पती सिनियर मॅनेजर; आरोग्य कर्मचारी पत्नीची छळास कंटाळून आत्महत्या !
- Navnath Yewale
- May 25
- 1 min read

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना उघडकीस येत आहेत. तर त्या प्रकरणानंतरही माहिलांनी सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अमरावतीतून अशीच घटना समोर आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पती आणि सासूला ताब्यात घेतलं असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी निलेश तायवाडे वय (30 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नांव आहे. शुभांगी या आरोग्य विभागात कम्यूनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती निलेश हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सिनियर मॅनेजर आहेत. शुभांगी या सासरी जय भोले कॉलनी परिसरात राहत होत्या.
चार वर्षापूर्वी शुभांगी आणि निलेश यांचा विवाह झाला. त्यानां दोन मुली आहेत. एक मुलगी तीन वर्षाची तर दुसरी फक्त एका वर्षाची आहे. शुभांगीच्या आई- वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार लग्नांनंतर काही महिन्यातच निलेशनं मानसिक छळ करायला सुरवात केली. सासरची इतर मंडळीही त्रास देत होते. शुभांगीने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली, पण ही आत्महत्या नाही तर तिला फासावर लटकवून मारल्याचा आरोप शुभांगीच्या नातेवाईकांनी केला. शुभांगीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकिय रूग्णालयात पाठवण्यात आला असून अमरावती पोलिसांनी शुभांगीचा पती आणि सासूला ताब्यात घेतले आहे.
Comments