top of page

बीडच्या उमापूरमधून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींची उत्तर प्रदेशातून सुटका

बीड: बीडच्या चकलांबा (ता. गेवाराई) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर येथून महिनभरापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींची उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून सुखरुप सुटका करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिसांनी ही अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. मुख्य आरोपीस उत्तर प्रदेशातील सिकंदरपूर येथून बेड्या ठकाण्यात आल्या आहेत.


या बाबत अधिक माहिती अशी की, दि.5 एप्रिल 2026 रोजी चकलांबा पोलिस ठाण्याच्यवा हद्दीतील उमापूर येथून आरोपी विजय महादेव कव्हाळे (रा. पळशी, जि. नांदेड) याने दोन अल्पवयीन चुलत बहिणींना अज्ञात कारणास्तव पळवून नेले होते. या गंभीर घटनेप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पयीन मुलींच्या अपहरणांमुळे हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. तपासाच्यसा सुरुवातील आरोपीचे जूने वास्तव्य असलेल्या भिवंडी (जि. ठाणे) येथे पोलिसांनी शोध घेतला, मात्र तिथे आरोपी किंवा मुलींचा कसलाच सुगावा लागला नाही.


दरम्यान तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलिसांनी तांत्रिक बाबींची मदत घेतली. ज्यातून या मुली बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमाभागात असल्याचे धागेदोरे हाती लागले. या महितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये एक विशेष पथक तत्काळ उत्तर प्रदेशला रवाना झाले. उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील शिपूर दियार आणि त्यानंतर सिकंदरपूर या भागात स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. तिथे पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी विजय कव्हळे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे मुलींबाबत कसून चौकशी केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.


आरोपी या मुलींना घेवून छत्तीसगड राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्या आधीच चकलांबा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. चकलांबा पोलिसांच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला. पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन इंगळे, पोलिस कर्मचारी कल्याण पवार, हनुमान इंगोले तसेच तांत्रिक विभागचे पोलीस उपनिरिक्षक शेखर औटे, विकी सुरवसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Comments


bottom of page