहत महाराष्ट्राचे राजकारण वेगाने वळण घेणार यात शंका नाही.    कारण एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या मनमानी वागणुकीला फडणवीस सरकार कंटाळले आहेत.

 

  किंबहुना एकनाथ शिंदेही कंटाळले असतील असे म्हटल्यास चूकीचे ठरणार नाही. पण जे आमदार आणि मंत्री उद्धव ठाकरे यांना ऐकत  नव्हते उद्धव ठाकरे यांना मानत नव्हते ते एकनाथ शिंदे यांचे कसे ऐकणार हाही प्रश्न आहे. म्हणूनच अशा मंत्र्यांकडून राजीनामा मागणेही शिंदे यांना कठीण होणारच  पण आपल्याच मंत्राचे राजीनामा घेतले तर फडणवीस सरकारची नामुष्की होईल. तर दुसरीकडे शिंदे यांची पत घसरू शकेल. म्हणूनच यावर तोडगा म्हणजे मंत्रिमंडळात फेरबदल केला जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे बेतालपणे बोलणाऱ्या आणि वागणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देणे सोयीचे होईल आणि सरकारची इभ्रत वाचवीता येईल. मागील सहा महिन्यात राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता आम्हाला फारशी कोणाची गरज नाही असे फडणवीस यांनी सूचित केले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला सध्या तोंड दाबून बुक्याचा मार खावा लागत आहे. सुप्रसिद्ध गझलकार गुलजार यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास....

 

इज्जत किसी इन्सान की 

नही होती..

जरुरत की होती है!

जरुरत खत्म!

इज्जत खत्म!!

यही दुनिया का सच है!

 

दुनियाका सच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारतील का! ही येणारी वेळच ठरविणार.

 

 

सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक

संपादक,  'वृत्तमानस' मुंबई.

रविवार दि. 27 जुलै 2025

दूरध्वनी : 8928055927

Comments


bottom of page