top of page

भाजपाच्या बीड जिल्हाध्यक्ष निवडीला मुंडे धस वादाची किनार?




भाजपकडून राज्यातील बहूतांश ठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहिर झाल्या आहेत. मात्र, बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही. याला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या वादाची किनार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहिर झाल्या आहेत. मात्र, भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले नाहीत.



अशातच राज्यात बहूतांश ठिकाणी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर बीडमध्ये मात्र अध्यक्ष पदाची निवड रखडली आहे. या निवडीला मुंडे धसांच्या वादाची किनार असल्याचं बोललं जात असतानाच कार्यकारी जिल्हाध्यक्षांनी जिल्हाध्यक्ष मात्र पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून असेल असं वक्तव्य केलं आहे.


नेहमीप्रमाणे भाजपच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षांनी मुंडे धस यांच्यातील वादाबद्दल न बोलता पुढील आठवड्यात रखडलेली निवड होईल असे सांगितले आहे. तसेच जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडे सांगतील तोच होईल असे देखील कार्यकारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी सांगितले. मात्र अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग देखील लावून ठेवली आहे.


लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर कार्यकर्त्यांनी अविश्वास निर्माण केला. त्यानंतर मस्के यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या जागी शंकर देशमुख यांची कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पंरतु आता त्यांनाच पुढे या पदाची जबाबदारी दिली जाते की, आणखी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.


दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड जिल्ह्यात भाजपाची कमांड मंत्री पंकजा मुंडे यांच्या हातात आली होती. सलग दहा वर्ष त्यांनी जिल्ह्यातील भापावर वर्चस्व राखले. मात्र, त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यावर आपले वर्चस्व आणले. परंतु सध्या धनंजय मुंडे अडचणीत आहेत. अशातच जिल्हाध्यक्षांच्या झालेल्या निवडी आणि यापूर्वी मंडळ अध्यक्षांच्या झालेल्या नविडी निमित्त मुंडे आणि धस यांच्यातील सुप्त संघर्ष दिसून येत आहे.

Comments


bottom of page