महाराष्ट्रदिन विशेष : महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हणाचा सर्पराज्ञीत सौंदर्य श्रृंगार
- Navnath Yewale
- Apr 30
- 2 min read

वैशाखाच्या रणरणत्या उन्हात जेव्हा सृष्टी निष्पर्ण होते, तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपुष्प ‘ताम्हण’ जांभळ्या रंगाच्या विविध छटांचा मुकुट चढवून दिमाखात उभा राहतो. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव येथील ताम्हण वृक्षाला आलेला फुलांचा बहर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.
निसर्ग सौंदर्याचे प्रतीक
तागडगावच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र परिसरात ताम्हणाचे झाड जांभळ्या रंगाच्या विविध रंगछटांच्या फुलांनी लगडले आहे. कोठे गडद जांभळा, कोठे फिकट लव्हेंडर, तर कोठे गुलाबी झाक असलेल्या पाकळ्यांचा हा सौंदर्य शृंगार पाहून जणू निसर्गानेच महाराष्ट्राच्या माथ्यावर ‘पुष्पमुकुट’ चढवला आहे. ‘लागरस्ट्रोमिया स्पेशिओसा’ हे शास्त्रीय नाव असलेला ताम्हण वृक्ष उन्हाळ्याच्या कडाक्यातही टवटवीत राहतो. त्याच्या रेशमी, नक्षीदार पाकळ्या सकाळच्या उन्हात चमकतात आणि खाली पडलेला फुलांचा सडा जांभळी पायघडी घातल्यासारखा भासतो.
बहराचा काळ
ताम्हण प्रामुख्याने एप्रिल ते जून या काळात, म्हणजेच कडक उन्हाळ्यात बहरते. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या आसपास हे झाड पूर्णपणे फुलांनी बहरलेले असते.

राज्यपुष्पाचा दर्जा
महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून ताम्हण अर्थात जारूळ, Pride of India ची अधिकृत घोषणा १५ जुलै १९६६ रोजी राज्य शासनाद्वारे करण्यात आली. स्थानिक भाषेत याला बोंडारा असेही म्हणतात.
याची फुले आकर्षक जांभळट-गुलाबी रंगाची असतात. पाकळ्यांचा पोत चुरगळलेल्या कागदासारखा असतो, म्हणून इंग्रजीत याला ‘Queen’s Crape Myrtle’ असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचे हे प्रतीक मानले जाते.
पर्यावरणीय महत्त्व
“ताम्हण फक्त सौंदर्यासाठी नाही, तर वन्यजीवांसाठी सावली, पक्ष्यांसाठी निवारा आणि मधमाश्यांसाठी मधाचे भांडार आहे. हा खरा सुकुमार सौंदर्याचा साज आहे,” असे सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले.

संवर्धनाची गरज
दुष्काळी बीड जिल्ह्यात कमी पाण्यावर तग धरणारा ताम्हण पर्यावरणासाठी वरदान आहे. सर्पराज्ञीतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक ताम्हण लावावा.
गाव-खेड्यात, रस्त्याच्या कडेला, शाळा-महाविद्यालये व शासकीय कार्यालयांच्या आवारात हे वृक्ष लावणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या राज्यपुष्प वृक्षाची ओळख होईल व त्याचे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक महत्त्व कळेल. अशा प्रयत्नांतूनच महाराष्ट्राचा हा ‘राज्यपुष्पमुकुट’ सदैव बहरलेला राहील.



Comments