top of page

मराठवाडा हादरला: परभणी, हिंगोली, नांदेडला भूकंपाचे हादरे गाड झोपेत असताना मध्यरात्री 1:37 वाजता भूकंप; 4.4 रिश्टर स्केल नोंद

परभणी/ नांदेड: महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री 1 :37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीत शिंदे पांगरा गावाला सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांवर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा, रोड या भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदतीसाठी धावाधाव केली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, तसेच अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.


नांदेड जिल्ह्यातही मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले. नांदेडमध्ये 4.2 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली. मध्यरात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमतजवळ होते, अशी माहिती हाती आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सलग भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.


मराठवाड्यात मध्यरात्री जवळपास 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का हा सुमारे 1:37 वाजता बसला. या भागात मध्यरात्री 1.37 ते 3.23 या वेळेत 4 भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या सहा वर्षात हिंगोली 37 पेक्षा अधिक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यात एकाच दिवशी आणि अवघ्या दोन तासांत 4 धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पहिल्यांदा दोन तासांत 4 धक्के जाणवल्याची घटना घडली. या घटनेमुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.


हिंगोलीत 6 वर्षापासून भूकंपाचे सत्र : हिंगोलीत मागील 6 वर्षापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. हिंगोलीत औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत या तालुक्यांमध्ये जमिनीतून भूगर्भातून गूढ आवाज येणे आणि सौम्य धक्के बसण्याचे सत्र सुरू माहिती मिळत आहे. जिल्ह्यात मध्यरात्री लागोपाठ आलेल्या भूकंपाच्या चार धक्क्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी पहाटे १.३७, २.१५, २.१७ आणि ३.२३ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.


भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.६, ३.६, ३.९ आणि ४.१ इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली येथे होता. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.


भूकंपाचे धक्के मध्यरात्रीनंतर जाणवल्याने बहुतांश नागरिक झोपेत होते. काही ठिकाणी सलग धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.


दरम्यान, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

Comments


bottom of page