बीडमध्ये हिंसक घटनांचे सत्र सुरूच
- Navnath Yewale
- Jun 16, 2025
- 1 min read

संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्तेनंतरही बीड जिल्ह्यात हिंसक घटनांची मालिका अजूनही सुरूच आहे. अशातच आता तांदळवाडी भिल्ल गावात शेतीच्या बांधाच्या वादातून कैलास सांगुळे या तरुणावर चौघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी “ तुझा संतोष देशमुख करतो” अशी धमकी देत तरुणाच्या डोक्यावर, तोंडावर आणि मानेवर कोयत्याने 10 हून अधिक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैलासवर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
बाईक चालवत असताना मागून वार केले: सोमवारी (16जून) सकाळी ही घटना घडली. कैलास बाईक चालवत असताना हल्लेखोरांनी त्याला रस्त्यात गाठून पाठीमागून कोयत्याने सपासप वार केले. “ तुझा संतोष देशमुख करू” आणि “ सोडू नका, जीव मारा” अशा धमक्या देत हल्लेखोरांनी क्रूरपणे हल्ला केला. या हल्ल्यात कैलास जागेवरच बेशुद्ध पडला. हल्ल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.
गुन्हा दाखल नाही, आरोपी मोकाट:
बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात अद्याप या घटनेचा गुन्हा दाखल झालेला नाही. आरोपी अजूनही मोकाट आहेत असे आरोप करत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. “ माझ्या भावाचं काही बर-वाईट झालं तर पोलिस प्रशासन जबाबदार राहील” असा अक्रोश नातेवाईकांनी केला आहे. आरेापींना अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्त्या प्रकरणाने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. आता या हल्ल्यात “ संतोष देशमुख” यांच्या नावाचा उल्लेख करत धमकी देण्यात आल्याने या प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झालं आहे. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास आणि कारवाईकडे लक्ष लागले आहे.



Comments