बीडच्या भूसंपादन घोटाळ्यात सहकारी बँकेवर कारवाईची टांगती तलवार!
- Navnath Yewale
- May 10
- 2 min read

बीड: बोगस निवाडे तयार करून मागच्या तारखेत सह्या करून शासनाला तब्बल 241 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाली आहे. तत्कालिन जिल्हाधिकार्यांच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी कोणकोण अडकणार याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बीड शहरातील भाग्यनगर भागातील एका सहकारी बँकेतून एकाच दिवशी अनेक खाते उघडून हे पैसे लाभार्थी, त्यांचे वकिल, महसूल मधील अधिकारी-कर्मचारी आणि दलालांना वाटप झाले त्या बँकेवर आणि स्थानिक सल्लागार व्यापारी यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातून मार्गस्थ होणार्या सोलापूर-धुळे महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये मुख्य आरोपी हे बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक असल्याचा दावा करत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. या भूसंपादन घोटाळ्यामध्ये भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संजय हंगे यांच्यासहित डी टी पी ऑपरेटर क्लार्क यांनी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि वकील या सगळ्यांनी संगनमत करून तब्बल 241 कोटी रुपयांचा अपहार केला, शासनाची फसवणूक केली.
शेकडो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा फास आवळला आहे. नुकतेच बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूर येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक झाल्यानंतर अनेक उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी ट्रेझरी ऑफिसर यांच्यासहित कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यातील सहाकरी बँकिंग क्षेत्रात स्वत:ला धुतल्या तांदळाची उपाधी लावून घेणार्या या बॅृंकेला यूपर्वी देखील अशाच एका प्रकरणात आरबीया ने कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठवला होता. भू संपादन घोटाळ्यात तर या बँकेने सर्व हद्द पार करत नियम आणि अटी पायदळी तुडवत भ्रष्टाचार करणार्याना साथ दिल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यामुळे एसआयटीकडून या बॅृंकेची आणि स्थानिक सल्लागारची चौकशी होणार आहे.
दरम्यान, शासनाकडून लाभार्थ्यांना मावेजा मंजूर झाल्यानंतर तो त्यांच्या बँकेत चेक द्वारे किंवा आरटीजीएस ने जमा होतो. या प्रकरणात मात्र बहुतांश लाभार्थ्यांचे खाते हे बीडच्या भाग्य नगर भागात असलेल्या एका सहकारी बँकेत उघडण्यात आले खाते उघडताना ना लाभार्थ्याचे आधार कार्ड मागितले गेले ना पॅन कार्ड थेट लाभार्थ्याच्या खात्यात शासनाकडून मावेजापोटी मंजूर झालेली रक्कम जमा करण्यात आली आणि त्याच दिवशी यातील वकिलांचा हिस्सा संजय हंगे आणि इतरांचा हिस्सा तसेच दलालांचा हिस्सा आणि उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांचा हिस्सा तातडीने वाटप करण्यात आला.
विशेष म्हणजे बँकेने कुठलीही कागदपत्रे न तपासता एकाच दिवशी अनेक खाते ज्या पद्धतीने उघडले आणि त्यातील रक्कम विड्रॉल करून दिली त्याला या बँकेतील एक स्थानिक सल्लागार कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. हा सल्लागार बँकेच्या अधिकार्यांना भेटून, फोनवर खाते उघडण्यास अन पैसे विड्रॉल करून देण्यासाठी सांगत होता. पेठ बीड भागातील हा व्यापारी माने कॉम्प्लेक्स भागात राहतो अशी देखील चर्चा आहे. त्याचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात वेेगवेगळ्या जिल्ह्यात शाखांचे जाळे असलेल्या या बँकेच्या भाग्यनगर शाखेतून मात्र काळे धंदे करणार्यांना पाठबळ देण्यात आले. त्यामुळे ज्या पद्धतीने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात बँकेची चौकशी झाली तशाच पद्धतीने या बँकेची आणि त्या स्थानिक सल्लागाराची देखील एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याची माहिती आहे.



Comments