top of page

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा तिसारा दिवस; प्रकृती खालावली शेतकर्‍यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आदोलन, शरद पवारांचा फोनवरुन सल्ला



शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भुमिका घेत रविवारी (8 जून) पासून गुरूकूंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. मंगळवारी (10) आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची प्रकृती बिगाडली. आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही.


या निर्णयावर ठाम असलेल्या बच्चू कडू यांची प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट घेवून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्याचबरोबर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवरून संवाद साधत सल्ला दिला.


मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळाजवळ आंदोलनास सुरूवात केली. अमरावती शहरातील संत गाडगेबाबा मंदिरापासून मोझरीपर्यंत हजारो समर्थकांच्या सहभागाने बाईक फेरी काढण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.


सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याचे अश्वासन दिले होते. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन बरेच महिने उलटूनही सरकारकडून या अश्वासनांची पूर्तता केली जात नाही. म्हणून अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग अवलंबील्याचे आंदोलक बच्चू कडू म्हणाले.


शेतकर्‍यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी, लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेतीकामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा.


हे शक्य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी 10 हजार रुपयांची मदत देण्यात यावी. रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतालादेखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी, दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीसाठी 60 रुपये प्रतिलिटर असा दर निश्चित करावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता 40 रुपये दर होई पर्यंत निर्यात बंदी लागू करू नये आदी मागण्यांसह


दिव्यांगाना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही, अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहेत. सरकार जाणीवपूर्वक मुद्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, भले माझी अंत्ययात्रा निघाली, तरी आम्ही आमच्या मुद्यांपासून दूर होणार नाही, असा पावित्रा आंदोलक बच्चू कडू यांनी घेतला आहे.


आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी मंगळवारी (10 जून) अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी प्रकृती बिगडत असल्याने अन्नगृहन करण्याचा सल्ला दिला. या शिवाय प्रशासनाच्या वतिने अमरावतीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलक बच्चू कडू यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र मागण्यांवर ठाम बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू ठेवले. दरम्यान वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प) सर्वेसर्वा शरद पवार यांनी फोनद्वारे बच्चू कडू यांच्याशी संवाद साधत सल्ला दिला.

Comments


bottom of page