बाळासाहेब येत आहेत...
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

मराठी भाषेचा विजयी जल्लोषा निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. हिंदी भाषा सक्तीची करून मुंबई आणि महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा केंद्र सरकारचा कुटील डाव हाणून पाडल्याबद्दल मराठी प्रेमी जनतेने हा विजयी जल्लोष आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र ज्या क्षणांची गेली अनेक वर्षे वाट पाहत आहे त्या क्षणांची पूर्तता आज होणार आहे. यामुळेच महाराष्ट्राच्या चांदा पासून बांदा पर्यंत सर्वत्रच उत्साहाची आणि आनंदाची लाट निर्माण झालेली दिसत आहे. दोनच दिवसापूर्वी विठ्ठलाच्या वारीत माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका या बंधुची भेट झाली. सोलापूर जिल्ह्यात माळशीरस तालुक्यातील दसूरपाटी गावात झालेल्या या बंधुभेटीने वारकऱ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले. पंढरपूरच्या वारीत हा बंधुभेटीचा सोहळा अतिशय महत्वाचा समजला जातो.
बंधूभेटीचा हा अनुपम सोहळा पार पडताच वारकऱ्यांच्या अंगी उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते. वारकऱ्यांना विठ्ठल दिसू लागतो आणि वारकरी आनंदाच्या भरात उत्साहाच्या भरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिराकडे धावत सुटतात. आणि काय योगायोग आहे पहा. रविवारी 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि शनिवारी म्हणजेच आज 5 जुलै रोजी ठाकरे बंधू राज आणि उद्धव यांची भेट होत आहे. हि भेट कोणी येऱ्या गेऱ्या ने घडवून आणलेली नाही. तर... साक्षात विठ्ठलानेच घडवून आणली असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. या भेटीमागे हिंदी भाषेची सक्ती हे केवळ एकमेव कारण नाही. तर मागील पाच वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्रात सुडाचे राजकारण खेळून मराठी माणसाना आपापसात लढविण्याचे केलेलं पाप हे सर्वात मोठे कारण आहे.
ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाद्वारे देशात हिंदुत्वाची बीजे पेरली. तीच शिवसेना आणि तोच धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे यांचा नाही असा निर्णय देवून बाळासाहेबांच्या कुटुंबाला उध्वस्त करण्याचा डाव याच दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने रचला. हे सारे चुकीचे होतेच... नियमाला धरूनही नव्हतेच किंबहुना माणुसकीला काळिमा फासणारे होते. महाराष्ट्राला हे मान्य नव्हते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यानाही हे मान्य नसावे. तरीही हे घडले किंबहुना घडवून आणले गेले. यामुळेच महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाला हे मान्य झाले नाही. मराठी माणसाला आपापसात लढवून महाराष्ट्रावर कब्जा करू पाहणाऱ्या दिल्लीश्वरांना रोखण्यासाठीच विठ्ठलाने पुढाकार घेतला आणि ठाकरे बंधुची भेट घडून आणली. हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून दस्तूरखुद्द बाळासाहेबच आहेत असेच म्हणावे लागेल.
बाळासाहेबांच्या निधनानंतर शोकाकुल शिवसैनिकांनी 'परत या! परत या! बाळासाहेब परत या! अशा घोषणा देऊन संपूर्ण महाराष्ट्र हेलावून सोडला होता. मुंबईवर ज्या बाळासाहेबांनी अतोनात प्रेम केले अनेक संकटातून मुंबईला आणि येथील माणसांना वाचविले त्या बाळासाहेबांसाठी त्यावेळी मुंबईही दिवसभर थांबली आणि शोकाकुल झाली. बाळासाहेब असताना मातोश्रीवर येताना गूढग्यावर चालणारे, बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होणारे मात्र बाळासाहेबांच्या नंतर चौथी पाचवी शिकलेले हेच नेते छाती फुगवून चालू लागले. ठाकरे हे नाव पुसण्याचा प्रयत्न करू लागले. तिथेच महाराष्ट्राचा आणि मुंबईचा घात होणार अशी शंका सर्वांच्याच मनात डोकावू लागली. अखेर ही शंका खरी ठरली. ED, CBI दबावाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तुकडे करून शिवसेनाच संपविण्याचा घाट दिल्लीश्वरांनी घातला. इतके सारे करूनही शिवसैनिक अजिबात बधला नाही. त्याने कडवी झुंज सुरूच ठेवली.
पदासाठी हपापलेले नेते, पदाधिकारी उद्धव यांची साथ सोडू लागले पण कडवट शिवसैनिक कणखरपणाने लढत राहिला. अखेर मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी लढणारा कडवट शिवसैनिकांना पाहून विठ्ठलालाही राहवले नाही. म्हणूनच बाळासाहेबांना परत आणण्याचे विठ्ठलाने ठरविले. विठ्ठलच्याच आशीर्वादाने आज वरळीत होणाऱ्या विजयी जल्लोषात राज ठाकरे यांच्या रूपाने बाळासाहेब साक्षात महाराष्ट्रात परत येणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने दिल्लीच्या आक्रमणाला लगाम घालून सुडाच्या राजकारणाला पूर्णविराम दिला जाईल अशा अपेक्षेत महाराष्ट्र आहे. यामुळे अनेकांची पळापळ सुरु झाली आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या तंबूत गेलेल्या अनेकांची अस्वस्थता वाढू लागली आहे. राज आणि उद्धव एकत्रित येऊन पालिका निवडणुका लढाविल्या तर आपले काय होईल! असे पदासाठी शिवसेना मनसे सोडून गेलेल्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागली आहे.. दिल्लीच्या गादीला महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा इतिहास कदाचित माहित नसावा.
मराठी माणूस हा भयंकर संयमी आणि सहिष्णू आहे. अन्यायाविरोधात मराठी माणूस सहजासहजी उठत नाही प्रतिकार करतही नाही. पण सहिष्णू असलेला हाच मराठी माणूस जेव्हा अन्यायाविरोधात उभा राहतो तेव्हा अन्याय करणाऱ्याला संपविल्याशिवाय शांत बसत नाही हेही तितकेच खरे आहे. हा इतिहास दिल्लीश्वरांना माहित नसल्यानेच महाराष्ट्राच्या पाठीत सुरा खुपसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिथेच त्यांची चूक झाली असे म्हणावे लागेल. त्यामुळेच राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित येणे भाग पडले. किंबहुना महाराष्ट्र देशद्रोह्यांमुळेच या दोन भावांना एकत्रित येण्याचे संकेत विठ्ठलाने दिले असेच म्हणावे लागेल. हे दोन भाऊ एकत्रित आले तर काय घडू शकते हे हिंदी विरोधी मोर्चा आयोजित केल्यावर तात्काळ दिसून आले. सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला. ही त्याची झलक होती. केवळ ठाकरे बंधूनी एकत्रित येऊ नये हाच त्यामागे सरकारचा उद्देश होता. पण ठाकरे बंधूनी आज मराठी भाषा प्रेमींचा मेळावा आयोजित केल्याने सरकारचा तोही उद्देश फोल ठरला. यामुळे महाराष्ट्राची महत्वाची शहरे विशेषतः मुंबई ठाणे काबीज करण्याच्या स्वप्नावर पाणी फेरते की काय अशी भीती भाजपा विशेषतः शिंदे गटात निर्माण झाली. निर्माण झालेल्या याच भीतीमुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतील वरिष्ठ नेते काहीही बरगळू लागले आहेत.
राज ठाकरे यांचा घातपात करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्लॅन होता इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्याची वेळ या नेत्यांवर आलेली आहे. याचे कारण राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर आपले दुकान कसे चालेल ही चिंता त्यांना सतावू लागली आहे. तर शिंदे शिवसेनेत जाऊन आपण चूक तर केली नाही ना असे अनेकांना वाटू लागले आहेत. त्यामुळेच शिवसेना, मनसे सोडून गेलेले अनेकजण माघारी फिरण्याची जास्त शक्यता आहे. पण हे सर्व कधी होईल तर केवळ मराठी भाषाप्रेमी विजयी जल्लोषात एकत्रित आल्याने नाही तर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येऊन येणाऱ्या महापालिका निवडणुका एकत्रित लढाविल्या तर आणि तरच होईल. यासाठी कोणताही वाद न करता जागेची वाटणी व्हायला हवी. बाहेरचे आक्रमण रोखण्यासाठी वेळ पडली तर राज ठाकरे यांच्या मनसेला जास्त जागा द्या पण एकत्रित निवडणुका लढा हेच महाराष्ट्राचे म्हणणे आहे. तरच मुंबई महापालिका काय उभा महाराष्ट्र काबीज करण्यास ठाकरे बंधूना वेळ लागणार नाही आणि मतदान प्रक्रियेतही घोळ करताना कोणालाही शंभर वेळा विचार करावा लागेल. पाहूया विठ्ठलाने ही भेट घडवून आणली त्यामुळे विठ्ठलच दोघा भावांना योग्य दिशा दाखवेल.
सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक
संपादक, 'वृत्तमानस' मुंबई.
शनिवार दि. 05 जुलै 2025
Comentarios