मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घर परिसरात अज्ञात महिलेचा संशयास्पद वावर!
- Navnath Yewale
- Apr 21
- 2 min read
वाँटेड कृष्णा आंधळेचे पुराव्याचा दावा, पोलिसांकडून अज्ञात महिलेचा शोध सुरू

संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला बीड जिल्हा न्यायालयात सुरू आहे. या हत्येनं राज्य हादरलं.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे नेते आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हत्येचा मुख्यसुत्राधार असल्याचा आरोप आहे. त्याच्यासह हत्येत सहभागी आठ जणांना अटक झाली असून ते कारागृहात आहेत.
या हत्येतील कृष्णा आंधळे हा आजही वाँटेड आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेसंदर्भात आजही वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. अशी एक घटना संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या घर परिसरात शनिवारी घडली आहे. एक आात महिला देशमुख यांच्या घर परिसरात संशयितरित्या वावरत होती. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.
मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात ही अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी सहा च्या दरम्यान आली होती. तत्पूर्वी ती देशमुख यांच्या घर परिसरात संशयितरित्या वावरत होती. केज पोलिस देशमुख यांच्या घरी आल्यानंतर अज्ञात महिला पसार झाली.
ही महिला घर परिसरात वावरल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी घरासमोर उभारलेल्या मंडपामध्ये दाखल झाली.दरम्यान, बराच वेळ मंडपात बसून होती. माझ्याकडे फरार कृष्णा आंधळेचे पुरावे आहेत. तो माझ्यासोबत राहतो. त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा करत होती. या महिलेची माहिती मिळताच पोलिस देखील देशमुख यांच्य घरी महिला पोलिसांसह दाखल झाले.
या महिलेने देशमुख यांच्या घरातील स्वच्छतागृह वापरण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली. देशमुख कुटुंबियांनी दूसरीकडे स्वच्छतागृहाची सोय करून दिली. यानंतर तिने देशमुख यांच्या घरातील स्नानगृहात अंघोळ करायची आहे, असा हट्ट धरला. यानंतर ती देशमुख यांच्या घराच्या परिसरात बसून राहिली. कृष्णा आंधळेविषयी सकाळी सर्व सांगते, असं म्हणत तिने शनिवारची रात्र मंडपात झोपून काढली. या अज्ञात महिलेकडे पोलिसांनी तिच्याकडे सकाळी चौकशी सुरू केल्यावर तिने नांव सांगण्यास नकार दिला. यानंतर ती तिथून निघून गेली. पुढे एसटी बसने प्रवास केल्याची महिती मिळते. या अज्ञात महिलेची माहिती पोलिसांनी घेण्यास सुरवात केली असून, ती महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
धनंजय देशमुख म्हणाले....
धनंजय देशमुख म्हणाले, “ महिला ज्यावेळी घर परिसरात आली, त्यावेळी मी बाहेरगावी होतो. घरच्यांनी मला त्या महिलेविषयी माहिती दिली. कृष्णा आंधळेबाबत पुरावे आहे, कोठे राहतो, हे महिती असल्याचे सांगत आहे, असे घरच्यांनी सांगितले. मी रात्री उशिरा आलो ” तिच्याशी बोलल्यावर संबंधित महिलेनं सकाळी सर्व सांगते, अशी म्हटली. त्यावेळी पोलिस देखील होते. महिला पोलिस देखील होत्या. तिच्या माहितीवरुन रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला. त्यावर अशा महिलेने तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु महिला सायंकाळी थांबून पुढं सकाळी ती निघून गेली. आता पोलिस माहिती घेत आहेत, असे देशमुख यांनी सांगितले
Comentários