top of page

निवडणुकीपूर्वीच अनेक मोठे नेते भाजपमध्ये सामील



महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीपूर्वी एकामागून एक इतर पक्षांचे मोठे नेते भारतीय जनता पक्षात सामील होत आहेत. दोन विरोधी पक्षांचे तीन मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले. त्यापैकी माजी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नेते सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप भाजपमध्ये सामील झाले आहेत. जयश्री पाटील आणि बबनराव घोलप यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे साजरा होत असताना, सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली आहे.


मुंबई भाजप कार्यालयात ज्येष्ट नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिवसेना (युबीटी) चे माजी नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. पंरतु भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वी बडगुजर भाजपमध्ये सामील झाल्याची कोणतीही माहिती नाकारली होती. परंतु नंतर स्पष्टीकरण दिले होते. कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी बडगुजर यांच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. परंतु नाशिकमधील नेत्यांनी बडगुजर यांच्या भाजपमध्ये प्रवेशाला विरोध केला होता.

भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोणाच्याही भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय स्थानिक नेते, खासदार आणि आमदारांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जातो. त्यांनी असेही स्पष्ट केले की, बडगुजर हे एका मोठ्या समारंभात सदस्यत्व घेणार होते. परंतु गिरीश महाजन यांनी मंगळवारीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामुळे काही गोंधळ निर्माण झाला.

सुधाकर बडगुजर हे नाशिक जिल्ह्यातील शिवसेना (यूबीटी) चे ज्येष्ठ नेते होते. ते उद्धव ठाकरे गटाचे एक मजबुत आधारस्तंभ होते. शिवसेनेच्या विभाजनानंतर ते ठाकरेंसोबत राहिले. संजय राऊत यांच्या जवळचे असलेले बडगुजर यांचा वादांशी खोल संबंध आहे.


दरम्यान, बडगुजर यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुट्टा याच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे. बडगुजर सलीम कुट्टासोबत नाचत असतानाचा एक फोटो समोर आला होता. हा तोच सलीम आहे, ज्याचा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात हात होता. भाजप नेते नितेश राणे यांनी 2023 मध्ये विधानसभेत हा फोटो दाखवून त्यांना जोरदार कोंडीत पकडले होते. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होेते. त्याच वेळी, आता हा नेता भाजपमध्ये सामील झाला आहे.


शिवसेना यूटीबीने कोंडीत पकडल्यानंर, 2023 मध्ये मकाऊमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जुगार खेळतानाचे काही फोटो व्हायरल झाले होते, जे शिवसेना यूटीबी खासदार संजय राऊत यांनी शेअर केले होते. हे फोटो लीक करण्यात सुधाकर बडगुजर यांचा हात असल्याचा संशय होता. भाजप सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, मकाऊ कॅसिनो घोटाळ्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमध्ये सामील होण्यास विरोध करत होते. शिवाय महाराष्ट्र भाजप अध्यक्षांच्या विरोधाला न जुमानता गिरीश महाजन यांनी सुधाकर बडगुजर यांना सदस्यत्व मिळवून दिले.

댓글


bottom of page