top of page

फिर एक बार ट्रम्प सरकार...



जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या ६० व्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी चे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे विजय मिळवला.


अनेपेक्षित या अर्थाने म्हणतो की या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमॉक्रटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनाही विजयाचे दावेदार समजले जात होते. या निवडणुकीत दोघांच्यातही जोरदार रस्सीखेच होती. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात दोन्ही उमेदवारात काटे की टक्कर दाखवण्यात आलो होती. दोन्ही उमेदवारांची जिंकण्याची शक्यता पन्नास पन्नास टक्के व्यक्त करण्यात आली होती. जो जिंकून येईल तो अगदी काट्यावर निवडून येईल असे मानले जात होते त्यामुळेच ट्रम्प इतक्या घवघवीत मतांनी जिंकून येतील असे कोणालाही वाटले नव्हते. ट्रम्प यांनी तब्बल २७७ इलेक्ट्रोल मत मिळवत कमला हॅरिस यांचा दारुण पराभव करत अमेरिकेत फिर एक बार 'ट्रम्प सरकार' आणले. फिर एक बार असे मी म्हणालो कारण २०१६ ते २०२० असे चार वर्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार अमेरिकेत होते. २०२० साली म्हणजे मागील निवडणुकीत त्यांचा ज्यो बायडेन यांनी दारुण पराभव केला होता. यावेळी मात्र त्यांनी त्या पराभवाचे पुरेपूर उट्टे काढले आणि अमेरिकेवर पुन्हा एकदा स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले.


अर्थात त्यांचा हा विजय का झाला हे देखील तपासून पहावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक प्रचार करताना अमेरिका फर्स्ट या धोरणाचे जोरदार समर्थन केले. डोनाल्ड ट्रम्प हे कट्टर उजव्या विचारसणीचे आहेत त्यांनी आपल्या प्रचारात हा मुद्दा जोरदारपणे मांडला. आपल्या देशातील समस्यांना अन्य देशातून आलेले स्थलांतरित जबाबदार आहेत. ज्यो बायडेन यांच्या काळात अन्य देशातून अनेक लोक अमेरिकेत आले त्यामुळे अमेरिकेतील स्थानिक नागरिकांचा रोजगार हिरावला गेला असा जोरकस प्रचार त्यांनी केला त्यांचा हाच प्रचार त्यांच्या पथ्यावर पडला आणि तरुणांनी त्यांना भरभरून मते दिली. त्यांनी केलेला आयातीला विरोध आणि आयात उत्पादनावर कर वाढवण्याची केलेली घोषणा ही मतदारांना पटली. अमेरिकने अन्य देशांच्या भांडणात पडण्याची गरज नाही हे त्यांचे मतही जनतेला पटले. तसेच त्यांचा चीन आणि रशियाला असलेला विरोध जगजाहीर आहे. अमेरिकेला मागे सारून चीन जागतिक महासत्ता होऊ पाहत आहे आणि त्यांना रशिया सहाय्य करत असताना ज्यो बायडेन हातावर हात ठेवून बसले आहेत असे चित्र गेली चार वर्ष दिसत होते. चीन आणि रशियाच्या वाढत्या वर्चस्वाला शह द्यायचा असेल तर डोनाल्ड ट्रम्प सारखा आक्रमक नेताच देशाचा राष्ट्राध्यक्ष हवा असे मत अमेरिकन नागरिकांचे बनले त्यात रशिया - युक्रेन आणि इस्राईल - पॅलेस्टाईन युद्धात बायडेन यांनी स्वीकारलेले बोटचेपे धोरण मतदारांना रुचले नाही म्हणूनच अमेरिकन मतदारांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या हाती सत्ता दिली आणि कमला हॅरिस यांना नाकारले. कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांना जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही ज्यो बायडेन यांनी खूप उशिरा त्यांची उमेदवारी घोषित केली त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. कमला हॅरिस यांचा पराभव हा ज्यो बायडेन यांच्यामुळेच झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


कारण ज्यो बायडेन यांची चार वर्षाची कारकीर्द निराशाजनक अशीच होती. अमेरिकेतील सर्वात निष्क्रिय राष्ट्राध्यक्ष अशी अमेरिकेच्या इतिहासात त्यांची नोंद होईल इतकी निराशाजनक कामगिरी त्यांची होती. महागाई, बेरोजगारी, शस्त्र संस्कृती याबाबत त्यांनी दिलेले एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नाही. बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न त्यांना व्यवस्थित हाताळता आला नाही त्यामुळे तरुणांमध्ये त्यांच्या विषयी रोष होता तो त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे २१ व्या शतकातही अमेरिकेन नागरिक एका कृष्णवर्णीय महिलेला राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नाही या आणि यासारख्या अनेक कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय सोपा झाला आणि ते पुन्हा एकदा फिर एक बार 'ट्रम्प सरकार' म्हणत सत्तेवर आले.


श्याम ठाणेदार 

पुणे

7 views0 comments

Yorumlar


bottom of page