मंत्री संजय शिरसाटांच्या मुलावर गंभीर आरोप, 48 तासांत महिलेची माघार, नेमकं काय म्हणाली?
- Navnath Yewale
- May 27
- 1 min read

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडणारी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर विवाहित महिलेने गंभीर आरोप केले होते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ, धमकी, हुंडा आणि फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. संबंधित महिलेने अॅड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली होती. सिद्धांत शिरसाट यांनी विवाह करून गर्भधारणा झाल्यावर जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा दावा नोटीसमध्ये केला होता. मात्र, हा आमचा घरचा मॅटर असल्याचं म्हणत संबंधित महिलेने सर्व आरोप माघारी घेतले आहेत.
महिलेचे नेमके आरोप काय?
सिद्धांत शिरसाट आणि महिलेची सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर चेंबूर येथे एका फ्लॅटवर दोघे भेटलेही, दोघांनी शरीर संबंध ठेवले. सिद्धांत यांनी लग्नासाठी जबरदस्ती केली आणि भावनिक ब्लॅकमेल करत लग्न केलं नाहीतर आत्महत्या करेल असा आग्रह धरला. लग्नासाठी संबंधित महिला तयार झाल्यावर सिद्धांत आणि महिलेने 14 जानेवारी 2022 ला बौध्द पद्धातील विवाह केल्याचा दावा महिलेने केला आहे. दोघांच्या लग्नाचे फोटोचे पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
लग्न झाल्यानंतर सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगरमध्ये घेऊन जाण्यास नकार दिला. सिद्धांत यांचे इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी पोलिसात गेल्यावर मी आत्महत्या करेल आणि कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी धमकी दिल्याचं महिलेने म्हटलं होतं.
या आधीही पोलिसात तक्रार:
दरम्यान, शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये महिलेने तक्रार दाखल केली होती, परंतु सिद्धांतचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्याने पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दाबल्याचं नोटीसमध्ये म्हटलं होतं. सिद्धांत यांनी महिलेला सात दिवसांच्या आतमध्ये नांदवण्यासाठी घेऊन जात न्याय द्यावा नाहीतर महिला अत्याचार प्रतिबंध कायदा आणि फसवणूकसारख्या कलमांनुसार कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. मात्र महिलेने 48 तासांच्या आत माघार घेतल्याने सोशल मीडियावर तर्क वितर्क लावले जात आहेत.
Comments