top of page

नांदेड पुन्हा हादरलं: शिंदेसेनेच्या पदाधिकार्‍याची निर्घुण हत्याआरोपी अन् पोलिसात चकमक; गोळीबार करणार्‍या आरोपीच्या पायावर पोलिसांनी गोळी झाडली

नांदेड : मराठवाड्यातील महत्वाचं आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवरील शहर म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांत नांदेडमधील गुन्हेगारीच्या घटनांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नांदेड शहरात अवघ्या 3 दिवसांत तब्बल पाच खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिसांचा वचक नसल्याची भावना सर्वसामांन्यातून व्यक्त होत आहे. त्यातच आज पोलीस आणि आरोपींमध्ये थेट चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकरचा खून करणार्‍या आरोपींना पकडताना पोलिसांवरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


शहराच्या श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणार्‍या रस्त्यावर आज सोमवारी (दि.6) पहाटे सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या करण्यात आली. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून तो शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी देखील आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


सोनू कल्याणकर हत्या करणार्‍या मुख्य आरोपीचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, झरी गावात आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर, जखमी आरोपीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, एकूण 4 आरोपी होते, त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या गोळी लागलेला मुख्य आरोपी अंकुश गंधमवार रुग्णालयात आहे. तर, प्रसाद उर्फ ऋषी शिंदे, कृष्णा जोगदंड आणि रवी उर्फ रोहित लोट हेही खुनाच्या घटनेतील आरोपी आहेत.


नांदेड शहरात तीन दिवसात 5 खून झाले आहेत. ह्या 5 जणांच्या खूनामागे एक कारण पुढे आले आहे, ते जुन्या वादातूनच या हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे काम पोलिस प्रशासनाचे आहे. आमचे प्रशासनाला पूर्ण सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया दिली. जे घडलं ते वाईट आहे, पोलीस कडक कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. पोलिसांच्या कामात मी हस्तक्षेप करणार नाही, त्यांचे काम झाले कि मी नक्की त्यांना बोलावून घेणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Comments


bottom of page