top of page

नवजात बालक विक्री प्रकरणी भाजपच्या दोन महिला पदाधिकारींना अटक: राजकीय वर्तुळात खळबळ

चंद्रपुरात नवजात बाळ विक्री प्रकरणी भाजपशी संबंधित दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे अशी अटक केलेल्या महिला कार्यकर्ती, पदाधिकारींची नावे असून त्या भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या दोघींना अटक केल्यानंतर 1 जुलैला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये एकच खळबळ उडाली.


मे महिन्यात रामनगर पोलिसांनी चंद्रपूरमध्ये दोन नवजात बालकांची पैशांच्या मोबदल्यात विक्री झाल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांना अटक केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध मानवी तस्करी तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पाॅक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


तपासादरम्यान या प्रकरणात भाजपशी संबंधित कार्यकत्र्या सायली येरणे आणि भाग्यश्री हांड या दोन महिलांचा सहभाग असल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या दोघी सुरुवातीला या प्रकरणात साक्षीदार म्हणून समोर आल्या होत्या. मात्र, तपासात त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.


या दोन्ही महिला स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाशी संबंधित असून, त्यापैकी एक सायली येरणे या महिला आघाडीतील महामंत्री या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहेत. तपासादरम्यान नवजात बालकाच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, संबंधित प्रक्रिया आणि समन्वय साधण्यात या दोघींची भूमिका असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या निष्कर्षानंतर दोघींना चैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे चंद्रपूरमधील राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चैकशी करण्याची मागणी केली आहे.

Comments


bottom of page