top of page

पुण्यात कोसळधार; नागरिकांची तारांबळ, खडकवासला धरणातून नदीपात्रात विसर्ग



पुण्यात आज सकाळपासून जोरदार पावसाने हाजेरी लावली. सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. शिवाय अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आले तर रहिवासी परिसरातही पाण शिरलं आहे. काही तासात पडलेल्या पावसामुळे पुणे जलमय झाले.त्यामुळे नालेसफाई मुद्दा समोर आला आहे.

पुण्यातील धायरी-सिंहगड रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. शहरातील भिडे पूलला पाणी लागलं. जूना पूल पाण्याखाली गेल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. कोथरुड भागातील रस्त्यावर वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. नालेसफाई व्यतिरिक्त मेट्रोच्या कामांमुळे देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं बोललं जात आहे. मात्र सुरुवातीच्या पावसातच पुणे महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


पुण्याला ऑरेंज अलर्ट

पुणे शहराला आणि पुणे घाट परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


खडकवासला धरण क्षेत्रात धो-धो

पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 2000 क्युसेक पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्यात आले आहे. धरण साखळी क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पाण्याचा वसिर्ग करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकून 7040 टीएमसी म्हणजे 25.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.


गेल्या वर्षी याच दिवशी साठा केवळ 3.62 टीएमसी म्हणजे 12.43 टक्के इतका होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधकि पाणीसाठा उपलब्ध आहे. चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे धरणातून अधिकचा विसर्गही करावा लागेल त्यासाठी नागरिकांना नदी काठांसह धरण परिसरात प्रतिबंध लागू केला आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांना प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून प्रशासनाकडून अधिकृत आदेश जारी केला आहे.

Comments


bottom of page