मराठ्यांचं भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार!
- Navnath Yewale
- Jun 29
- 2 min read
आंतरवाली सराटीत मराठ्यांची अलोट गर्दी; निर्णायक बैठकीतून जरांगे पाटलांचा सरकारला अल्टीमेटम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. राज्यातील सरसकट मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पुन्हा मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, नियोजीत आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी आज रविवार (29 जून) आंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस राज्यभरातून मराठा बांधवांनी अलोट गर्दी केली प्रत्यक्ष आंतरवाली सराटीकडे येणारे सर्व रस्ते दहा किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा आणि गर्दीने जाम झाले होते. जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळावरून उपस्थितांना संबोधीत केले.
उच्चांकी गर्दीमुळे बैठकस्थळा पासून जवळपास सात किलोमिटर पर्यंत लावण्यात आलेले लाऊडस्पीकरही गर्दीपुढे फिके पडले. त्यामुळे जरांगे पाटील यांनी गर्दीचे टप्पे पाडून तीन ठिकाणांहून उपस्थितांना संबोधीत केले. जरांगे पाटील म्हणाले की, इतके दिवस आंदोलन सुरू आहे पण मराठा मागे हटायला तयार नाही, मराठ्यांच्या जिद्दीला सलाम करत. असेच चिकाटीने लढलो तरच आपल्याला विजय मिळणार आहे. आपण घराबाहेर पडल्याशिवाय न्याय मिळणार नाही. लोकशाहीत संख्येला महत्व असते, व्हाट्सअप, फेसबुकवर पाठिंबा नको तर प्रत्यक्ष मैदानात उतरा. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंतरवाली सोडणार आणि कोट्यावधी मराठ्यांसह 29 ऑगस्टला मुंबईत धडक मारणार आहोत.
राजकारणी स्वत: निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात, तुम्ही देखील त्यांच्यासाठी प्रयत्न करता. पण तुमच्यासाठी कोणीच नाही आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. तुमच्या भागातील राजकीय पुढार्यांना मुंबईला येण्याची विनंती करा. जो येणार नाही तो समाजाचा नाही मग निवडणुकीत समाजही त्याचा राहणार नाही. मराठज्ञ मुंबईत शांततेत येणार आहे. पण फडणवीस साहेब, जर मुंबईत एकाही पोराला काठी लागली तर हायवे तर दूरच महाराष्ट्रातील पाणंद रस्ते सुद्धा सुरू राहणार नाहीत हे ध्यानात ठेवा. दोन दिवस एक रात्र म्हणजे 28 ऑगस्टला संध्याकाळी मुंबई गाठायची, प्रत्येक गावातील मराठ्यांनी मुंबईला जाण्याच्या तयारीला लागा. आण्णासाहेब पाटील, आण्णासाहेब जावळे, वडजे साहेब, विनायक मेटे आणि पाचशेवर मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही.
मराठा आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढवा, शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांना ठरल्याप्रमाणे आर्थिक मतद व नोकरीत समाविष्ठ करून घ्यावे, कुणबी प्रमाणपत्र व जातपडताळणी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यात सुलभता आणावी, हैद्राबाद, मुंबई, सातारा, औंध गॅझेट लागू करावे, सगेसोयरे अधिसूचना काढून दिड वर्ष झाले त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे माघे घ्यावेत, स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी देण्यात यावी, कोपर्डीच्या ताईला लवकर न्याय मिळावा या मागण्यांही त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. यावेळी उच्चांकी गर्दीमुळे जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळ, वडीगोद्री उड्डाण पुल व वडीगोद्री ते आंतरवाली च्या मधल्या टप्यात आशा तीन ठिकाणांहून संबोधीत केले. आंतरवाली येथील बैठक ठिकाणाहून जवळपास पाच ते सात किलोमिटर पर्यंत लाउडस्पिकर लावण्यात आले होते. मात्र निमुळता रस्ता आणि वाहणांची दाटीमुळे निम्यावर लोकांना सोलापूर- धुळे महामार्गच ओलांडता आला नाही त्यामुळे जरांगे पाटील यांनी तिन ठिकाणांहून उपस्थितांना संबोधीत करावे लागले.
सर्व आमदारांना फोन केले:
मी स्वत: 288 आमदारांपैकी 3 सोडून सर्वांना फोन केला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मागण्या पूर्ण करा असा आग्रह केला. दोन वर्षात मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पहिल्यांदाच फोन करून मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेबद्दल बोललो. 28 ऑगस्ट पर्यंत त्यांच्याकडे वेळ आहे एकदा मी आंतरवाली सोडली तर मागे फिरणार नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
Comments