top of page

मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांत गुन्हा; जरांगे पाटील आक्रमक पलटवार

जालना/छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एका माध्यमप्रतिनिधीस दिलेल्या मुलाखतीमध्ये नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शहरातील जालना पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावेळी मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानंतर दोन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि महिलांना लज्जा वाटेल असे वक्तव्य केल्याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावची माहिती जालन्याचे पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.


नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख केला होता. ओबीसी नेत्यांची गोंडस मुले पाहून मराठा समाजाच्या तरुणी घरात घुसतात. स्वत: बावनकुळे यांनी सांगितले की, माझी सून मराठा आहे. माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्याच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांची, मंत्र्यांची गोंडस मुले दिसली की, मराठ्यांच्या मुली त्यांच्या घरी घुसतात ओबीसी नेत्यांची मुलं, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरी लग्न करून जातात, अशा अशयाची टिप्पणी नवनाथ वाघमारे यांनी केली होती.


वाघामरे यांच्या वक्तव्याने समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, ठिकठिकाणी मराठा संघटनांनी वाघामरेंचा निषेध करत कारवाईची मागणी केली. राज्यभरातील संतापानंतर वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त करत आपल्याकडून यापूर्वी कधीही असे वक्तव्य गेले नसून बावनकुळे यांच्यावर मनोज जरांगे यांनी केलेल्याव टीकेवर बोलताना ओघात आल्याकडून हे वक्तव्य गेल्याचे स्पष्टीकरण नवनाथ वाघमारे यांनी दिले आहे. राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावे, असे नवानाथ वाघमारे यांनी म्हटले. मनोज जरांगेंनी छगन भुजबळ, मुंडे बंधू-भगिनी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या शिवीगाळ प्रकरणी मनोज जरांगे कधी माफी मागणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा पारा चांगलाच चढला आहे. छत्रपतीसंभाजीगनर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे यांनी नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. जो मराठ्यांच्या लेकी - बाळींवर बोलेल, त्याला यापुढे कोणालाही सुट्टी नाही, असा थेट इशारा देत जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून राज्य सरकारविरोधात आक्रमक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.


नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ मी कितीही आक्रमक बोललो तरी कधी कोणाच्या महिलांवर किंवा लेकी-बाळींवर बोलत नाही. मी कोणाच्या समाजाबाबतही बोलत नाही. पण तुम्ही मराठ्यांच्या लेकी- बाळींवर बोलून अत्यंत वाईट पातळी गाठली आहे. तुमची दुसरी बाजू आणि काय कारनामे आहेत ते दाखवायचे का? मराठ्यांची मुलेही सोपी नाहीत. आता मराठेही तुम्हाला याच भाषेत उत्तर देतील.”असंही जरांगे पाटील म्हणाले.


आंदोलनाची रणनीती स्पष्ट करताना जरांगे म्हणाले की,20 ते 25 ऑगस्ट दरम्यान मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात त्यांचा दौरा होणार आहे. 28 ऑगस्टच्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास 29 ऑगस्टपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल मराठ्यांनी दबावाखाली न राहता रस्त्यावर येऊन हक्क मागायला शिकले पाहिजे. अन्यायाविरोधात पेटून उठा,आता सरकारची जिरवल्याशिवाय राहणार नाही, ” असा इशारा त्यांनी दिला.


आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला धारेवर धरत जरांगे म्हणाले, शासनाने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींना प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळालीच पाहिजे. यातील एकही नोंद कमी केली तर हे सरकार पाडणार. देवेंद्र फडणवीस यांनी समाजात उद्रेक होईल असे वागू नये, असा सल्ला देत त्यांनी बावनकुळे, शिरसाठ आणि भुमरे यांच्यावर मराठा आंदोलनाविरोधात कारस्थाने रचल्याचा गंभीर आरोप केला.


मनोज जरांगे यांनी हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे देणे, सातारा, कोल्हापुर व बॉम्बे गव्हर्मेंटच्या जीआरची अंमलबजावणी करणे, आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळात नोकरी देणे आणि मराठा विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी शाळा- महाविद्यालयांनी त्वरित परत करणे या प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार केला. तसंच 29 ऑगस्टच्या आंदोलनात पैशांचा सुळसुळाट आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणीही कोणाला पैसे देऊ नका, जे करायचे ते स्वत: करा, असं अवाहनही त्यांनी केलं आहे.

Comments


bottom of page