top of page

बडतर्फ रणजित कासलेला पुन्हा अटक; मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने ठोकल्या बेड्या



दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून राजकीय नेत्यांवर आरोप व बदनामी केल्याप्रकरणी वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतून अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.


वादग्रस्त वक्तव्ये आणि वादग्रस्त दावे करणारा बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेविरूद्ध बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांच्या फिर्यादीवरून रणजित कासलेविरूद्ध सामाजिक शांतता भंग करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी एक गुन्हा तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल सोशल मिडियावर बदनामीकारक भाष्य केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांच्या फिर्यादीवरुन दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड पोलिस दलात कार्यरत असताना गुजरामध्ये जाऊन खंडणी मागीतल्याप्रकरणी रणजित कासलेला निलंबीत करण्यात आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा कट रचल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करून रणजित कासलेने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. रणजित कासलेवर यापूर्वीही बीड, परळी, अंबाजोगाई आणि मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात 18 एप्रिल रोजी त्याला अटकही झाली होती. अटकेच्या कारवाईपूर्वी रणजित कासलेला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. आठवडाभरापूर्वीच त्याला जामीन मिळाला होता.

रणजित कासले यांनी सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करत वादग्रस्त वक्तव्ये आणि वादग्रस्त दावे केलेले आहेत. निवडणूकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या माणसाकडून आपल्या खात्यावर 10 लाख रुपये टाकण्यात आल्याचा दावा करून रणजित कासलेने खळबळ उडवून दिली होती. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला ऑफर देण्यात आली होती. त्यासाठी आपल्याला 5 ते 50 कोटी रुपये देऊ करणार होते, असा दावाही त्याने केला होता.


जामीन मिळाल्यानंतर रणजित कासलेने सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावे करणे सुरूच ठेवले होते. शनिवारी (24 मे) रोजी रणजित कासलेने नवा व्हिडीओ शेअर करत वाल्मिक कराड प्रकरणी मोठे दावे केले होते. वाल्मिक कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो. त्याच्या जेवनणात चांगल्या प्रतिच्या चापत्यांनी विशेष व्यवस्था केली जाते. वाल्मिक कराड स्वत:सह इतर कैद्यांच्या नवावर तुरुंगातील कॅन्टीनमधून दरमहा तब्बल 25 हजार रुपायांची खरेदी करत आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे, असा दावा रणजित कासलेने या व्हिडीओत केला होता.


इतर कैद्यांना तुरुंगात केवळ पांघरण्यापुरते कपडे पुरवले जात असताना वाल्मिक कराडला एक नव्हे तर तब्बल सहा ब्लँकेट दिले गेले आहेत. या ब्लँकेटचा वापर वाल्मिक कराड गादीसारखा करत असल्याचा दावाही रणजित कासलेंनी याच व्हिडीओत केला होता. त्याच्या या दाव्यानंतर बीडचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

Comments


bottom of page