बीडमध्ये गोळीबार; पवनचक्की स्टोअर कॅम्पवर दरोड्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात एक ठार
- Navnath Yewale
- May 23
- 1 min read

बीड जिल्ह्यात विविध कंपन्यामार्फत पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. पवनचक्कीसाठी लागणारं साहित्य गोळा करून ठेवलेल्या लिंबागणेश परिसरातील महाजनवाडी येथे रात्री अज्ञात चोरट्यांनी लाठ्या काठ्या घेवून हल्ला चढवला. यावेळी सुरक्षा रक्षकाने चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला यामध्ये एक जण ठार झाला आहे.
बीड जिल्ह्यात विविध कंपन्यांचे पवनचक्की उभाणीचे काम प्रगतीपथावर आहेत. केज तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्येनंतर पवनचक्की चर्चेत आल्या. दरम्यान, पवनचक्यांसाठी लागणार्या सहित्यांची साठवणूक करण्यासाठी जिल्हाभरात विविध ठिकाणी पवनचक्की कार्यालय, स्टोअर कॅम्प तयार करण्यात आले आहेत. तीन महिण्यापूूर्वी केज तालुक्यातील एका स्टोअर कॅम्प मधून लाखो रुपयांच्या वायरची चोरी करण्यात आली होती. विशेष म्हणजे येथील सुरक्षा रक्षकाला बांधून चोरट्यांनी चोरी केली होती. पवनचक्की स्टोअर कॅम्पमधील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कंपन्यांनी शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मांजरसुंबा (जि.बीड) परिसरातील महाजनवाडी येथील पवनचक्की स्टोअर कॅम्प मध्ये दरोड्याच्या उद्देशाने गुरूवारी रात्री अज्ञातांनी लाठ्या-काठ्या घेवून हल्ला चढवला.
चोरीच्या उद्देशाने आलेल्या टोळक्याला पिटाळून लावण्यासाठी सुरक्षारक्षकाने चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. सकाळी या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेहाचे बीडच्या शासकिय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून नेकनूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Comments