बिहारमध्ये ऐन निवडणूकीत इंडिया आघाडीला मोठा धक्का! मित्रपक्ष फुटला; झारखंड मुक्ती मोर्चाचा एकला चलोचा नारा
- Navnath Yewale
- Oct 18
- 1 min read

बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये काही ठिकाणी जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि ऐन दिवाळीतच आघाडीत बिघाडीचे फटाके फुटले आहेत. झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमो पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुक स्वतंत्रपणे लढणार असून सहा मतदारसंघामध्ये पक्षोच उमेदवार निवडणुक लढणार असल्याचे सांगितले. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी शनिवारी ही घोषणा केली.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी इंडिया आघाडीत अद्याप काही जागांवरून वाद सुरू आहेत. हा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही, त्यात झारखंडमधील सत्ताधारी पक्ष आणि इंडिया आघाडीतील सहकारी पक्ष झामुमोने बाहेर पडण्याचा निर्णय जाहिर केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा इंडिया आघाडीला मोठा झटका मानला जात आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा सरचिटणीस आणि प्रवक्ता सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की, पक्षाने बिहार विधानसभेची निवडणुक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा विधानसभा मतदारसंघात निवडणुक स्वतंत्रपणे लढणार आहोत.चकाई, धमदाहा, कटोरिया (एसटी), मनिहारी (एसटी), जुमई आणि पीरपैती या जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार निवडणुक लढणार आहेत. दरम्यान, या मतदारसंघासाठी दुसर्या टप्प्यात 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
झामुमोकडून प्रचारकांची घोषणा
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चानं 20 स्टार प्रचारकांची यादी जाहिर केली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे स्टार प्रचारकांचं नेतृत्व करणार आहेत. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार झारखंड मुक्ती मोर्चाने इंडिया आघाडीकडं काही जागांची मागणी केली होती. पण जागा दिल्या गेल्या नाहीत त्यामुळं पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.



Comments