भाजपाची नवी खेळी; ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर यांच्यावर मोठी जबाबदारी
- Navnath Yewale
- Jun 20
- 1 min read

शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. तर, दूसरीकडे तेजस्वी यांच्यावर ठाकरे गट सोडण्यासाठी दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी म्हटले.
भाजप आणि मुंबै जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवड केली आहे. तेजस्वी यांची निवड ही त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या जागी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, अभिषेक घोसाळकर संचालक होते, त्यांच्या हत्येनंतर रिक्त जागेवर नेमुणूक करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो.
सद्भावना म्हणून संचालक मंडळाने एकमताने तेजस्वीनी घोसाळकर यांना संचालक म्हणून नेमलं असून ही रिक्त जागा भरणे कायदेशीररित्या क्रमप्राप्त असल्याचे दरेकरांनी स्पष्ट केले. मुंबै बँक ही मुंबईतील सहकार क्षेत्रातील महत्वाची बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळावर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट अशा विविध पक्षांशी संबंधित नेत्यांचा समावेश आहे. प्रवीण दरेकर हे मागील काही वर्षांपासून या बँकेच्या अध्यक्षपदी आहेत. तर, ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर हे देखील संचालक मंडळावर होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments