top of page

नवी मुंबई विमानतळ! कोकण विक्रीचे आणखी एक पाऊल!!

ree

अनेक वर्षे रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पालघर येथील वाढवण बंदर, शिवडी-नाव्हा-शेवा अटल सेतू. यांच्या पाठोपाठ नवी मुंबई विमानतळाच्या उदघाटनामुळे विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने वेग पकडला हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.  कोकणच्या प्रवेश द्वारावरच किंबहुना कोकणातच होत असलेल्या या साऱ्या वेगवान विकासाकडे पाहता या विकासाची मुळे रायगड रत्नागिरी करीत थेट सावंतवाडी पर्यंत लवकरच पोहचतील. विकासाची हिच मुळे हळूहळू कोकणची जमीन भुसभूशीत करून जमीनीला चढा भाव मिळवून देतील. परिणामी रोजगार नसलेला, व्यवसायापासून दूर असलेला, गरिबीला कंटाळलेला कोकणी माणसाकडून त्यांच्या जमिनी आपसूकच विकल्या जातील. 

 

 

कोणी कितीही प्रयत्न केले तरी कोकणच्या जमीन विक्रीची ही प्रकिया आता थांबली जाणार नाही! थांबविता येणार नाही! किंबहुना ती जोर धरणार आहे.  मुंबई शहरावर येणारा ताण समोर ठेवूनच  विकासाचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे यापुढे नोकरी व्यवसायनिमित्त मुंबईत येणारा परराज्यातील लोंढा  कमी खर्चात कोकणातील रायगड जिल्ह्यात स्थिरावला जाईल आणि मुंबई वरील भार कमी करण्याची शासनाची योजना  यशस्वी होईल.  व्यवसायाचे आणि व्यापाऱ्यांचे खऱ्या अर्थाने मुंबई केंद्र होईल. जागतिक स्तरावर मुंबईचे महत्व अजून वाढले जाईल.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उदघाटन नुकतेच झाले. विमानतळाचे उदघाटन जरी झाले असले तरी प्रवाशी वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही. यामुळे अनेक चर्चाना तोंड फुटले आहे.  रायगडच्या शेतकऱ्यांचे नेते दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्यापासून परप्रांतीय जनतेचा लोंढा रायगड हिल्ह्यात कसा वाढू शकेल इतपर्यंत चर्चा जोर धरू लागली आहे. विकास म्हटला की हे सारे ओघाने आलेच. मुंबई ही एकेकाळी कोळी बांधवांची होती पण मुंबईच्या विकासाबरोबरच कोळी बांधव दूर फेकला गेला. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असल्याने आपले नशीब आजमीवण्यासाठी प्रत्येकाने मुंबईची दारे ठोठावली आणि दार ठोठावणाऱ्या प्रत्येकाला मुंबईने सामावून घेतले. शेवटी प्रत्येक गोष्टीची काही मर्यादा असतेच. मुंबईचे असेच झाले.

 

सातत्याने वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईत  लोकसंख्येचा विस्फोट झाला तर अशी भीती म्हणा किंवा शंका निर्माण झाली.  लोकसंख्येचा हा विस्फोट होऊ नये यासाठी मागील चार दशकापासून राज्याकर्त्यांची केवळ चर्चा सुरु आहे. याबाबत शासनाने विविध योजना आखल्या. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी  योग्य त्या पद्धतीने न झाल्याने त्या कागदावरच राहिल्या. परिणामी  मुंबई शहरावरील बाहेरून येणाऱ्यांचा भार वाढतच चालला होता. शासनाच्या कोणत्याच योजना यशस्वी होताना दिसत नव्हत्या.  अखेर २००५ साली निसर्गानेच पुढाकार घेतला. मुसळधार कोसळलेल्या पावसाने मुंबईला कवेत घेतले. त्यामुळे तीन दिवस मुंबई पूर्णतः ठप्प झाली. हजारो निष्पाप माणसांचे बळी गेले. लाखो कोटीं रुपयांचे नुकसान झाले. सारी यंत्रणाच ठप्प झाली.

 

 

 यामुळे जागतिक स्तरावरील व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची  संपूर्ण जगात नाचक्की झाली.  झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला या दुर्घटनेमुळे जाग आली.  देशाची स्वप्ननगरी असलेल्या मुंबईचा विकास  एकट्या मुंबई महापालिकाकडून होणे शक्य नाही हे सर्वांनाच समजून आले. यामुळेच दोन दशके मृत अवस्थेत असलेल्या मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणला (MMRDA) संजीवनी देण्यात आली. आणि केवळ मुंबईच नाही तर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मुंबई प्रदेशाचाही विकास करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार मागील वीस वर्षांपासून हा विकास सुरु आहे.  परंतु देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यावर मागील दशकात मुंबईच्या विकासाने खऱ्या अर्थाने वेग पकडला हे नाकारून चालणार नाही. 

 

मुंबई पासून गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या डहाणू पर्यंत तर कसारा, कर्जत पासून अलिबाग पर्यंत MMRDA च्या माध्यमातून विकासाचे  पर्व सुरु झाले. या विकास पर्वातील महत्वाचा भाग म्हणजे मागील दशकात मेट्रो रेल्वेचे विणलेले जाळे.  यामुळे भाईंदर, ठाणे, भिवंडी कल्याण पासून तळोजा पर्यंत सारा ग्रामीण भाग मुंबई शहरांशी वेगाने जोडला गेला, जोडला जाणार.  मुंबई शहरातील वाढणारी लोकसंख्या आणि लोकसंख्येबरोबरच असंख्य संख्येने रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या यामुळे मागील वीस वर्षे मुंबईकर वाहतूकीच्या कोंडीत प्रचंड अडकला होता.

 

मुंबईकरांच्या एका पिढीचे अर्धे आयुष्य या वाहतूकीच्या कोंडीतच गेले. तरीही  या साऱ्या समस्यांना  सामोरे जात संघर्ष करत मुंबईकरांची एक पिढी मुंबईत पाय रोवून उभी राहिली. त्या पिढीचे खरोखरच कौतुक करायला हवे. त्यामुळेच नव्या पिढीला असेच जीवन जगावे लागणार का! अशीही शंका सर्वांच्याच मनात घर करून होती. परंतु मागील दशकात मुंबईचा ज्या वेगाने विकास झाला आहे किंवा होत आहे ते पाहता नव्या पिढीला वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे न जाता एक आनंदी जीवन जगता येईल किंबहुना विदेशाप्रमाणेच त्यांचा प्रवास सुखकर होईल असे ठामपणे म्हणावे लागेल. 

 

मागील ६५ वर्षे मुंबईत असलेल्या माझ्या वास्तवाच्या अनुभवाद्वारे मी हे सांगत आहे. सुरुवातीला १९७० च्या दरम्यान मुंबईत वाहतूकीची तितकीशी साधने उपलब्ध नव्हती. पश्चिम दृतगती महामार्गाच्या मधील फुटपाटवर  १९६८ च्या कालावधीत आम्ही रात्री झोपत असू. वाहनांची संख्यांच नसल्याने हे सारे होत होते. रेल्वे आणि बेस्टच्या बसेस यावरच सारी मुंबई अवलंबून होती. १९८० च्या दशकापासून मुंबईच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आणि १९९० नंतर मुंबईच्या लोकसंख्येत अचानक वाढ झालेली दिसू लागली. लोकसंख्येबरोबरच खासगी आणि सार्वजनिक गाड्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. परंतु वाढलेली लोकसंख्या आणि गाड्यांची  वाढलेली संख्या पाहता ज्या पायाभूत सुविधा मुंबईत निर्माण व्हायला हव्या होत्या किंवा महापालिका आणि शासनाने त्या द्यावयास हव्या होत्या त्याच सोयी देण्यात आल्या नाहीत.

.

 मुंबईतील लोकांना सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे सांगून शासनाने हात झटकले तर महापालिका तोट्यात आहे असे दाखवून मुंबई महापालिकेने हात वर केले.  येथेच मुंबईचे सारे गणित बिघडले. आणि मुंबई गलिच्छ होवू लागली.  त्यावेळी मुंबई महापालिका खरोखरच तोट्यात होती.  मला माहित आहे की..हरेश्वर पाटील मुंबईचे महापौर असताना १९९९ साली मुंबई महापालिका तब्बल ३०० कोटी रुपये तोट्यात होती. त्यामुळे पायाभूत सुविधा पासून मुंबई शहर हजारो मैल दूर होती. शासन आणि महापालिका दोघांच्या या वादात मुंबईकरांचे  पुरते सॅन्डविच झाले होते.  मुंबई दिवसेंदिवस गलिच्छ होऊ लागली. महापालिकाच तोट्यात असल्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना पालिकेकडून फारसा मलिदा मिळण्याची शक्यता फारच कमी होती. हा मलिदा मिळविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून निवडून आलेल्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न केला.

 

 त्यातूनच मुंबईत अनधिकृत घरांची संख्या वाढत गेली. १९८५ ते २००५ या वीस वर्षाच्या काळात मुंबईत मोकळ्या असलेल्या पालिकेच्या, शासनाच्या आणि काही खासगी भूखंडावर मुंबईत दाखल झालेल्या जनतेने  नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने मिळेल त्या मार्गाने कब्जा केला. त्यातूनच मुंबईला गुन्हेगारीचे ग्रहण लागले. यामुळे मुंबईचे चित्रच पालटले गेले. गॅगस्टार, लूटमार, स्मगलीग यांनी मुंबईला चारही बाजूने घेरले. किंबहुना मुंबईवर यांचाचा अधिक कब्जा होता. हे सारे  जेव्हा राज्यकर्त्यांच्याही अंगाशी आले,  जीवाशी आले. तेव्हा राज्यकर्त्यांनाही आपण केलेली चूक समजून आली, त्यांचे डोळे उघडले गेले, त्यानंतरच पोलीस विभाग ऍक्शन मोड मध्ये आले आणि जागतिक स्तरावरील मुंबईची गँगस्टार, स्मगलीग यांच्या विळख्यातून सुटका केली. त्यानंतर राहिलेले काम निसर्गाने केले. २००५ साली कोसळलेल्या मुसळधार पावसाच्या महापुराने मुंबईला कवेत घेतले.

 

वाढवण ते नागोठणे

 

पालघर येथील वाढवण बंदर पासून सुरु झालेला विकासाचा प्रवास अटल सेतू मार्गाने थेट नवी मुंबईतील विमानतळापर्यंत पोहचला आहे.  केवळ पाच वर्षात हे सारे घडले आहे.  या साऱ्या विकासात स्थानिक भूमिपुत्र कोकणी माणूस कुठेच दिसत नाही. वास्तविक जागतिक स्तरावरील मुंबई शहरही कोकणातच आहे. यामुळे एकेकाळी या मुंबईत कोकणी माणसांचे वर्चस्व होते. परंतु राजकारणात आणि उत्सवात कोकणी माणूस अधिक अडकून राहिला. यामुळे मुंबईचा विकास होऊनही कोकणी माणूस अविकसितच राहिला. परिणामी जागतिक स्पर्धेत कोकणी माणूस आपसूकच पिछाडीवर गेला. याचे कारण कोणताही विकास त्याने सकारात्मक मनाने स्वीकारला नाही. मग तो वाढवण बंदराचा असो, अटल सेतू चा असो, नवी मुंबई विमानतळाचा असो, राजापूर येथील अणूऊर्जा प्रकल्प असो किंवा रिफायनरी असो.  प्रत्येक प्रकल्पाला  कोकणातील स्थानिक जनतेने विरोध केला आणि कालांतराने हा विरोध मावळला गेला. २० वर्षांपूर्वी वाढवण बंदराला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला. याबाबतच्या वृत्तांसाठी मी अनेकवेळा पालघरला जात होतो. स्थानिकांचा वाढता विरोध पाहता सरकारने काही काळ प्रकल्पला स्थगिती दिली. पण योग्य वेळ येताच   वाढवण प्रकल्पाला गती देण्यात आली. २० वर्षांपूर्वी नवी मुंबई विमानतळाची जेव्हा जागा ठरली तेव्हाही स्थानिकांनी या विमानतळाची चेष्टा केली. येथे विमानतळ उभारून येणार कोण! असाही प्रश्न स्थानिक भूमिपुत्र विचारत होते.

 

कालांतराने नवी मुंबईच्या विमानतळाचा सर्वांनाच विसर पडला. पण विमानतळाचा फलक मागील २० वर्षे त्याच जागेवर उभा होता. अखेर तीन वर्षांपूर्वी विमानतळाला चालना मिळाली. त्याच वेळी स्थानिक भूमिपुत्रानी जागे होऊन व्यवसायचा दृष्टीने विचार करायला हवा होता. पण तसा विचार झालाच नाही. विचार झाला तो विमानतळाला नाव कोणाचे द्यायचे. याच नावाच्या राजकारणात स्थानिक भूमिपुत्र अडकला गेला किंबहुना राज्यकर्त्यांनी या तरुणांना अडकविले असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. त्यासाठी मोर्चे आंदोलन करण्यात आले. जर शेतकरी नेते  दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे असले असते तर राज्यकर्त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा आधीच केली असती. पण तसे झाले नाही. त्यामुळेच यामागे नक्की कारण काय आहे हे समजून घ्यायला हवे.

 

 जर सांताक्रूझ येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ हलवून नवी मुंबई येथे आणले जात असेल तर त्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच नाव राहिले जाईल. यात काहीच दुमत नाही. याबाबत केंद्र सरकारचे निश्चित असे धोरण अद्याप तयार झालेले नसावे म्हणूनच विमानतळाच्या नावाचा प्रश्न तितकासा गंभीर मानला गेला नसावा. तरीही रायगडचा सारा तरुण नावाच्या राजकारणात अडकला गेला. नावासाठी लढा देणे यात काहीच वावगे नाही. पण त्याच बरोबर लवकरच सुरु होत असलेल्या विमानतळामुळे रोजगाराबरोबरच व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी निर्माण होणार याबाबत चर्चा व्हायला हवी होती. राज्यकर्त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करायला हवे होते. किंबहुना याबाबत तरुणांचे आंदोलन झाले असते तर सर्वांनीच पाठिंबा दिला असता.

 

पण तसे झाले नाही आणि होणारही नाही. वास्तविक नवी मुंबई विमानतळाला नाव काय द्यायचे हे जसे रायगडच्या जनतेच्या घराघरात पोहचले किंवा राज्यकर्त्यांनी पोहचविले त्याच पद्धतीने विमानतळाबाबतची माहिती आणि त्यामुळे तरुणांना मिळणारी संधी ही प्रत्येकाच्या घराघरात पोहचणे गरजेचे आहे. कारण नवी मुंबईचे विमानतळ हे भारतातील पहिलेच परिपूर्ण मल्टीमॉडेल विमानतळ आहे. हे भूमिपुत्रानी गांभीर्याने लक्षात घ्यावायस हवे. हे केवळ प्रवाशी चढ उतार करणारे विमानतळ नसून मल्टीमॉडेल विमानतळ असल्याने लॉजिस्टिक्स, इ - कॉमर्स,  आदरातिथ्य आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.   १ हजार १६० हेक्टर इतक्या विस्तीर्ण जागेत हे विमानतळ उभे राहिलेले आहे. या विमानतळाला दोन स्वतंत्र धावपट्ट्या असून प्रत्येक धावपट्टीकरिता दोन समांतर 'टॅक्सी वे' आहे. पहिल्या टप्यात या विमानतळावर प्रतीवर्ष २० दशलक्ष प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. तर अंतिम टप्यात विमानतळाचे काम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी तब्बल  ९० दशलक्ष प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.  मालवाहतूकही इथे मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे  पहिल्या टप्यात ०.८ दशलक्ष मेट्रिक टन मालाची चढ उतार होणार असून अंतिम टप्यात ३.२५ मेट्रिक टन पर्यंत ती पोहचली जाणार आहे. देशातील असे पहिलेच विमानतळ असेल की ज्या विमानतळाला दृतगती महामार्ग, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, वॉटर टॅक्सी इत्यादीद्वारे जोडले जाईल.

 

नवी मुंबई विमानतळाचा हा व्याप पाहिला तर याचा प्रत्यक्ष फायदा कर्जत पासून अलिबाग, नागोठणे पर्यंत  होणार असून अप्रत्यक्ष फायदा पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पर्यंत होणार आहे. कोणत्याही ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेव्हा विमानतळ उभे रहाते तेव्हा त्या विमानतळाच्या परिघातील ७० किमी पर्यंतचा विकास टप्या टप्याने होत राहतो. या विकासावर एकदम ताण पडू नये म्हणूनच विमानतळ आणि लॉजिस्टिक सेवाही टप्या टप्याने सुरु केली जाते. या विमानतळमुळे मुंबई प्रमाणेच नवी मुंबईतही पंचतारांकित हॉटेल्स बरोबरच अनेक हॉटेल्स उभे राहतील. या हॉटेल्सना पूरक अनेक छोटे मोठे व्यवसाय उभे राहतील. यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची गरज निर्माण होणार आहे. 

 

नवी मुंबईत आधीच उभी राहिलेली आहे.  यामुळे  पळस्पे, पेण, वडखळ सोमाटणे येथील जमिनीवर व्यावसायिकाची पाहिली पसंती असणार आहे. पण जसजसा विमानतळाचा विस्तार वाढत जाईल तसतसे  व्यावसायिक  पुढे पुढे सरकत जातील.   कोकणच्या कोळी बांधवानी मुंबई गमावली, कोकणच्या आग्ररी बांधवानी नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली गमावली, पालघरच्या कोकणी वाडवळ बांधवानी वसई विरार, पालघर गमावले आणि आता वेळ आली आहे रायगडच्या कोकणी बांधवांची. शासनाने विकासाचे चक्र रायगडच्या कोकणी जनतेच्या दारात आणून उभे केले आहे.  वेगाने फिरणाऱ्या विकासाच्या या चक्रात रायगडचा कोकणी बांधव चढणार! की विकासाच्या चक्रात चिरडणार! ही येणारी वेळच दाखवून देईल.

 

 

मुंबईचे महत्व कायम!

 

नवी मुंबईत विमानतळ उभे राहिले तळोजा, भिवंडी, कल्याण, ठाणे, घोडबंदर, भाईंदर वसई विरार अशा सर्वच ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे विणले जरी गेले असले तरीही  मूळ मुंबईचे महत्व कधीच कमी होणार नाही. किंबहुना राज्यकर्ते उद्योगपती मुंबईचे महत्व कमी होवू देणार नाहीत. त्यामुळेच मुंबईचे महत्व वाढत राहणार!  याचे कारण मुंबईत मिळत असलेल्या ठोस सुविधा. जागतिक स्तरावरील मुंबईचा होत असलेला कायापालट पाहिला तर विदेशातील शहरांच्या बरोबरीने मुंबईने आपला वेग घेतलेला दिसून येतं आहे. एक कोटी ४२ लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईत सारे काही उपलब्ध आहे. तरीही  वाहतूकीच्या कचाट्यात आणि कचऱ्याच्या ढीगाऱ्यात मुंबई कायम स्वरूपी अडकलेली दिसत होती.

 

 परंतु  मुंबई महापालिका आणि मुंबई विकास प्राधिकरणाने कठोर धोरण स्वीकारल्यामुळे मुंबईने कूस बदलली असून विकासाच्या दिशेने वेग पकडला आहे. त्यामुळेच  वाहतूकीच्या कोंडीतून मुंबईची हळूहळू सुटका होताना दिसत आहे. मेट्रो रेल्वेचा  आरे गोरेगाव ते कफ परेड हा ३३ किमी लांबीचा भुयारी मार्ग म्हणजे मुंबई शहरांची शान असून अर्थव्यवस्था मजबूत करणारा  मार्ग समजला जातो. एकेकाळी मुंबईत जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध होता.

 

 पण आज प्रत्येकाला स्वतःच्या घरी जाण्यासाठी स्वतंत्र मार्गाची योजना तयार केली जात आहे. दक्षिण मुंबईतून सुरु झालेला कोस्टल मार्ग वरळी पर्यंत येऊन पोहचला आहे येत्या तीन वर्षात हा कोस्टल रोड बोरिवली गोराई पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई ते घाटकोपर  'फ्री वे' आधीपासून सेवेत आहेच. दिंडोशी ते मुलुंड आणि बोरिवली राष्ट्रीय उद्यान ते ठाणे असे दोन भुयारी मार्ग प्रगतीपथावर आहेत. हे सारे मार्ग पूर्ण होताच मुंबई मोकळा श्वास निश्चित घेईल. संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे विणल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात  वेळेची बचत होत आहे. दोनच वर्षांपूर्वी सांताक्रूझ विमानतळ ते मंत्रालय जाण्यासाठी दिढ तासाचा अवधी लागत होता.  आता  यासाठी अवघी ३० मिनिटे लागत आहेत.  मुंबईचे महत्व आणखी एका कारणासाठी कायम राहणार ते म्हणजे वैद्यकीय सुविधा. मुंबईत ज्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत त्या सुविधा देशातील अन्य कोणत्याच ठिकाणी मिळणे दुरापास्त आहे. 

 

आज मुंबईतील  मग ते महापालिकेचे असो की खासगी रुग्णालय असो जर या रुग्णालयात डोकावून पाहिले तर दाखल झालेल्या रुग्णांपैकी किमान ७५ टक्के रुग्ण हे मुंबईबाहेरचेच दिसून येतील. मुंबई बाहेरील रुग्णालयात सुविधा मिळत नसल्यानेच त्यांना मुंबईत धाव घ्यावी लागत आहे. मागील आठवड्यातच कोल्हापूर येथील एका कॅन्सर रुग्णालयात एका मित्राच्या उपचारासाठी गेलो होतो. त्यावेळी डॉक्टर असे म्हणाले की जर शास्त्रक्रिया करण्याची वेळ आलीच तर मुंबईला शस्त्रक्रिया करावी लागेल. मी डॉक्टरांना सहजच प्रश्न केला की कोल्हापूर येथे सोय नाही आहे का! तेव्हा डॉक्टरांनी प्रांजलपणे उत्तर दिले की.. सोय नाही.  असाच काहीसा अनुभव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांचा तीन महिन्यांपूर्वी  आला.

 

 एका २५ वर्षाच्या तरुणाच्या छातीत फुफुसाजवळ गाठ आली होती. छोट्या छोट्या उपचारानंतर फरक पडत नसल्याने डॉक्टरांनी सि. टी. स्कॅन  केले आणि निदान केले की TB आहे  म्हणून. त्यानुसार त्या तरुणाला TB आजाराच्या गोळ्या देण्यात आल्यात. त्या तरुणांने चार महिने त्या TB च्या गोळ्या प्रामाणिक पणे घेतल्या. पण आजार बरा झालाच नाही. किंबहुना थुंकीतून रक्त पडू लागले. अखेर त्या तरुणाला मुंबईत आणले गेलं. मुंबईतील डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा समजले की त्या तरुणाला TB आजार नसून 'कॅन्सर' झालेला आहे. एका २५ वर्षीय तरुणाच्या जीवाशी डॉक्टरांनी कसा खेळ केला हे यावरून स्पष्ट होत आहे. इतके सारे होऊनही त्या डॉक्टराला जाब कोणीच विचारला नाही, यासारखी दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट नाही.

 

त्या तरुणाचे दैव बलवत्तर आणि आई वडिलांचा दांडगा आशीर्वाद म्हणून आज डेंजर झोन मधून तो तरुण बाहेर येवू शकला. ही सारी मुंबईच्या डॉक्टरांची कमाल आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे वडील नसलेल्या या तरुणाला जो खर्च झाला त्याला जबाबदार कोण! असा प्रश्न आता निर्माण होत आहे. मागील वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असाच अनुभव आला. एका ३५ वर्षीय तरुणाला उजव्या मानेजवळ  पाच गाठी आल्यात. अनेक डॉक्टरांनी कॅन्सर ची शंका व्यक्त केली. हा तरुण दोन महिने फाईल घेऊन इथून तिथून फिरत होता. अखेर त्याने मुंबई गाठली आणि केवळ तासाभरात डॉक्टरांनी कॅन्सर नाही असे सांगत आजाराचे निदान केले. आणि त्या तरुणांने दीर्घ श्वास घेतला. ग्रामीण भागातील साऱ्याच नाही पण बहुतांश डॉक्टरांच्या असलेल्या अगाध ज्ञानामुळेच मुंबई शहराचे महत्व कायमस्वरूपी राहणारच यात शंका घेण्याचे कारण नाही.

 

 

सुरेंद्र गंगाराम मुळीक,

संपादक, 'वृत्तमानस' मुंबई.

रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५

दूरध्वनी : ८९२८०५५९२७_*

Comments


bottom of page