महापालिका आयुक्ताचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न
- Navnath Yewale
- Apr 7
- 1 min read

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी (दि.5) गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर लातूर शहरातील खासगी दवाखाण्यात उपचार सुरु आहेत. मात्र,एका कर्तव्यदक्ष अधिकार्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी शासकीय निवासस्थानी नेहमीप्रमाणे त्यांच्या कुटूंबीयांसोबत जेवण केले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मनोहरे आपल्या खोलीत गेले. आपल्या बेडरुमचा दरवाजा त्यांनी आतून बंद केला. काही वेळातच खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. रिव्हॉलव्हरने मनोहरे यांनी स्वता:वर डोक्यात गोळी झाडून घेतली.
त्यावेळी घरच्यांनी खोलीकडे धाव घेतली. मनोहरे हे रक्ताच्या थारोळ्यात आढळले. त्यांना तातडीने खासगी रुग्नालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गोळी लागल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया केली. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर लातूर महानगरपालिकेतील आनेक वरिष्ठ अधिकारी शहरातील सह्याद्री रुग्णालयात दाखल झाले. लातूरचे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधकिर्यांनी रुग्नालयात धाव घेतली.
भाजपा आमदार अभिमन्यू पवार आणि माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी रुग्नालयात धाव घेत आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अवश्यकतेनुसार त्यांना एअर अँम्बुलन्स ने मुंबईला उपचारासाठी नेलं जाईल असंही ते म्हणाले.
बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कौंटूंबीक कारण की कार्यालयीन ताण? याचा शोध पोलिस घेत आहेत. या संपूर्ण घटनेमागील सत्य शोधून काढण्याची मागणी आता लातूरकर करत आहेत.
कुणाचा राजकीय दबाव होता का? कुणी धमकी दिली का? याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. कुठल्याही वादापासून दूर राहणार्या या अधिकार्याने असे टोकाचे पाऊल उचलले? याचं उत्तर सध्या कुणाकडेच नाही. कर्तव्यदक्ष आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आता अनेक प्रश्नाचं मोहोळ उठलं आहे.
Comments