नवी मुंबईतही ‘ अशोक खरात’ ची पुनरार्वत्ती आदर्श म्हात्रेचे 40 महिलांवर लैंगिक अत्याचार
- Navnath Yewale
- Mar 31
- 2 min read

नवी मुंबई: नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या अशोक खरातसारखे आता नवी मुंबईतून फसवणूकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आदर्श म्हात्रे (वय 35) नावाच्या एका भामट्याने इस्त्रोचा शास्त्रज्ञ किंवा आयपीएस-आयएएस अधिकारी असल्याचे भासवून राज्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. म्हात्रेने
महिलांना कोट्यवधी रुपयांना लुटले आहे. त्याच्यावर आत्तापर्यंत तब्बल 40 गुन्हे दाखल झाले आहे. या घटनेमुळे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आदर्श म्हात्रे हा अत्यंत चाणक्षपणे महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तो प्रामुख्याने मॅट्रिमोनी साईट्सवरून अशा महिलांना शोधायचा ज्यांचे लग्नाचे वय निघून गेले आहे, अथवा घटस्फोटीत किंवा विधवा आहेत. म्हात्रे वर्षाला 25 ते 35 लाख रुपयांचे पॅकेज घेणार्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांनाच लक्ष्य करायचा. स्वत:चा रुबाब दाखवण्यासाठी तो आपण इस्त्रोचे शास्त्रज्ञ किंवा मोठे सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. आलिशान गाड्यांमधून फिरणे आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलांना नेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे, ही त्याची पद्धत होती.
एकदा का महिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली की, तो त्यांचे लैंगिक शोषण करायचा. इतकेच नव्हे तर महिलांना भावनिक साद घालून त्यांच्या नावावर 35 ते 40 लाख रुपयांचे कर्ज काढायला लावायचा. हे पैसे आपल्या भावाच्या खात्यावर वळवून तो गोव्याला जाऊन चैनी करायचा. फसवणूक पूर्ण झाल्यानंतर तो आपला मोबाईल नंबर बंद करून पसार व्हायचा.
नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हात्रेच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी 50 महिलांनी सामाजिक प्रतिष्ठेपाटी तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्याचे गुन्हे केवळ नवी मुंबईपुरते मर्यादित नसून ठाणे, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक आणि अगदी कर्नाटक राज्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, तो स्वप्नील वारुळ, हेमंत गायकर, रुद्रेश गोंधळी, जयेश सोनवणे, जयेश नाईक, आदित्या म्हात्रे आणि तन्मय म्हात्रे अशा विविध नावांनी वावरत होता. या घटनेमुळे महिलांनी मॅट्रिमोनी साईट्सवर ओळख झालेल्या व्यक्तींची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.



Comments