top of page

महायुती करू, अपवादात्मक ठिकाणी वेगवेगळे लढू- मुख्यमंत्री फडणवीस




आम्हला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र हि निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्रपक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणूकीनंतर पुन्हा एकत्रित येवू, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.


राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजीत केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका 120 दिवसात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभुमिवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.


आम्ही वेळेत निवडणूका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पाऊस जास्त असेल त्या भागातील निवडणूका थोड्या पुढे ढकलण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला करू. पण वेळेत निवडणूका पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.


महापालिकांच्या निवडणूका स्वबळावर लढणार की महायुतीच्या माध्यमातून, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्हाला महापालिकांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिन्ही पक्ष एकच आहोत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते पाच पाच, सात सात वर्ष काम करतात, त्यांना निवडणूक लढवावी , असे वाटणे सहाजिकच आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत.


त्यामुळे शक्य तिथेे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू, आणि निवडणूकीनंतर पुन्हा एकत्रित येवू. अपवादात्मक ठिकाणी जेथे स्वतंत्र निवडणूक लढू, तेथे एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू. मात्र, जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


यानंतरही कार्यशाळा होणार आहेत

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर आम्ही प्रशासकिय सुधार,ई गव्हर्रनचा वापर आणि प्रशासकिय कार्यक्षमता वाढवण्यासाठी संवाद आणि कार्यशाळांचे आयेाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध गट तयार करून एका एका गटासोबत मी चर्चा करत आहे. त्यांच्या अडचणी काय आहेत. आमच्या अपेक्षा काय आहेत, यावर नवीन काय करता येईल याचा एकत्रीत विचार करत आहोत. यासाठी 150 दिवसांचा कार्यक्रमच दिला आहे.


अनेक लोक चांगले काम करत आहेत. ते जोपर्यंत पदावर असतात, तोवर ते काम राहते, ते बदलल्यानंतर व नवीन कोणी आल्यावर त्यात बदल होतो. असे न होण्यासाठी संस्थात्मक बांधणी करायची आहे, त्यासाठी याा कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यानंतरही कार्यशाळा होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Comentarios


bottom of page