महायुती सरकारचा महामंडळाचा फॉर्म्यूला ठरला !
- Navnath Yewale
- Jul 24
- 1 min read
भाजप 44, शविसेना 33, राष्ट्रवादी 23 सूत्रावर एकमत

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष महायुतीच्या रुपात एकत्र आले असून सध्या सत्तेच्या सिहांसनावर आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी त्यांच्यात अंतर्गत रस्सीखेच चालू असल्याचे बोलले जाते. महायुतीतील नाराजीही अनेकवेळ्या मार्गाने समोर आली आहे. दरम्यान, आता महायुतीचा एक नवा आणि महत्वाचा फॉर्म्यूला समोर आला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी मंत्रिपदासाठी जोर लावला होता. पण प्रत्यक्ष संधी मात्र दुसर्याच नेत्याला दिली गेली. त्यामुळेच तिन्ही पक्षातील काही नेते नाराज आहेत. यातील काही नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे, तर काही नेत्यांची नाराजी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समोर आलेली आहे. हिच नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील वेगवेगळी महामंडळे फार महत्वाची भूमिका निभावत असतात. याच महामंडळाच्या वाटपाबाबत नवा फॉर्म्यूला समोर आला आहे. माहयुतीत महामंडळ वाटप ठरले असून या सूत्रानुसार महामंडळ वाटप केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपाच्या वाट्याला 44, शिंदेच्या शिवसेनेला 33,तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ या सूत्रावर एकमत झाल्याचेही समोर आले आहे.
लवकरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आजी-माजी आमदार, विद्यमान तसेच माजी मंत्र्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी लवकरच महामंडळाचे वाटप केले जाऊ शकते. असे सांगितले जात आहे. या महामंडळ वाटपातूनप महायुतीचे तिन्ही पक्ष आपापल्या नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राज्यात सिडको आणि म्हाडा यासारखी चर्चेत असलेली आणि महत्वाची समजली जातात. या महामंडळांसाठीही महायुतीच्या पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच ही महामंडळे नेमके कोणाच्या पदरात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments