top of page

‘नॉट रिचेबल’ सहर शेख यांचे वडील युनूस शेख मुंब्रा पोलिसांत

ठाणे : ठाणे महापालिकेच्या एमआयएमच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आत वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेल्या सहर शेख यांचे वडील युनूस शेख गुरुवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांशी 15-20 मिनिटे चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत“ करारा जवाब मिलेगा, दोन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू” असा इशारा दिला आहे.


सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून निवडणुक लढवल्याची तक्रार सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, युनिस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. ते महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले आहेत. स्थलांतरितांसाठी ‘ नमुना 10’ लागू असताना, युनिस शेख यांनी ‘ नमुना 8’ चा वापर करून अधिकार्‍यांची दिशाभूल केल्याचा अरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवले आणि ठाणे महापालिका निवडणुकीत विजय मिळवला.


मुंब्रा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आलेले युनूस शेख पत्रकारांशी बोलताना आक्रमक पावित्र्यात दिसले. ते म्हणाले की, दोन दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. करारा जवाब मिलेगा. तसेच जे काही आरोप आमच्यावरती करण्यात येत आहेत ते चुकीचे आहेत. मुलगी मोठी होते आहे म्हणून अनेकांना जळण होत आहे. म्हणून हा केवळ राजकीय स्टंट असल्याचं शेख म्हणाले आहेत.


दरम्यान, सहर शेख ‘ नॉट रिचेबल’ असताना वानखेडे स्टेडियमवर दिसून आल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात 16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. मुंबई आणि पंजाबचा हा सामना पाहण्यासाठी सहर शेख वानखेडे मैदानात उपस्थित होत्या. सहर शेख यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून यावर युनूस शेख म्हणाले की, तिने मॅच पाहायला जाण्यात चुकीचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित करत लवकरच आम्ही भूमिका मांडू असंही ते म्हणाले. आता युनूस शेख काय भूमिका मांडतात हे पाहावे लागणार आहे.

Comments


bottom of page