नीट पेपरफुटी प्रकरण: सीबीआयने कारवाईचा फास आवळलापुण्यातील एका महिलेनंतर आता फुरसुंगीतून एकजण ताब्यात
- Navnath Yewale
- May 13
- 2 min read

पुणे : देशभरात गाज असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने गतीमान कारवायांना सुरुवात केली असून या प्रकरणात आणखी एका संशयित तरुणाला पुण्यातील फुरसूंगी येथून ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे सीबीआयने आजच पुण्यातील बिबवेवाडी येथून एका महिलेला अटक केली होती. त्या महिलेला आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार होते. त्यातच, आता आणखी एकास पुण्यातून अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिकमधील शुभम खैरनारच्या घरी जाऊन पोलिसांची झाडाझडती सुरू आहे. नीट प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयने आरोपी शुभम खैरनारच्या भावालाही ताब्यात घेतलं आहे.
नीट पेपर फुटीनंतर एनटीएने यंदाची 3 मे रोजी घेण्यात आलेली नीट 2026 ची परीक्षा रद्द केली असून विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासंदर्भातील तारीख लवकरच जाहीर होईल. मात्र, एनटीएने परीक्षा रद्द करताच, सीबीआयने कारवाईला जोर दिला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातच सापडले असून नाशिकमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर, आज पुण्यातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. नीटचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आज पहाटे मनीषा वाघमारे या महिलेचा ताबा घेतला. संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिले आहे. 46 वर्षीय मनिषा ही पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहत असून तिनेच विद्यार्थ्यांना आरोपीपर्यंत पोहोचविण्याचं काम केल्याचा संशय आहे. आता, इंजिनिअरींगच्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी याप्रकरणात आणखी एका संशयित तरुणाला अटक केली आहे, पुण्यातील फुसरसुंगी येथून युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थी हा इंजिनियरिंगच्या द्वितिय वर्षात शिकत असल्याची माहिती आहे. सध्या पोलिसांकउून त्याची चौकशी सुरू आहे. अद्या प त्याच्याकडून कुठलीही माहिती मिळालेली नाही. मात्र चौकशीसाठी त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत सीबीआय ऍक्शन मोडवर असून नाशिकमधील अरोपी शुभम खैरनारच्या घरी जाऊन झाडाझडती घेण्यात आली आहे. नांदगाव येथील घरी सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आला. या बाबत अधिकार्यांकडून कमालीची गोपनियता पाळण्यात आली होती. या पथकात एका महिला अधिकार्यांसह सात ते आठ सदस्यांचा समावेश होता. संशयित आरोपी शुभम खैरनार याच्या कुटुंबातील सदस्यांचीही एक तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. शुभमचा भाऊ भावेश खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून घराची झाडाझडती आणि चौकशीनंतर त्याला सोडणार आहेत.



Comments