top of page

भोंदू बाबा खरात आणि रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौरा; एकाच हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्काम, प्रतिभा चाकणकरही सोबत

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांमुळे सपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. भोंदू खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादुटोणा केल्याचे, अवैध पद्धतीने संपत्ती कमवल्याचे तपासात समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे. अशातच भोंदू खरातचे अनेक नेत्यासोबतही संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचे समोर आले आहे.


भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर हे एकत्र गुवाहाटीला गेल्याचे तपासात समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्यासोबत होत्या. या सर्वांनी गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन येथे तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2021 हे तीन दिवस तिघेही रेडीसन ब्लू या हॉटेलामध्ये वास्तव्यास होते. या काळात त्यांनी कामख्या देवीचे दर्शन घेऊन पूर्जा अर्चा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गुवाहाटीतील मंदिर नऊ ग्रहाच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचे मंदिर आहे. येथे विशेष पूजा अर्चा केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.


अशोक खरात प्रकरणात उद्या चाकणकरांची चौकशी करण्यात येणार आहे. या आधी 10 तारखेला एसआयटीकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर बोलताना चाकणकर यांनी म्हटले होते की, त्यांचे जे काही प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत. मला असा विश्वास वाटतो की, या उत्तरांमुळे सर्वांचं समाधान झालं असेल. पुढे बोलताना त्यांनी पोलिसांना या प्रकरणातील तपासामध्ये माझं जसं सहकार्य हवे असेल तसं मी सहकार्य करेल अशी माहिती दिली होती.

Comments


bottom of page